अधिक देखणे तरी निरंजन पाहणे.


 *अधिक देखणे तरी निरंजन पाहणे*


आपण जन्माला येताना आपलं पूर्वसुकृत घेऊन येत असतो. माझ्या सुकृताचं संचित नक्कीच बरं असावं याचा प्रत्यय मला वारंवार येतो. आताच घडलेली घटना पहा ना!! मी एका पुरस्काराच्या निमित्ताने अहिल्यानगरला गेले होते. जवळच असलेल्या प्रवरा काठच्या नेवासे या शांत, निरामय स्थानाची अकल्पित भेट घडली.  इथे आहे एक अनलंकृत  तरीही विलक्षण चैतन्यदायी असा खांब!! त्याला 'पैसाचा खांब' असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या खांबाला टेकून विश्व वंदनीय ज्ञानेश्वरी, हरिपाठ,अमृतानुभव असे अजरामर साहित्य लिहिले त्या अद्भूत पैसाच्या खांबाचे दर्शन घडणे हे केवळ पूर्वसंचितच!!  त्या खांबाला स्पर्श केला आणि अक्षरशः अंगातून एक आनंद लहर सरसरली!!माऊलींना स्पर्श केल्याची अनुभूती आली! त्या स्थानापासून हलावेसे देखील वाटेना. माऊलींनी जिथे पाठ  टेकवली होती तिथे मी हळुवार असा हात फिरवला. त्या खांबाला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचा स्पर्श झाला होता!! किती जिवंत आणि साक्षात्कारी हा खांब आहे असे मनात आले. समोर श्रोतृवृंद बसला आहे. सच्चिदानंद बाबा तन्मयतेने करवीरेश्वराच्या साक्षीने माऊलींच्या मुखातून आलेले अलौकिक शब्द लिहून घेत आहेत. मोठे भावपूर्ण वातावरण आहे. असे सारे मनःचक्षूने अनुभवले.  खांबावर कोरलेल्या अक्षरांवर आणि डाव्या बाजूला कोरलेल्या चंद्र सूर्यावर चंदनाचे लेपन केले होते. उंचीने कमी असलेला अतिशय साधा असा हा खांब पूर्वी करवीरेश्वर मंदिराचा भाग होता. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले पण हा अचल, अविनाशी खांब काळाला आव्हान देत तिथेच ठामपणे उभा आहे. मंदिराच्या बाहेर शेजारी करवीरेश्वराची पिंडी आहे. 

 त्रिभुवनैक पवित्र ।अनादी पंचक्रोश क्षेत्र। जेथे जगाचे जीवनसूत्र। श्री महालया असे।।’ असे ज्ञानेश्वरीत माऊलींनी या स्थानाचे वर्णन केले आहे.


 पैठणवरून शुद्धिपत्र घेऊन निवृत्तीनाथ, ज्ञानदेव ही भावंडे  आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा इथे आली.  गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत, रम्य परिसर पाहून तिथे रमली. या भावंडांनी जवळजवळ दोन अडीच वर्षांचा काळ इथे व्यतीत केला. या ठिकाणी  करवीरेश्वराचे मंदिर होते. मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधू आणि गुरू निवृत्तीनाथ यांच्या अनुज्ञेवरून ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ इत्यादी ग्रंथांची निर्मिती केली. करवीरेश्वराचे मंदिर कालौघात नष्ट झाले. पण मंदिरातील हा खांब मात्र त्याचे अस्तित्व टिकवून, त्याचे अलौकिक तेज सांभाळून आजही ठामपणे उभा आहे. 

ही घटना आहे शके १२१२ सनाची! 

ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत  शके १२१२ (इसवी सन १२९०)  ‘शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंद बाबा आदरे । लेखकू जाहला। ’असा उल्लेख केला आहे. 

करवीरेश्वराला अखंड तेलवात करण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख करणारा शिलालेख खांबावर कोरलेला आहे. खांबासाठी मंदिर असणारे हे जगातील एकमेव ठिकाण होय. पैस म्हणजे विस्तारणे! इथे लिहिलेली ज्ञानेश्वरी जगभर विस्तारली आहे! 

या ठिकाणी मंदिर व्हावे असा ध्यास घेतलेले श्री बन्सी महाराज तांबे यांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन हे ज्ञान मंदिर साकारले. मंदिराचे उद्घाटन नाथषष्ठी नंतर येणाऱ्या फाल्गुन वद्य एकादशीला श्री धुंडामहाराज देगलूरकर यांच्या प्रवचनाने झाले. 

आम्ही आलो त्यावेळी मंदिरात ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू होते.  मी परत परत दर्शन घेतले. खांबाला चहूबाजूंनी स्पर्श करून माऊलींचे अस्तित्व अनुभवले. बाहेर येऊन करवीरेश्वराचे दर्शन घेतले. आता पसायदान सुरू झाले. त्यांच्या स्वरात स्वर मिसळून आम्ही पण पसायदान म्हटले. माऊलींचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये असा आग्रह झाला. आणि ध्यानीमनी नसताना आम्हांला माऊलींच्या प्रसादाचा लाभ झाला. पंढरीची माहेरवाशीण आणि रूक्मिणी मातेची पुजारी उत्पात या सुकृताने तिथे माझा सत्कार केला. रूक्मिणी मातेचे स्वयंवर निरूपण तिच्या वरील नितांत श्रद्धेपोटी मी करते त्याचे फळ मिळाले. माऊलींनी ये हृदयीचे ते हृदयी घालून निर्मळ प्रसाद दिला.

 

*अनंगपण फिटले मायाछंदा साठविले।*

*सकळ देखिले आत्मस्वरूप वो माये।।!!* 


मीरा उत्पात-ताशी, 

कोल्हापूर.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.