यशोगाथा "गीता प्रेस गोरखपूरची"या श्री विद्याधर ताठे लिखीत ग्रंथास ठाणे साहित्य संघाचा साहित्य पुरस्कार.
विद्याधर ताठे लिखित 'यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची' ग्रंथास ठाणे ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य पुरस्कार'
पंढरपूर (प्रतिनिधी )
थोर ग्रंथकार, 'महाराष्ट्र सारस्वत'कार वि.ल. भावे यांनी १३० वर्षापूर्वी स्थापन केलेल्या 'ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय' या साहित्यसंस्थेचे २०२४चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार रविवार दि.५ ऑक्टोबर रोजी, प्रसिद्ध कादंबरीकार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते, महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालयाचे उपसंचालक श्री प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. त्यामध्ये इतिहास विभागात, यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक पंढरपूर चे सुपुत्र श्री विद्याधर ताठे लिखित 'यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची' या ग्रंथास पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाण्याच्याच परममित्र प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला असून रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांची या ग्रंथास प्रस्तावना लाभलेली आहे.
उत्तर प्रदेशातील थोर संत गोरक्षनाथांची नगरी गोरखपूर येथे इ.स. १९२३ साली स्थापन झालेल्या गीता प्रेसने गेल्यावर्षीच शताब्दी पूर्ण केली असून आजवर सुमारे ९२ कोटी पुस्तके छापून विक्री करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. स्व. जयदयाल गोयंका, स्य. हनुमान प्रसाद पोद्दार आणि स्व. घनश्यामदास जालान या आत्मलोपी, श्रीमद् भगवद् गीता सेवा समर्पित श्रद्धावंत त्रिमूर्तीने या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे प्रकाशित 'कल्याण' या हिंदी मासिकाचीही यंदा शताब्दी साजरी होत असून शंभर वर्षे अव्याहत प्रकाशित होणाऱ्या या अध्यात्मिक मासिकाचे देशभर सुमारे अडीच लाख वर्गणीदार आहेत. इतके वर्गणीदार असलेले ते जगातील सर्वाधिक वर्गणीदार असलेले ऐतिहासिक, अध्यात्मिक मासिक आहे. आदि संपादक हनुमानप्रसाद पोद्दार यांच्या कुशल संपादना खाली प्रकाशित 'कल्याण' मासिकाचे, हिंदी साहित्य जगतात विशेष योगदान आहे. देश-विदेशातील विद्यापीठामध्ये 'कल्याण' आणि 'कल्याण कल्पतरू' (इंग्रजी) ही मासिके विद्वान चिंतकांसाठी वैदिक वाङ्मयाचे संदर्भसाहित्य म्हणून जतन केली जातात. अशा एका ऐतिहासिक प्रकाशन संस्थेचा इतिहास आपणास 'यशोगाथा : गीता प्रेस गोरखपूर' ची या ग्रंथात वाचावयास मिळतो. ठाणे ग्रंथ संग्रहालयाने पुरस्कारांमध्ये कथा, कादंबरी, बरोबरच 'इतिहास' विभागातील पुस्तकांची विशेष दखल घेतली आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रमुख पाहुण्या कदयित्री नीरजा म्हणाल्या. श्री. प्रशांत पाटील यांनी पुरस्कार प्राप्त लेखकांचे अभिनंदन करून शासनाच्या ग्रंथोत्तेज योजनांची माहिती दिली.
या ग्रंथाचे लेखक विद्याधर ताठे यांच्या समवेत परममित्र प्रकाशनच्या प्रकाशिका स्वाती जोशी यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्री. विद्याधर ताठे यांची 'देवर्षी नारद', 'संतकवी श्रीधर', 'संतसाहित्यातील रामदर्शन', 'भेटवा विठ्ठला', 'संत जनाबाईंचे विचारविश्व', 'साई माझा सांगाती', 'शिवोपासना', 'समाजभूषण नामदेवराव रुकारी' आदी अनेक पुस्तके प्रसिद्ध असून त्यांच्या ग्रंथांना यापूर्वी ज्ञान प्रबोधिनी पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, नगर वाचन मंदिर, पुणे, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे अशा अनेक मान्यवर साहित्यसंस्थांचे साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment