श्री गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क समाज भूषण पुरस्कार.
*सामाजिक कार्याची मानाची पावती! गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांना ‘याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार’*
*पंढरपूर, दि. 12 (प्रतिनिधी)*
समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय, विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री. गजानन बिडकर आणि श्री. बाळकृष्ण वाडेकर यांना मानाचा *"याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार"* प्रदान करून गौरविण्यात आले.
शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री याज्ञवल्क्य आश्रम, याज्ञवल्क्य पथ, पंढरपूर येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संस्थेच्या कार्याचा परिचय तसेच मान्यवरांचे स्वागत श्रीकांत जोशी, कार्यवाह, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती मंडळ, पुणे यांनी केले.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पुरस्कारार्थींच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.
> "ब्राह्मण समाजासाठी गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांनी केलेले कार्य खरोखरच अलौकिक आहे. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अशा कार्यकर्त्यांचा गौरव समाजातील इतरांनाही प्रेरणा देतो."
> *- श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर*
यावेळी चैतन्य महाराजांनी ‘पंढरी संदेश’ या साप्ताहिकाशी असलेल्या आपल्या आठवणीही सांगितल्या. ‘पंढरी संदेश’ साप्ताहिकामध्ये लेख लिहून देण्याचा अनुभव असल्याचे सांगत त्यांनी बिडकर यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याचा विशेष उल्लेख केला.
यावेळी पुरस्कारार्थींना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सौ. सुरक्षा द. कुलकर्णी व अभिजीत आवताडे यांनी केले.
पुरस्कारार्थी श्री. गजानन बिडकर यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव रामकृष्ण बिडकर यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. तर श्री. बाळकृष्ण वाडेकर यांनीही या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अभिजीत आवताडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनंत कुलकर्णी यांनी केले.
या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांमधून निश्चितच प्रेरणा मिळते, असा सूर उपस्थितांमधून उमटला.
कार्यक्रमास समाजातील मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक तसेच पुरस्कारार्थींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.
संपादक.
चैतन्य उत्पात


Comments
Post a Comment