पावे जिवलगा.
*पावे जिवलगा*
एक ताजी वाऱ्याची झुळूक चंद्रभागेच्या नितळ पवित्र पाण्यावरून, काठावरच्या रेशमी मऊशार वाळू वरून, समोरच्या पुंडलिकाच्या शिखराला वळसा घालून हळूहळू पुढे सरकायला लागायची. वाटेत तिला नित्यनेमाने चंद्रभागेच्या स्नानाला येणारे गावकरी, वामांगी रखुमाई घेऊन अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माला भेटायला आलेले वारकरी, कुठलाही विकार डोळ्यात, मनात न आणता स्नान करणारे स्त्री, पुरुष,लहान मुलं, काठावर उभ्या असलेल्या डौलदार नावा, त्यांना सावरणारे नावाडी, पुंडलिकासमोरच्या चौफाळ्यावर धार्मिक विधी करणारे यजमान असे सारे भेटायचे..या साऱ्या गोतावळ्याला स्पर्श करत समोर पसरलेल्या वाळवंटातून महाद्वार घाटाच्या प्रशस्त दगडी पायऱ्यांवरून अलवारपणे ती वर यायची. घाटाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दोन भव्य शिंदे सरकार आणि होळकर वाड्यावरुन ती महाद्वार वेशीकडे यायची. वाटेतल्या सनातन पिंपळपानांशी हळुवारपणे हितगुज करून, पारावर बसलेल्या माणसांची वास्तपुस्त करून भव्य महाद्वार वेशीवर ती थबकत असे. तिच्यात डेक्कन अगरबत्तीचा, अकरा रूद्र मारूतीला वाहिलेल्या रूई कण्हेरीच्या फुलांचा, समोर तेवणाऱ्या दिव्याचा, नुकत्याच ओवाळलेल्या कापराचा, लगतच्या कवठेकरांच्या दुकानातील काष्ठौषधींचा गंध मिसळत असे. शेजारच्या तांबट गल्लीतल्या ठोक्यांची लय घेत ती पुढे येताना उजवीकडे मल्लिकार्जुन मंदिराकडे कटाक्ष टाकून पेढ्यांचे, चुरमुरे बत्ताशाच्या प्रसादाचे, कुंकू बुक्क्यांचे, माळीणींनी रचून ठेवलेल्या तुळशीच्या, कणेरीच्या हारांचे गंध स्वतः मध्ये मिसळवून उजवीकडील चोखामेळ्याच्या समाधी वरून ती नामदेव पायरीला स्पर्शून, आतल्या गणपतीला नमस्कार करून, दीपमाळेला, गरूड हनुमंताला वळसा घालून विठुरायाच्या भेटीला जात असे. जणू काही तिला या सगळ्या वस्तूमात्रांचे स्पर्श वाहून आणून विठ्ठला पर्यंत पोहोचवायचे होते..किती लोभस.. साधं सरळ होतं हे जग!! निर्लेप.. निष्पाप.. अनघ...
आता काळाने एक अनवट वळण घेतलं आणि सारं काही आमुलाग्र बदलू लागलं.
एकीकडे हे मी अनुभवलेलं, नित्य पाहिलेलं, गतकाळातलं कापरासारखं उडून गेलेलं वैभवशाली जग अन् दुसरीकडं वर्तमानातलं प्रत्येक बाबतीत वखवखलेलं जग...
माणसांचा समुद्र आपल्या अजस्त्र लाटांनी सगळ्यांना कवेत घेतो आहे. वाटेत येणाऱ्या उंबऱ्यांना गिळत पुढे पुढे सरकतो आहे. सनातन खोल रुजलेली मुळं उखडून पुढे पुढे सरकण्याची त्याची हाव वाढली आहे!!
आता इथं देवळात जगभरातनं माणसं यायला लागली आहेत. गर्दी नुसती ओसंडून वाहते आहे.. देवळातल्या पुरातन खाणाखुणा उखडून टाकल्या जात आहेत... सन्मुख उभ्या असलेल्या गरूड हनुमंताला खांबाच्या आड ढकलले आहे... विचारायचे कोणी कुणाला?? हाच निरूत्तरीत प्रश्न आहे!! आपला आवाज उच्च पदस्थांच्या कानापर्यंत पोहचू शकणार नाही एवढा प्रचंड कोलाहल भोवताली आहे!!! म्हणून उत्तर मिळायला हवं..या अट्टाहासाचा काही उपयोग नाही हे पाहून मन विषण्णतेच्या गर्तेत खोल खोल रूतत चाललंय!!!
गरीबांचा, भाव भक्तीचा भुकेला विठुराया फार फार श्रीमंत झाला आहे. सगळीकडे नुसती आरास..पाना फुलांची,रसरसलेल्या फळांची...अन् पावलांपावलांवर श्रीमंताच्या खुणा!!
श्रीमंतीच्या गर्दीत वामांगी रखुमाईसह माझा विठ्ठल गुदमरून गेला आहे. तो आता उराउरी भेटत नाही. हताशपणे नुसता दुरूनच पाहतो. बा विठ्ठला तोड ना रे.. हे सारे बंध अन् भेट ना पूर्वी सारखा!! अस्वस्थ आहे रे मी.. का एवढा श्रीमंत झालास? लाडू पेढ्यांनी नाही तर भावाने तोषणारा, अत्तराने नाही तर तुळशीच्या सुगंधाने तृृप्त होणारा, आषाढी कार्तिकी विसरू नका मज असे आर्जव करणारा विठ्ठल कुठे गेला आहे? तुझे दर्शन नाही तरी तुझ्या भोवताली राहून तरी समाधानी होतो.. आता तर तुझ्या भोवताली राहण्याचे सुखही ओरबाडले जाते आहे..आधी आमच्या पासून तुला तोडून टाकले आणि आता आमचे अस्तित्व पुसले जाणार आहे तरीही तू निवांतपणे पाहतो आहेस..
*पतितपावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा*
*पतितपावन नव्हेसी म्हणोनि जातो माघारा*
असे म्हणायची वेळ आणू नकोस..
तुझ्या पासून आम्हाला दूर करायला सरसावलेल्या हातांना बळ नको देऊस. अनादी काळापासून आजपर्यंत विरघळून आलेले हे सगळं निरंतर असंच चालू दे...
हीच आजच्या कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वकाळी तुझ्या चरणी प्रार्थना!!
मीरा उत्पात-ताशी,
9403554167.

Comments
Post a Comment