पंढरपूरचे सुपुत्र श्री विद्याधर ताठे लिखीत "कृपासिंधुचरित्र ग्रंथाचेश्री शंकराचार्य यांचे हस्ते कोल्हापूर येथे प्रकाशन"
विद्याधर ताठे लिखित 'कृपासिंधू' चरित्र ग्रंथाचे शंकराचार्यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रकाशन.
कोल्हापूर : (प्रतिनिधी) संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक आणि उपासक विद्याधर ताठे यांनी थोर भागवताचार्य साक्षात्कारी संत गोविंदशास्त्री पेंडसे यांचे लिहिलेले चरित्र 'कृपासिंधू' ज्ञानोपासनेसाठी उपयुक्त ठरेल असा गुरुकृपांकित ग्रंथ आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचे भावपूर्ण असे दर्शन या ग्रंथातून घडते, अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह सरस्वती यांनी आपला अभिप्राय देत 'कृपासिंधू' पुस्तकाचे प्रकाशन केले.
करवीरनगरीतील राजसेवक वतनदार खासबारदार यांच्या वाड्यात थोर भागवताचार्य गोविंदशास्त्री पेंडसे यांचे १८३९ ते १८८१ अशी ३१ वर्षे वास्तव्य होते. त्यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिराजवळील 'मंगलधाम' येथे पू शंकराचार्य यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. या समारंभास पुण्यातील योगीराज गुळवणी महाराज मठाचे पू. शरदकाका जोशी यांचे प्रतिनिधी वेदमूर्ती सुहास जोशी, 'दासबोधा'चे निरुपणकार श्री. पद्माकर बोंडाळे, लेखक विद्याधर ताठे, अॅडव्होकेट नरेंद्र खासबारदार, ख्यातनाम चित्रकार अनंत खासबारदार यांची विशेष उपस्थिती होती.
एकता मासिकाचे माजी संपादक श्री. विद्याधर ताठे हे पंढरपूरचे सुपुत्र असून संतसाहित्याच्या उपासनेचा व अभ्यासाचा वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यांचा प्रस्तुत ग्रंथ 'कृपासिंधू' भक्तीमार्गावरील साधक उपासकांना दीपस्तंभा सारखा मार्गदर्शक ठरणार आहे असे वेदमूर्ती जोशी म्हणाले आणि असा ग्रंथ लिहून घेऊन खासबारदार परिवाराने आपल्या गुरुभक्तीचा व सेवेचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
प्रासादिक चरित्र लेखन
अत्यंत ओघवत्या शैलीतील या प्रासादिक ग्रंथास जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठ यांचे आशीर्वाद लाभलेले असून प्रा.डॉ. कुमुद गोसावी आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत. २५६ पानांच्या या ग्रंथात एकूण ५ प्रकरणे आहेत. त्यात भारतीय संत परंपरेचे योगदान, करवीर क्षेत्राचे महात्म्य व इतिहास आणि भागवताचार्य पेंडसे यांची जीवनगाथा पूर्वार्ध, उत्तरार्ध अशी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आलेली आहे. त्याशिवाय काही माहितीपूर्ण परिशिष्टे पुस्तकाला साधार संपन्न करणारी आहेत.
भागवताचार्य पेंडसे हे मूळचे कोकणातील घराणे, त्यांचे वडिल इचलकरंजी संस्थानमध्ये पुराणिक होते तर पूगोविंदशास्त्री हे प्रारंभी सांगलीच्या संस्थान मध्ये पुराणिक होते. करवीरच्या अंबाबाईच्या दृष्टांताने साक्षात्कारी दर्शनाने ते सांगलीहून कोल्हापूरला स्थलांतर करतात. करवीरमध्ये रोज सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास भागवत पुराण सांगणे हेच त्यांचे जीवनव्रत व गुरुसेवा होती. करवीर राजघराण्यातील महाराणी सुंदराबाईसाहेब या गोविंदशास्त्री पेंडसेंच्या भक्त होत्या. पेंडसेशास्त्रींचे चरित्र एका थोर साक्षात्कारी विभुतीचे शब्ददर्शन आहे. श्री. विद्याधर ताठे यांनी हे पुस्तक पंढरपुरातील 'संतमत' साप्ताहिकाचे संपादक, छ. शिवभक्त, ह.भ.प. अनिलकाका बडवे यांना अर्पण केलेले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment