स्वेरीच्या वतीने, पालवी, मध्ये रक्षाबंधन.
स्वेरीच्या वतीने ‘पालवी’मध्ये ‘रक्षाबंधन’ संपन्न
‘मेसा’ व 'रासेयो' मधील विद्यार्थ्यांचा उपक्रम
पंढरपूर(प्रतिनिधी ): रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, आपुलकी, संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाअंतर्गत असलेल्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने कोर्टी रोड लगत असलेल्या ‘पालवी’ येथे ‘रक्षाबंधना’चा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात समाजातील वंचित व गरजू लहान मुलांना प्रेम, आपुलकी आणि कुटुंबातील सदस्यांसारखा आधार मिळावा तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून सामाजिक बांधिलकी जपावी, या उद्देशाने ‘मेसा’च्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पालवीतील लहान मुलांशी संवाद साधून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले. विद्यार्थ्यांनी त्यांना राख्या बांधून बंधुभाव, प्रेम आणि संरक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थित लहान मुले आनंदित झाली. मुलांनीही विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व प्रेमाची भावना व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीने सण साजरा न करता, समाजातील लहान मुलांप्रती असलेली आपली जबाबदारीही अधोरेखित केली. ‘रक्ताचे नातेच महत्त्वाचे नसते, तर माणुसकीचे नातेही तितकेच घट्ट असते.’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली मेसा मधील विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले. याच उपक्रमांतर्गत मेसा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पालवी संस्थेस आर्थिक मदत तसेच आवश्यक १०० लेखन पॅड प्रदान करण्यात आले. या योगदानातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पालवीतील लहान मुलांप्रती आपुलकी व मदतीचा हात पुढे केला. नियोजन व आयोजन मेसाचे विद्यार्थी अध्यक्ष आदित्य डूबल व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी समन्वयक प्रणव नवले यांच्या नेतृत्वाखाली इतर विद्यार्थी व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेसाचे समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे यांनी विशेष प्रयत्न केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment