कॉरिडॉर रद्द करण्यासाठी महिलांचे अनोखे आंदोलन, रक्ताचा टिळा लावून केली मागणी, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविल्या नो कॉरिडॉर च्या राख्या.
कॉरिडॉर रद्द करण्यासाठी महिलांचे अनोखे आंदोलन
पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या, रक्ताचा टिळा पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या फोटोला लावून केली मागणी.
प्रतिनिधी
पंढरपूर- ज्या लाडक्या बहिणींनी देवा भाऊच सरकार याव यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरांवर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडोर नो डीपीच्या राख्या पाठवून अनोखे आंदोलन केले.
येथील श्रीकृष्ण मंदिरा समोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलने देखील केली जात आहेत. काॅरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो कॉरिडॉर नो डीपी चे लेबल लावलेल्या राख्या तयार केल्या होत्या. सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठविण्यात आल्या. तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्तांचा टिळा लावला तसेच ओवाळून नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या देखील बांधल्या.
तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा, लाडक्या बहिणींला ओवाळणी कॉरिडॉरची करा बोळवणी आदी घोषणा दिल्या.
याबाबत बोलताना भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी, लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून तसेच राज्यात पुन्हा देवा भाऊंचे सरकार यावे यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते. मात्र हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे. यास आमचा कडाडून विरोध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
चौकट
: रक्ताचा टिळा लावून कॉरिडॉर रद्द करण्यासाठी मागणी_
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रक्ताचे पाणी करून माता भगिनी यांनी भाजप ला
मतदान केले आहे,
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी माता भगिनी यांनी देव पाण्यात ठेवले होते,
आमची देवा भाऊ यांना एकच विनंती आहे त्यांनी आमची एकदा भेट घ्यावी,
आम्हा महिलांचे म्हणणे ऐकावे, देवाभाऊ हे कुटुंबवत्सल असून लाडक्या बहिणीची मागणी मान्य करतील,
कॉरिडॉर ची गरज नसताना श्रद्धा, प्रथा, परंपरा पायदळी तुडवून सर्वनाश करू नये.
डॉ प्राजक्ता बेणारे.
सदस्य तीर्थक्षेत्र बचाव समिती.
भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा.
पंढरपूर.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment