रम्यस्थळ चंद्रभागा.


 *रम्य स्थळ चंद्रभागा*


कार्तिकातील शांत सुंदर पौर्णिमेची संध्याकाळ. समोर चंद्रभागेचा नितळ काठ!! भाविकांची लगबग.. मऊशार वाळू तुडवत, सुखावणारा वारा अंगावर घेत, हातातील पूजेचे तबक सावरीत आई, काकू समवेत आलेली मी. बरोबर हात धरून आमच्या सोबत इकडे तिकडे बघत चालणारी माझी छोटी बहीण, क्षितिजावर उगवणारा फिकट दिसणारा मोतिया रंगाचा चंद्र आणि हेलकावणारे दिवे आपल्या अंगावर घेऊन संथ वाहणारी चंद्रभागा!!  हे आठवणींच्या सोनेरी पोतडीत साठवलेले दृश्य त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मला हमखास आठवतेच!! 

  कार्तिकी वारीचा हा शेवटचा दिवस. वारीला आलेली गर्दी ओसरलेली असे.  काही नेमाचे वारकरी आणि स्थानिक मंडळी चंद्रभागेच्या पात्रात  दिवे सोडण्यासाठी आलेले असत.  आमच्या घरी तर दुपारी चार वाजल्यापासून माईची गडबड सुरू होई! ती तुपात भिजवलेल्या १०८ त्रिपुरी वाती, द्रोण, नैवेद्य, हळदी कुंकू, फुलं, उदबत्ती, चंद्रभागेची ओटी असे सारे जिन्नस तबकातून, पिशवीतून भरून ठेवे. कधी कधी ही त्रिपुरी पौर्णिमेची पूजा आमच्या घरी उतरणारे कोमटी समाजातील वारकरी आमच्या कडून करून घेत. हलक्या गुलाबी थंडीचा अंमल भोवताली असे. हळूहळू दाट काळोख पसरत जाई. या देखण्या  पार्श्वभूमीवर हळूहळू द्रोणात एक एक दिवा पेटवून त्याला हलका हेलकावा देऊन तो चंद्रभागेच्या पाण्यात सोडून दिला जाई. तो अलवार तरंगत दूर दूर जाई. आमच्या बरोबर अनेकांनी असे दिवे सोडलेले असत. सारं  इतकं मनोहारी दिसत असे की समोरचे दृश्य डोळ्यात साठवताना मनाची आणि डोळ्यांची तारांबळ उडत असे. शांत, मृदू चंद्रभागेवर जणू काही आकाशीची नक्षत्रे उतरून आली आहेत असे वाटत राही.. पाण्यात हेलकावणाऱ्या असंख्य प्रज्वलित दिव्यांचा जो काही माहोल तयार होई तो केवळ अनुपमेय!!! माणसांनी तयार केलेला, पिढ्यान् पिढ्या प्रवाहित होत इथवर आलेला हा संस्कृतीचा अन् सृष्टीचा असा आल्हाददायी सोहळा आपल्या अपूर्व सौंदर्यविभ्रमांनी अपार आनंद देत असे.  

     हे दीपदान झाल्यावर पौर्णिमेचा  चंद्र आपल्या पूर्ण बिंबाने उजळून फार रमणीय दिसत असे. या सुंदर सोहळ्याने कार्तिकी वारीची आणि पंढरपुरातील चातुर्मासाची सांगता होई!! 


मीरा उत्पात-ताशी, 

९४०३५५४१६७.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.