विठ्ठल विठ्ठल गजरी , अवघी दुमदुमली पंढरी.
*विठ्ठल विठ्ठल गजरी*
*अवघी दुमदुमली पंढरी*
आज माघ शुद्ध एकादशी!!पंढरपूरच्या चार मोठ्या वाऱ्यांपैकी एक अशी माघी वारी. सर्व तिथींमध्ये एकादशी ही तिथी सर्वश्रेष्ठ आहे. कारण भगवान विष्णूंची ही प्रिय तिथी आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. पंढरपूर हे वैष्णव क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्री एकादशीचे फार महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशीला इथे वारकऱ्यांचा मेळा जमतो. तरीही त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार मोठ्या एकादशी मानल्या जातात. या काळात पंढरपुरात यात्रा भरते. याचे उल्लेख पंढरी महात्म्य या ग्रंथात आहेत.
असे म्हणतात की माघ महिन्याचे स्वामी श्रीकृष्ण आहेत. आणि श्रीकृष्ण आणि रूक्मिणी मातेचा विवाह याच महिन्यात झाला. त्यामुळे माघ महिन्याला आणि या एकादशीला विशेष महत्त्व आहे.
प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावे आहेत. आजच्या माघ शुद्ध एकादशीला *विजया (जया) एकादशी* म्हणतात. याची एक मोठी रंजक कथा आहे.
श्रीलंकेवर स्वारी करताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना समोर दिसणारा महासागर हा फार मोठा अडथळा ठरत होता. त्यावेळी ते तिथे राहणाऱ्या वकदालभ्य ऋषींच्या भेटीला गेले. त्यावेळी ऋषींनी त्यांना सैन्यासह सगळ्यांनी माघ महिन्यातील एकादशीचा उपवास करावा असे सांगितले. त्यानुसार सर्वांनी हे माघ एकादशी व्रत केले. मग सेतू बंधनाचा मार्ग मिळाला आणि नंतर रावणावर विजय मिळवला. म्हणून या एकादशीला विजया किंवा जया एकादशी हे नाव मिळाले.
या बाबतीत आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा इंद्राच्या नंदनवनात माल्यवान नावाच्या गंधर्वाचे गायन चालले होते आणि पुष्पावती नामक अप्सरेचे नृत्य सुरू होते, पण हे दोघेही भोवतालचे भान विसरून परस्परांशी अनुरक्त झाले. दोघांचेही सूर ताल चुकले. त्यामुळे इंद्र देवाने त्यांना पिशाच्च होण्याचा शाप दिला. ते पिशाच्च होवून हिमालयातील एका वृक्षावर राहू लागले. भयंकर थंडी आणि अन्नाची कमतरता यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. एके दिवशी तर त्यांना पूर्ण निर्जळी उपवास घडला. योगायोगाने त्यादिवशी माघ महिन्यातील एकादशी होती. या एकादशीच्या पुण्यप्रभावाने त्यांची पिशाच्च योनीतून सुटका झाली. आणि परत ते आपल्या स्थानी गेले. त्यामुळे ही एकादशी सर्व पापहरण करणारी व मोक्ष देणारी मानली जाते. ही एकादशी केल्यास यज्ञ, दान, जपाचे पुण्य मिळते.
या एकादशीला वारकरी संप्रदायात ही फार महत्त्व आहे. ही चार मोठ्या वाऱ्यांपैकी एक आहे. या एकादशीला इंद्रियांवर विजय मिळवून विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर जन्मोजन्मीचे पाप फिटते. ज्यांना आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला पंढरपूरला यायला जमले नाही ते वारकरी ही माघी एकादशीची वारी करतात. त्यामुळे आज पंढरीत वैष्णवांचा मेळा जमतो. चंद्रभागेचे स्नान, अभंग आणि टाळमृदंगाच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा, श्री विठ्ठल दर्शन करून वारी संपन्न होते.
शिवाय आज माघ शुद्धएकादशी हा हा प्रल्हाद महाराज बडवे यांच्या पुण्यतिथीचा पवित्र दिवस! भागवत पुराणातील दशम स्कंध देवाला ऐकवत असताना त्यांनी प्राण त्याग केले. त्याठिकाणी विठ्ठलाच्या सभामंडपात त्यांचे स्मृती वृंदावन आहे. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव तीन दिवस चालतो.
वसंत पंचमी पासून केशर पाणी शिंपडलेल्या पांढऱ्या शुभ्र पोशाखात सजलेल्या विठू माउलीचे दर्शन घेऊन
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!!!
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.
9403554167.

Comments
Post a Comment