श्रीयाळ शेठ.


 *श्रियाळ शेठ*


सणांचा उत्सव असणारा महिना म्हणजे श्रावण!! श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची काही ना काही महती आहे. कथा कहाणी आहे. त्यामुळे श्रावण रोज काहीतरी नवीन घेऊन येतो. नागपंचमीला नाग देवतेचे पूजन केल्यावर दुसऱ्या दिवशी श्रियाळ षष्ठी येते. हा दिवस श्रियाळ राजा आणि राणी चांगुणा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. हा श्रियाळ राजा अतिशय दानशूर होता. शंकराचा निस्सीम भक्त होता. आमच्या कडे पंढरपूरला या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. पूर्वी देवळात रूक्मिणीमातेच्या सभामंडपात चंद्रभागेचे पाणी आणि नदीतल्या गाळाच्या मातीपासून तयार केलेली सुबक सुंदर गौर चांगुणा श्रियाळ राजा सह बसवली जायची. हत्ती वर बसलेली गौर खूप देखणी दिसायची. गावातील महिला, मुली गौरीचे दर्शन घ्यायला यायच्या. सभामंडपात फेर धरून गाणी म्हणायच्या. मेंदीभरले हात, नव्या बांगड्या, ठेवणीतल्या साड्या, भेटलेल्या मैत्रीणी आणि समोर तेजस्वी गौर अगदी उत्साही वातावरण असायचे. संध्याकाळी वाजतगाजत श्रियाळ राजा सह गौरीची मिरवणूक निघायची. चंद्रभागेत तिचे विसर्जन व्हायचे. 

श्रियाळ षष्ठीची आणखी एक अशी कथा आहे.

सहाशे सातशे वर्षांपूर्वी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात सलग बारा वर्षे भयंकर दुष्काळ पडला. त्यामुळे प्रजेचे अतिशय हाल होऊ लागले. प्यायला पाणी नाही. शेती पिकली नाही. खायला अन्न नाही. माणसे, गुरे तडफडून मरू लागली. तेव्हा त्या भागात  श्रियाळ शेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी रहात होता. बोली भाषेत श्रियाळचे शिराळ शेठ असे नाव पडले आहे. तो  अतिशय उदार होता. त्याने ही सारी दशा पाहिली अन् अस्वस्थ झाला. मग त्याने आपल्या जवळचे अन्नधान्य जनतेला वाटून टाकले. परराज्यातून आणखी धान्य आणले आणि समस्त प्रजेची भूक भागवली. त्यामुळे लोक त्याचा जयजयकार करायला लागले. ही बातमी राजा पर्यंत पोहोचली. त्यावेळी या भागावर बहामनी राज्यसत्तेचा अंमल होता. शिराळ शेठ च्या लोकप्रियतेमुळे  बादशहा अस्वस्थ झाला. त्याने  शिराळ शेठला पकडून आणण्याचे फर्मान सोडले. शिपायांनी शिराळशेठला बादशहा पुढे हजर केले. बादशहाने त्याला जाब विचारल्यावर तो म्हणाला "राजा आपले कर्तव्य विसरलाय त्याच्यामुळे मला हे काम करावे लागले."

त्याच्या उत्तरामुळे आणि केलेल्या कामामुळे बादशहा प्रसन्न झाला आणि म्हणाला "तुला काय हवे ते माग."  तेव्हा शिराळ शेठने त्याला औट घटकेचे राज्य मागितले. या औट घटकेच्या राज्यात त्याने प्रजेसाठी काढलेले फर्मान, घेतलेले निर्णय कायम ठेवण्याचे वचन घेतले. मग शिराळ शेठने राज्यात विहिरी खोदणे, तलाव बांधणे, झाडे लावणे, अन्नधान्याचे कोठार खुले करणे असे अनेक लोकोपयोगी आदेश काढले. याचा दूरगामी परिणाम होऊन दुष्काळाची स्थिती सुधारली. आणि राज्यातील जनता सुखी झाली. 

या शिराळ शेठने केलेल्या समाजोपयोगी कार्याची आठवण म्हणून श्रियाळ षष्ठी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. 

आज आमच्या उत्पातांच्या रूक्मिणी मंदिरात गौरी सह श्रियाळ राजाची स्थापना केली जाते. संध्याकाळी प्रदिक्षणा रोडवरून भव्य मिरवणूक निघते. जागोजागी थांबून लोक त्यांचे दर्शन घेतात. चंद्रभागेत तिचे विधीवत विसर्जन होते. संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम असतो. हा सोहळा अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखा असतो!! 


मीरा उत्पात-ताशी, 

9403554167

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.