ऐलमा पैलमा.
*ऐलमा पैलमा.
अचानक भर दुपारी आकाश बुक्क्यासारखं काळंभोर झालं. हस्त निघाला हे जाणवलं. अश्विन महिन्यात हस्त निघतो. म्हणजे सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. मृग नक्षत्रापासून सुरू झालेला पावसाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. हे पावसाचे परतीचे दिवस. येताना जसा विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटात पर्जन्य राजा येतो. अगदी तसाच जातानाही जामानिमा असतो. भाद्रपद सरता पाऊस कमी होऊन उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवायला लागतो. अश्विनात नवरात्रीच्या सुमारास हस्त नक्षत्र निघते. (पण यावेळी अधिक महिना आल्याने हस्त नक्षत्र आधी निघाले आहे) पाहता पाहता आभाळात मोठमोठे कृष्णमेघ अगदी दाटून येतात. इतके खाली येतात की त्याला जणू हात वर करून बोट लावता येईल. त्या मेघांचा काळा रंग, आकार अगदी हत्ती सारखा दिसतो म्हणूनच या नक्षत्राला हस्त नक्षत्र म्हणत असावेत. माई म्हणायची हस्ताचा पाऊस म्हणजे हत्तीच्या सोंडे सारखा.. अगदी मुसळधार!! खरोखरच हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस पडतो हस्तात. हा पाऊस पुढच्या रब्बी हंगामासाठी उपयोगी असतो. जमिनीची जलसंधारणता वाढवतो. निसर्गाने निर्माण केलेली व्यवस्था पाहून थक्क व्हायला होतं. पिकांवर हा पाऊस पडल्यावर कीड लागत नाही अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. आपले सण, प्रथा, परंपरा किती निसर्गाशी एकरूप होणाऱ्या आहेत.
लहानपणापासून हस्ताचा पाऊस माझा अतिशय आवडता आहे. कारण हस्त नक्षत्र निघाल्यापासून संपेपर्यंत सोळा दिवस आमचा हादगा असे. बाजारात त्या सुमारास हादग्याचे कागद विकायला येत. त्यावर सोंडेने पाणी उडवणारे दोन हत्ती असत. कोनाड्यात तो कागद लावून त्याला सोळा कच्च्या फळांची, भाज्यांची माळ घालायची. पंढरपूरला देवळा भोवती दाट वस्ती असल्याने अंगणातली झाडं दिसणं तसं दुरापास्तच.. मग स्टेशन रोडच्या ओळखीच्या बंगल्यातून, बुरुड बागेतून कच्ची फळं मिळवायची धडपड असे. एखादं फळ जास्त मिळालं तर ते मैत्रिणींबरोबर आदलाबदली करून घ्यायचं. जमवलेल्या सोळा फळांची, चिरमुऱ्याची, फुलांची माळ हादग्याला घालायची. सोळा दिवस रोज संध्याकाळी पाटावर झुल पांघरलेला हत्ती रांगोळीने काढून खाली त्या दिवशीच्या गाणे इतके ठिपके काढून हादगा करायचा. गाणं संपलं की तो ठिपका पुसून काढण्यासाठी मुलींची चढाओढ असे. पहिलं गाणं आद्य देव गणेशाला वंदन करून
*ऐलमा पैलमा गणेश देवा*
*माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा*
हे असे. मग पुढे रोज एक एक वाढत जाणारी तत्कालीन समाजवृत्ती, देव देवता, परंपरा, निसर्ग, सासर माहेर, विविध नातेसंबंध यांचे उल्लेख असणारी मनोरंजक गाणी असत. हादगा म्हणजे मनोरंजनाबरोबरच समाजमनानं केलेलं पावसाचं पूजन. एक आनंद सोहळा. त्यावेळी असणाऱ्या प्रथा गाण्यातून प्रगटतात.
*कारल्याचा वेल लाव गं सूने मग जा अपुल्या माहेरा*
या गाण्यातून सून माहेरी जाण्याची परवानगी मागते तेव्हा सासू एक एक काम वाढवत राहते. नवरा मात्र प्रेमळ असतो. तो आज्ञा करतो
*आणा गाडी चढवा माडी जाऊ द्या राणी माहेरा* समवयस्क नंणंद भावजयांचं गंमतशीर ऊन पावसासारखं नातं
*शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं*
या गाण्यातून व्यक्त होत. *अस्सं जातं सुरेख बाई* या गाण्यात सासुरवाशीणीच्या घरात असलेले सुरेख जातं. त्यावरून काढलेली रवा पिठी. त्याच्या केलेल्या करंज्या. त्या तबकात ठेवून, शेल्याने झाकून, पालखीत घालून माहेरी धाडायच्या. ती म्हणते *अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं*
*अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारीत* त्याच बरोबर अजून एक मधुर आठवण तिला येते आजोळची.. ती म्हणते
*अस्सं आजोळ सुरेख बाई खेळाया मिळतं*..
*कृष्ण घालितो लोळण यशोदा आली ग धावून* या गाण्यातून कृष्णाचा लडिवाळ हट्टीपणा दिसतो.
या सगळ्या गाण्यांतून त्यावेळच्या स्त्रियांचं भावविश्वच व्यक्त होतं.
शेवटच्या दिवशी
*आड बाई आडोणी*
*आडाचं पाणी खारोणी*
*आडात पडला शिंपला*
*आमचा हादगा संपला*
असं म्हणत हादगा संपतो.
या हादग्याच्या खेळातली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे खिरापत!! खिरापत म्हणजे एखादी गोष्ट वाटून खाणे. ती खिरापत ओळखावी लागे. प्रत्येकीच्या आजी, आई, काकू न ओळखता येणाऱ्या खिरापती करत. मग मुलींमध्ये खिरापती ओळखण्याची चढाओढ सुरू होई. कसल्या वड्या, लाडू, चिवडा अशी नावे घेत त्या ओळखायला लागत. ओळखायला अवघड जाई तेव्हा गोडा पैकी की तिखटापैकी असं विचारत. अनेक पदार्थांची नावे घेतल्यावर शेवटी एखादी खिरापत ओळखे. तिला शाब्बासकी मिळे. गाण्यांप्रमाणे खिरापती पण वाढत जात. सोळाव्या दिवशी सगळ्यांच्या घरच्या खिरापती खाऊन पोट भरे.
हादगा हा स्त्रिया मुली यांच्या मनोरंजनाचा, विरंगुळ्याचा खेळ. पण मला तो निसर्गाची, हत्तीतत्त्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योजलेला वाटतो. हत्ती मानव जातीचा आधार आहे. आपल्या संस्कृतीने त्याला पृथ्वीचा भार तोलणारा आधार मानलेलं आहे. पुराणकथातून ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली त्यावेळी साम गायन करून आठ हत्ती निर्माण केले. या अष्टदिग्गजांनी आठ दिशा पाठीवर घेऊन पृथ्वी तोलून धरली आहे अशी वर्णनं आहेत. देवदानवाच्या युद्धात, क्षीरसमुद्रमंथनात लक्ष्मी बरोबर शुभ्रतेजानी झळाळणारा ऐरावत वर आला. हा इंद्राचा वाहन झाला. इंद्र पर्जन्याचा शास्ता आणि नियंता. त्याचं पावसाशी असलेलं नातं वाहन हत्तीने देखील स्वीकारलं. शिवाय तो जलपुत्र आहे. अथांग सागरातून वर आल्यानं त्याचं पाण्याची जन्माचं नातं आहे. आकाशात उदरात जल भरलेले मेघ हत्तीसारखे दिसतात अशी पूर्वापार कल्पना आहे. कालिदासालाही मेघदूतात काळे मेघ पाहून त्याची आठवण आली. आपल्याकडे अनेक राजकुळांची देवता गजान्तलक्ष्मी होती. कमलास्थित लक्ष्मी आणि तिच्यावर सोंडेने अभिषेक करणारे दोन गजराज अशा स्वरूपात तिची पूजा केली जाई. अशी अनेक सुरेख शिल्पे संपूर्ण भारतात आहेत. हत्ती हे राजवैभवाचे प्रतीक.. प्राचीन नाण्यांवर हत्तीच्या मुद्रा आहेत. पदरी असलेल्या हत्तींवरून राजाचं राजवैभव, पराक्रम मोजले जाई. आमच्याकडे कोल्हापूरला देशी मर्दानी खेळ म्हणून हत्तींचा साठमारी हा खेळ खेळला जाई. मस्तवाल हत्तींशी झुंज देण्याचा हा थरारक खेळ खूप लोकप्रिय होता.
भारतीय पुराणांतून, संस्कृत साहित्यातून लेण्यांमधून हत्ती आपल्याला ठिकठिकाणी पराक्रम, ऐश्वर्य, समृद्धी याचं भेटतो. हादग्याने हे हत्ती तत्त्व आणि त्याचे श्रेष्ठत्व कृतज्ञतेने पूजलं आहे.. जपलं आहे...मुली मोठ्या झाल्याने आमच्या कडे आता हादगा रंगत नाही..पण समोर क्षितिजावर दाटलेल्या सर्जनसमृद्ध हस्ताच्या कृष्ण जलदांनी मला हत्ती आणि हादग्याची आठवण करून दिली..
खरे तर सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. पण हस्ताचे एक दोन मोठे पाऊस इथे कोल्हापुरात झाले. त्यावेळी हा लेख लिहिला आहे.
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.
9403554167.

Comments
Post a Comment