प्रक्षाळपूजा
*प्रक्षाळपूजा*
आज प्रक्षाळपूजा!! त्यानिमित्ताने आठवणींचे काही जुने क्षण भोवताली रेंगाळू लागले...
लहानपणी अनुभवलेले हे क्षण अत्तराच्या फाया प्रमाणे आहेत. फायात बुडालेले अत्तर कालमानाप्रमाणे उडून गेले पण आठवणींचा सुगंध मात्र आजही दरवळतो आहे!!
काल्याचा प्रसाद घेतल्यावर पंढरीची वारी सुफळ संपूर्ण होते.
पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात.
*पंढरीहुनि गावा जाता। खंती वाटे पंढरीनाथा।*
सारेजण आपापल्या गावाला निघाल्यामुळे देवाला वाईट वाटतं आहे. निळोबाराय म्हणतात
*निळा म्हणे पंढरीनाथा। चला गावा आमुच्या आता।*
असे देव आणि भक्त दोघेही सद्गदित होऊन एकमेकांचा निरोप घेतात.
वारी सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. विठुराया सुद्धा रात्रंदिवस भक्तांना दर्शन देऊन थकून गेलेला आहे. आता त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रक्षाळ पूजेचे आयोजन केले जाते. इतके दिवस रात्रंदिवस लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे देऊळ घाण झालेले आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण देऊळ धुऊन विठ्ठलाचे उष्णोदकाने अंग शेकवून त्याला विश्रांती द्यायची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. महाद्वार काल्यानंतर विशिष्ट नक्षत्र, तिथी,शुभ मुहूर्त काढून प्रक्षाळ पूजेचे आयोजन केले जाते. आदल्या दिवशी संध्याकाळी देवाला द्वितियेपासून लावलेला लोड आणि रूक्मिणी मातेला लावलेला तक्क्या काढून मातेला आणि विठ्ठलाला सुंगधी, औषधी तेलाने मर्दन केले जाते. रात्रभर त्यांना उबदार शालीत लपेटून ठेवले जाते. उठल्यावर पहिल्यांदा औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवून मग मुखप्रक्षालन केलं जातं. तो काढा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो.. काहीजण तर तो वर्षभर बाटलीत भरून ठेवतात. आजारी पडल्यावर याचा एक घोट घेतला की सगळे रोग दूर पळतात ही पंढरपुरातल्या लोकांची नितांत श्रद्धा आहे. प्रक्षाळपूजेच्या दिवशी सकाळपासून गावातले नागरिक विठ्ठल-रुक्मिणी मातेला लिंबू साखर लावण्यासाठी येतात. दुपारी दोनच्या सुमारास पवमान पंचसूक्ताच्या अभिषेकाला सुरूवात होते. साखरेने देवाला, रूक्मिणी मातेला चोळून उष्णोदकाने स्नान घातले जाते. द्वितीये पासून लाखो वारकरी आल्यामुळे देऊळ घाण झाल्याने स्वच्छ धुऊन संपूर्ण देवळाची स्वच्छता केली जाते. पूर्वी हत्ती दरवाज्याजवळ बडवे मंडळी आणि रूक्मिणीमातेच्या सभामंडपात उत्पात मंडळी प्रक्षाळपूजेचा फार मोठा सोहळा करत असत. मोठ्या चुलवणावर मोठमोठे पितळी पातेले, हंडे यामधून पाणी गरम करायला ठेवलेले असे. देवाला कढत पाण्याने अभिषेक झाल्यावर समस्त बडवे आणि उत्पात मंडळी गरम पाणी एकमेकांवर उधळत. विठ्ठलाच्या, मातेच्या जयजयकारात स्नान होई. याला 'पाणी पडले' असे म्हटले जाते. प्रत्येकाने बरोबर आणलेल्या कासंडीतून, छोट्या कळशीतून पाणी भरून घरी नेले जाई. घरातली माणसं या पाण्याने हात पाय धुवून डोळ्याला पाणी लावून नमस्कार करत. आमच्या घरी माई केव्हाची पाणी पडण्याची वाट पहात असे. गल्लीत कोणीतरी कासंडीतून लगबगीने पाणी नेताना दिसले की ती आई काकूला नैवेद्य वाढायला घेण्याविषयी सूचना देई. त्या दिवशी दहा पंधरा नैवेद्य असत. आधी देवळात देवाला, आईसाहेबांना नैवेद्य दाखवल्यानंतर गावातील कोले, कोंडेवार वगैरे मंडळींना प्रसादाचा नैवेद्य दिला जाई. त्या दिवशी जेवणाची पहिली पंगत बसायलाच चार साडेचार वाजत असे. घरच्या मंडळींबरोबरच आप्तस्वकीय पंगतीला असत. सकाळपासून थकलेल्या स्त्रियांना जेवण्यासाठी संध्याकाळचे सात साडेसात वाजत. माळी, गवळण बाई, भाजीवाला अशा अनेक लोकांना प्रसादाचे अन्न वाढून दिले जाई. दुसऱ्या दिवशी पासून देवळाभोवती राहणाऱ्यांचा चातुर्मास सुरू होई. आता कालमानाप्रमाणे फरक पडत आहे.
प्रक्षाळपूजा झाल्यावर देवाला, आईसाहेब रूक्मिणी मातेला भरजरी पोशाख, अलंकार घातले जातात. यादिवशी देवाचे रूप पाहण्यासारखे असते. रात्री त्यांना शेजारती करून निद्रेसाठी नेले जाते. आता निजताना परत सुंठ, पिंपळी, दालचिनी, मिरे, लवंग, गवती चहा, तुळस अशा औषधी वनस्पती घातलेला काढा शिणवटा काढण्यासाठी दिला जातो. आता उद्यापासून देवाचे नित्योपचार सुरू होतील.. आणि पंढरपूरात चातुर्मास!!!आता चार महिने पंढरपूरात भजन कीर्तन प्रवचन यांचा अखंड गजर निनादत राहील...
मी जेव्हा विठ्ठलाच्या वर्धिष्णू लोकप्रियतेचा विचार करते तेव्हा तो *'देव'* या पेक्षाही काही वेगळा आहे हेच महत्त्वाचं कारण आहे हे लक्षात येतं. त्यावेळी त्याचं आपल्यातलं असणं इतकं भावतं की तोच सतत भोवताली दिसत राहतो. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तसं
*जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविशी हाती धरोनिया।*
अगदी हाच अनुभव येतो. त्याचं मोहक हास्य लोभावून टाकतं. आपल्या नेत्रकटाक्षानं तो बद्ध करतो. त्याच्या चेहऱ्यावरील बदलते भाव दिसतात. वारीत त्याच्या चेहऱ्यावर आलेला थकवा स्पष्ट दिसतो. वारी झाल्यावर दिलेल्या औषधी काढ्याने त्याचा शिणवटा निघून जातो. तो इतका उदार आहे की आपले सहस्त्र अपराध पोटात घालून लडिवाळपणानं आईसारखं जवळ घेतो. म्हणून तो जीवीचा जिवलग आहे त्याच्या भेटीसाठी आतुरतेने पंढरपुरी कधी एकदा जाईन असं मलाच नाही तर सगळ्यांनाच झालेलं असतं..आता परत नवा चातुर्मास!! अन् नित्य हरिनाम!!...
©️ मीरा उत्पात-ताशी.
9403554167.

Comments
Post a Comment