खग्रास चंद्रग्रहण.


 *ग्रहण*


आज खग्रास चंद्रग्रहण! एक खगोलीय घटना! आपल्याकडे पूर्वापार या खगोलीय घटनेला धार्मिक अधिष्ठान आहे. अनेक मिथक कथा जोडलेल्या आहेत. चंद्र किंवा सूर्य ग्रहण असले की माई म्हणायची आज राहू केतू चंद्राला, सूर्याला गिळणार आहेत. मी का म्हणून विचारल्यावर माई त्याची कथा सांगायची. समुद्र मंथनातून निघालेले अमृत पिण्यासाठी देवतांच्या रांगेत राहू हा राक्षस चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसला. हा देव नसून राक्षस आहे हे सूर्य चंद्राच्या लक्षात आले. त्यांनी भगवान विष्णूंना हे सांगितले. विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. आणि शरिराचे दोन भाग झालेले पण त्याने अमृताचा घोट घेतला होता म्हणून ते दोन भाग अमर झाले. त्याचे शिर राहू झाले.  आणि धड केतू!! या घटनेचा सूड म्हणून वर्षातून एक दोन वेळा राहू केतू चंद्र सूर्याला काही वेळ गिळतात. आणि ग्रहण होते. हे ऐकून मला वाटायचे की हा राहू किती बलवान आहे! मग मी या राहू केतूचा शोध सुरू केला. ते छायाग्रह आहेत. ते सौरमालेत दिसत नाहीत.  असे पुढे शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकातून कळाले. तरीही ग्रहण आले की माईनी सांगितलेले खरे वाटायचे. ग्रहण लागायच्या आधी वेध सुरू होत. वेध लागायच्या आधी जेवून घ्यायचे. उरलेले अन्न दान करायचे.चंद्राला किंवा सूर्याला गिळणाऱ्या राहुकेतूला पिटाळण्यासाठी दानधर्म करायचा असे तिचे म्हणणे असे. पंढरपूरला आमच्याकडे ग्रहणाच्या दिवशी 'दे दान सुटे गिराण' असे म्हणत अनेक याचक दारात येत असत. माई आम्हाला त्यांना देण्यासाठी जुने कपडे, अन्न, धान्य घेऊन दारात उभे करत असे. ग्रहण लागल्या पासून ते संपेपर्यंत अनेक जण येत. त्याआधी पाण्यात, सगळ्या धान्यात, खरकट्या नसलेल्या पदार्थात तुळशीची पाने घालून ठेवावी लागत. त्यासाठी देवळातून विठ्ठलाच्या किंवा रुक्मिणीच्या गळ्यातला तुळशीचा हार आणायचे काम आम्हाला करावे लागे. ग्रहणात स्पर्श आणि मोक्षाचे असे दोनवेळा स्नान करायचे असे. 

देवळात विठ्ठल रुक्मिणी ला सुद्धा ग्रहण स्पर्श झाला की चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाई. आणि सुटल्यावर परत चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालून नित्योपचार सुरू होत. 

ग्रहण स्पर्श झाला की माई बरोबर चंद्रभागेला स्नान करायला जावे लागे. त्यावेळी अनेक साधू संन्यासी चंद्रभागेत उभे राहून अर्घ्य देत असत. मंत्रांचे पुरश्चरण करत असत. मी का म्हणून विचारले की माई म्हणे ग्रहणात आपल्याकडे असणाऱ्या विद्येचे पुरश्चरण करावे लागते. नाहीतर त्या विद्येचे सामर्थ्य संपून जाते. आम्ही 

 ग्रहण संपल्यावर परत स्नान करायला गेल्यावरही ते अजून तिथेच असत. 

त्यात साप पकडणारे आमचे संकी बाबा ही असायचे. 

ग्रहण संपल्यावर माईची पिठलं भात करायची घाई सुरू होई. त्यादिवशी ग्रहणाला पिटवून लावण्यासाठी पिठलं भात करायचा असा तिचा नियम होता. स्नान करून गरम पिठलं भात खाऊन ग्रहणाच्या गोष्टी ऐकत ग्रहणाचे पुराण संपून जाई. 

आताच्या विज्ञाननिष्ठ जगात आजच्या पिढीला ही ग्रहणाची गंमत नाही कळणार!


मीरा उत्पात-ताशी,

9403554167.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.