खमंग कांदेनवमी .
*खमंग कांदे नवमी*
वारी अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असे.सगळीकडे नुसती माणसंच माणसं दिसत असतं. आणि पंढरपूरात देवळाभोवतीच्या घरांमध्ये एक खमंग खाद्यसोहळा रंगत असे.कांदेनवमीचा...
घरातली मोठी माणसं वारीचं नियोजन करण्यात गुंतलेली असत. आम्ही मुले पौर्णिमेपर्यंत शाळेला सुट्टी असल्यामुळे विशेष आनंदात असू. या सगळ्या गडबडीत कांदेनवमी येई. इतरांपेक्षा देवळाभोवती राहणाऱ्या आम्हाला कांदे नवमीचं फार अप्रूप असे. कारण आता ही कांदेनवमी झाल्यानंतर परत चार महिन्यांनी आणि ज्यांच्याकडे खंडोबा आहे त्यांना पाच महिन्यांनंतर कांदा-लसूण खायला मिळणार असे. त्यामुळे हा दिवस फार मौजेचा असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कांद्याचे विविध पदार्थ केले जात. कांदा भजी, थालीपीठ, भाजी अशा वैविध्यपूर्ण पदार्थांचा खमंग वास केवळ घरातूनच नव्हे तर सार्या गल्लीतून येत असे. प्रत्येक घरी काही ना काही तरी खमंग केलेले असे. मोठ्या माणसांपेक्षा आम्हा मुलांना आता कांदा खायचा नाही म्हणून जास्त वाईट वाटत असे. मग वाड्यात किंवा गच्चीवर संध्याकाळी कांदेनवमी साजरी केली जाई. प्रत्येकजण घरातून कांद्याची भजी, बटाटे वडे, थालीपीठ असे कांद्याचे अनेक पदार्थ घेऊन येई. याचवेळी एखादी मोठी बहीण किंवा गल्लीतील नवोढा वधू आषाढ पाळण्यासाठी माहेरी आलेली असे. तिच्या समवेत चेष्टामस्करी केली जाई. ती पण खूप आनंदात मोकळेपणाने सहभागी होई..खूप दिवसांनी तिला असा मोकळेपणा मिळालेला असे. मग ती पण एखादा खास पदार्थ अगदी मन लावून करत असे.एकत्र बसून केलेली ही अंगतपंगत कांद्याच्या चविष्ट पदार्थांनी आणि हास्य विनोदाने रंगलेली असे. दिवसभर कांद्याचा सतत वापर करूनही काही कांदे टोपलीत पडलेले असत. आता चार-पाच महिने आपल्याला काहीच किंमत नाही म्हणून ते उदास पणाने पहात असत. मी माईला विचारे “माई या कांद्यांचं काय करायचं गं”? मला वाटे
ती म्हणेल ‘वारी झाल्यावर खा तुम्ही’ पण कसंचं काय... माई ती काद्यांची टोपली धाऱ्यात ठेवून देई. वारी झाल्यावर शेतातून महादा आला की ते कांदे त्याला देऊन टाकी. मग मी जड अंतःकरणाने त्या उरल्या सुरल्या कांद्यांना निरोप देई.. एवढासा छोटा कांदा मनाला हुरहूर लावून चार महिन्यांसाठी निरोप घेई.असण्याने जेवणाची रंगत वाढवी..नसण्याने त्याची वाट पाहण्याची अधीरता वाढवी.. हे पावसाळी चार महिने पोटाला आराम देण्याचे, देवाचं नामस्मरण करत शरीराला जरा विश्रांती देण्याचे असावेत अशी पूर्वापार केलेली ही योजना. या दिवसांत वातुळ पदार्थ खाऊ नये हे देवाधर्माच्या निमित्ताने सांगणे असे. अशाप्रकारे अगदी लहान वयापासून जिभेवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण आपोआपच मिळत असे. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नसे... संस्कार असेच आपोआप पण खोलवर रूजतात.. आजही ते सारं तसंच आणि तितक्याच संयमानं होतं.. मी खमंग कांदे नवमी साजरी करून चार महिने कांद्याला निरोप देते... तुमचं काय?
©️ मीरा उत्पात-ताशी
9403554167.

Comments
Post a Comment