पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या तीस महिन्यात पूर्ण करा._मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.


 पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी ४२५०.४६ कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता




         मुंबई, (प्रतिनिधी )मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ४१५०.४६कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान  आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील ५० वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या ३० महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

        मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वने मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

       मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या, रस्ते, वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामे वेगाने हाती घेण्यात यावीत.

       पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा हा विचार करून विकास कामे दर्जेदार, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी बाधित निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा आणि निधीअभावी कोणतेही काम अपूर्ण राहू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.

       सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर उभारणी, पुरातन मंदिर व मठांचे जतन-संवर्धन, बाधितांना व्यावसायिक संधी आणि वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास यासाठी ७३५.८० कोटी रुपयांचा आराखडा मांडण्यात आला. तसेच नगर प्रदक्षिणा मार्ग विकास, नदी घाट सुशोभीकरण, वाहनतळ व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, रस्ते व पूल आणि पालखी तळांच्या विकासासाठी १३८७.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याशिवाय भूसंपादन व पुनर्वसन खर्च, बाधित इमारतींचा मोबदला आदींसाठी २०२६.७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला. असा एकूण ४१५०.४६ कोटी रुपयांच्या या सर्वसमावेशक आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

‘सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’


टेक वारीतून नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविण्यावर भर

  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'टेक-वारी २.०' अंतर्गत 'महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

        तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे  आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण “आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम” विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 'टेक वारी' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

       मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित 'टेक-वारी २.०' अंतर्गत 'महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी  व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, केंद्र सरकारच्या क्षमता बांधणी आयोगाच्या अध्यक्ष राधा चौहान, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थित होते. कार्यक्रमास विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी 'टेक वारी' हा उपक्रम आहे.  'टेक वारी' ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. तंत्रज्ञान दररोज बदलत असून, ते आपण जर स्वीकारले नाही तर व्यक्ती  काळाच्या ओघात मागे पडू शकतात. अक्षरज्ञानापासून इंटरनेटपर्यंत साक्षरेतेची व्याख्या विकसित झाली असून आता ती एआयपर्यंत पोहोचली आहे. 'ज्याला एआय समजते आणि वापरता येते, तोच खऱ्या अर्थाने आज साक्षर आहे' असे ते म्हणाले.

        मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआयमुळे नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार असून, पुढील एक हजार दिवसात ८० ते ९० टक्के कामकाजाचे स्वरूप बदलू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी ते स्वीकारण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी संगणक क्रांतीचे उदाहरण दिले. संगणकामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले.'आयगॉट'प्लॅटफॉर्मद्वारे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिमान व्यक्त केला. विशेषतः एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयांबाबत अधिकाऱ्यांनी दाखवलेली उत्सुकता ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विभागांनी एआय आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही क्षमता योग्य प्रकारे वापरली, तर महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शन करू शकणारी कन्सल्टिंग क्षमता विकसित करू शकतो. एआय एजंट “वासुदेव” अत्यंत कार्यक्षम  पद्धतीने काम करतात, त्यामुळे भविष्यात त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्यालाही स्वतःची कौशल्ये सातत्याने अद्ययावत ठेवावी लागतील.

“'टेक-वारी २.०''महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह”

आत्मविकासातून डिजिटल युगासाठी सक्षम होण्याची सुवर्णसंधी

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

            उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. “'टेक-वारी २.०”मधून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर आत्मविकास, कार्यक्षमता आणि आधुनिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.वारकऱ्यांची पंढरपूरकडे जाणारी वारी जशी शिस्त, श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे “टेक वारी” ही प्रशासनाची तंत्रज्ञानाकडे वाटचाल दर्शवणारी चळवळ आहे. भविष्यात नागरिक-केंद्रित आणि सक्षम शासन घडवण्यासाठी ही वारी महत्त्वाची ठरणार आहे.

         मागील वर्षीच्या “टेक वारी” उपक्रमाने तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेचा भक्कम पाया घातला असून, हा उपक्रम केवळ तंत्रज्ञानाची ओळख नसून, मानव संसाधन विकासाची व्यापक चळवळ आहे.महाराष्ट्राने “साधना सप्ताह” उपक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, मिशन कर्मयोगी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सोपा झाला असून, एआयमुळे सेवा वितरण आणि तक्रार निवारण प्रक्रियेत मोठे बदल घडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. 

        मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, टेक वारी उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राचीन काळातील ‘पुष्पक विमान’ ही संकल्पना आजच्या एआय-सक्षम आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचीच उदाहरण आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टेक वारी टू”च्या माध्यमातून या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       अपर मुख्य सचिव व्ही.राधा प्रास्ताविकात म्हणाल्या की, ‘टेक-वारी २.०’ या प्रशिक्षण उपक्रमात ६ हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. तसेच या कार्यक्रमांचे राज्यभरातील नऊ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सत्राचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयात डिजिटल गव्हर्नन्स, डीपीडीपी कायदा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्वांटम कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह एआयचा प्रत्यक्ष अनुभव, सायबर सुरक्षा, प्रशासनातील नीतिमत्ता तसेच केंद्र सरकारच्या प्लॅटफॉर्म्स या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या पाच दिवसांत ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ असे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

       एआय एंजट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला.एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली.  टेक वारीच्या स्मरणिकेचे ही स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.

फ्रंट लाईन कर्मचारी  यांचा गौरव यावेळी मंत्रालयातील फ्रंट लाईन कर्मचारी  पल्लवी सतीश सावंत,नितीन गुरसाळे, मारुती मदने, रेश्मा जाधव, राहुल वाघमारे, अशोक जाधव, प्रतीक गायकरवाड, संजय कळमरकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘तालरंग’च्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.