धरुनिया राधा मीस, देव येती पंढरीस.


 *धरूनिया राधा मीस। देव येती पंढरीस।*



भूवैकुंठ असलेले अलौकिक पंढरी क्षेत्र निर्माण होण्याची चार निमित्त आहेत. त्यातील पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे रुसून पंढरीस आलेली रूक्मिणी. 

एकदा भगवान श्रीकृष्ण भर दरबारात आपले कामकाज करत असता त्यांची बालमैत्रीण राधा तिथे आली आणि ती कृष्णाच्या मांडीवर बसली. त्यामुळे रागावून रुसून रूक्मिणी भीमेच्या काठी असलेल्या दिंडीरवनात येऊन तप करीत बसली. तिचा रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीरवनात आले. एकनाथ महाराज म्हणतात 

*धरुनिया राधा मीस। देव येती पंढरीस।* 

*रुक्मिणी रुसली।ती दिंडीरवनाआली।* 

*तया मागे मोक्षदानी। येता झाला दिंडीरवनी।।*

भीमेच्या तीरावर दिंडीरवन नामक निसर्गाची दाटी असलेले अतिशय रम्य ठिकाण होते. चिंचेचे बन होते. तिथे रूक्मिणी तप केले. आजही ती जागा तितकीच रम्य आहे. अगदी परवापर्यंत तिथे चिंचेची भव्य खोड असलेली सात झाडे होती. त्यांना सप्तर्षी म्हणत. श्रीकृष्ण समजूत काढायला येईपर्यंत दिंडीरवनातल्या रूक्मिणीला लोक लक्ष्मीबाई म्हणू लागले. त्याचा अपभ्रंश लखुबाई झाला. आज हे स्थान लखुबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. 

इथे हेमाडपंथी दगडी बांधकाम असणारे सुंदर मंदिर आहे. रूक्मिणीची म्हणजेच लखुबाईची सुंदर मूर्ती आहे. आणि एक अनघड तांदळा आहे. पूर्वी तुळजापूरच्या देवीला जाताना आधी इथे थांबून लखुबाईचे दर्शन घेण्याची प्रथा होती. इथे दशहार, नवरात्र आणि संक्रांतीच्या सणाला मोठी गर्दी असते. 

*रूक्मिणीप्राणसंजीवनं* असणारा श्रीकृष्ण रूक्मिणीचा रुसवा काढायला आला आणि द्वारका सोडून पंढरीचा रहिवासी झाला. 

संत कवी श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणतात 

 *रुक्मिणीस समजावया आला।*

*तो पंढरीसच राहिला।।*

या प्रसंगाची पण रम्य कथा आहे. 

गोकुळातील राधा ही पूर्व जन्मातील इंद्राणी म्हणजे इंद्रपत्नी शची होती. ती एकदा वैकुंठात गेली तेव्हा लक्ष्मी भगवान विष्णूच्या मांडीवर बसलेली बघून तिच्या मनात असूया निर्माण झाली. आपल्याला पण असे सुख मिळावे अशी प्रबळ इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. 

हे परब्रह्म परमात्मा विष्णूंनी ओळखले, ते म्हणाले तुला या इच्छापूर्ती साठी सात जन्म तप करावे लागेल. तप केल्यानंतर मी जेव्हा गोकुळात श्रीकृष्ण अवतार घेईल, तेव्हा तुझी इच्छा पुर्ण होईल, असे सांगितले. त्यानुसार शचीने सात जन्म तप केले आणि ती गोकुळात राधा म्हणून जन्माला आली. तिला दिलेल्या शब्दामुळे सर्वांसमक्ष श्रीकृष्णाने राधेला मांडीवर बसवले. आणि रूक्मिणीस पंढरीला येण्यास भाग पाडले. ह्या साऱ्या परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाच्या लीला आहेत. त्याचे दुष्ट निर्दालन करून झाले होते. आता त्याला फक्त भक्तांच्या सहवासात अखंडपणे रमायचे होते. म्हणून त्याने ह्या लीला केल्या आहेत. आणि भक्तांसाठी ही पंढरी मुक्ती पेठ निर्माण केली आहे. म्हणून कलियुगात मोक्षप्राप्ती हवी असेल तर 

*आल्याने संसारी। पंढरीसी जायें एकसरी।* 


मीरा उत्पात-ताशी.

कोल्हापूर. 

9403554167.

(लेखिका विठ्ठल अभ्यासक आणि रूक्मिणी मातेच्या वंशपरंपरागत पुजारी आहेत)

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.