अनंतपूर उर्फ अंतापूर. श्रावणी सोमवार विशेष.


 *अनंतपूर ऊर्फ अंतापूर* 


 *निर्गुणींचें वैभव आलें भक्तीमिषें।*

 *तें हें विठ्ठलवेषें ठसविलें।।* 

निर्गुण परमात्म्याचे वैभवच पुंडलिकाच्या भक्तीच्या निमित्ताने पंढरपूरला येऊन विठ्ठल रूपाने साकार झाले. 

या स्थानाचे महात्म्य इतके अलौकिक आहे की इथल्या तृणांकुरात आणि पाषाणातही देवत्व भरलेले आहे.

 *ऐका पंढरीचे महिमान।* *राऊळ तितके प्रमाण।* *तेथील तृण आणि पाषाण।* 

*ते ही देव जाणावे।।*

ही पंढरी म्हणजे जणू भूवैकुंठच!! इथल्या सारखा आनंद त्रैलोक्यात नाही. भक्तांना तोषवणाऱ्या विठ्ठलाची ओढ माणसांना तर आहेच पण स्वर्गीय देवांनाही त्याची ओढ आहे. म्हणून स्वर्गीचे देव इथे पंढरपुरात नित्य वास्तव्यास आले आहेत. सर्व देव आणि तीर्थे यांची एकाच स्थानी वस्ती या क्षेत्राशिवाय अन्यत्र कोठेही नाही. गयासुराला दिलेल्या वरामुळे त्रैलोक्यात असलेले सर्व देव, तीर्थे, गंगादिक महानद्या, पुण्यकारक सरोवरे पंढरपुरात आहेत‌‌. भारतवर्षातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगेंही पंढरपुरात आहेत. त्यातील एक म्हणजे अनंतपूर‌‌. कालौघात अनंतपूरचे बोलीभाषेत अंतापूर हे नाव रूढ झाले‌.

*तदग्रेऽनंततीर्थे तु अनंतफलंद नृणां।*

*स्नात्वा तत्र शंभुपूजां यः करोति महामतिः।* 

*तस्य जन्मभयं नास्ति मुक्तिभागि भवेत्धृवं।।*

 ‌ हे स्थान हिमालयातील केदारेश्वराचे आहे.

अंतापूर कैलासपती महादेवाचे स्थान गोपाळपूर पासून पुढे रांजणी रस्त्यावर चंद्रभागेजवळ आहे. चंद्रभागेच्या या स्थानाला सोमतीर्थ असे म्हणतात.  

अंतापूर महादेवाचे मंदिर छोटेखानी आहे. दोन तीन  पायऱ्या चढून गेल्यावर लहानसा सभामंडप आहे. आत गर्भगृह आहे. गर्भगृहात सुरेख स्फटिकाचे लिंग आहे. हा महादेव हिमालयातील केदारनाथ असल्याने स्फटिकाचे शिवलिंग आहे.  

मंदिराच्या पायऱ्यांजवळ दोन वीरगळ आहेत. समोर सतत पेटलेली धुनी आहे. मंदिराच्या आवारात आता सभोवताली शेती आहे.  पूर्वी दाट झाडी होती. या आवाराला प्राचीन काळी आनंदवन असे नाव होते. निसर्गरम्य असे हे स्थान मनाला संतोष देणारे आहे. चंद्रभागेत स्नान करून या महादेवाचे पूजन केले असता मनुष्य सर्व पातकांपासून मुक्त होऊन मोक्ष पदास जातो अशी धारणा आहे. इथे श्रावण सोमवारी, महाशिवरात्रीला भक्तांची गर्दी असते.

पद्म पुराणात शिवपार्वती संवादात भगवान शंकर पार्वती देवीस म्हणतात ' पंढरी क्षेत्र हे दक्षिण काशी आहे. इथे असलेल्या सर्व शिवलिंगाच्या ठायी माझा वास आहे.' त्यामुळे पंढरपुरातील भाविक भक्त श्रावण सोमवारी जमतील त्या महादेवाचे दर्शन घेतात..


मीरा उत्पात-ताशी,

९४०३५५४१६७.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.