महाद्वार काला.
*महाद्वार काला*
पाणी भरलेल्या डोळ्यांनी माऊलींना वेशीपर्यंत सोडवून आल्यावर एक उदासीनता वातावरणात भरून राहते. इतके दिवस रंगलेला हा सोहळा कधी संपला हे कळत नाही.. दिवस कसे अत्तरासारखे भराभर उडून गेले असे वाटते!! गोपाळपूरचा काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 'महाद्वार काला' होतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विठ्ठलाच्या सात सेवाधाऱ्यांपैकी एक सेवाधारी म्हणजे हरिदास. देवळात कीर्तन करणे, महापूजेच्या वेळी टाळ वाजवून अभंग म्हणणे ही सेवा त्यांच्याकडे आहे. पूर्वी पंढरपुरात प्राचीन वेशी होत्या. त्यातील एक म्हणजे 'हरिदास वेस'. देवळाकडून हरिदास वेशी कडे जाताना हरिदासांचा सुंदर वाडा आहे.हा 'काल्याचा वाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात 'कान्ह्या हरीदास' नावाचे थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. ते देवळात पहाटे देवाच्या काकड्याला पदे म्हणत असत. त्यांचे *अनुपम्य नगर पंढरपूर* हा अभंग प्रसिद्ध आहे. आज देखील या अभंगानेच विठ्ठलाला जागविले जाते. त्यांच्या वंशातील पांडुरंग महाराजांना विठ्ठलाने प्रसन्न होऊन आपल्या पादुका दिल्या. पांडुरंग महाराज बालपणापासून विठ्ठल भक्त होते. त्यांचा तिन्ही त्रिकाळ चंद्रभागेला जाऊन स्नान करण्याचा नियम होता. एकदा वैशाख महिन्यात ते चंद्रभागेच्या स्नानास गेले असता वरून रणरणते ऊन आणि पायाखालील तप्त वाळू यामुळे त्यांची शुद्ध हरपली. ते वाळवंटातच बेशुद्ध पडले. यावेळी प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना उठवले. डोळे उघडून त्यांनी आजूबाजूला पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. पांडुरंग महाराजांच्या लक्षात आले की ही सारी कृपा विठ्ठलाची आहे. त्यामुळे त्यांनी विठ्ठलाचे दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी प्राण गेला तरी इथून हलणार नाही असा निश्चय करून ते देवाची आर्त आळवणी करत राहिले. विठ्ठल कायम भक्ताच्या अधीन असल्याने आणि महाराजांच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईमुळे विठ्ठल त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याने आपल्या पायातील खडावा पांडुरंग महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या. आणि सांगितले की आषाढी आणि कार्तिकी वारीनंतर या पादुका डोक्यावर धारण करून काल्याचा उत्सव कर. प्रत्येक युगात देवाने आपल्या खडावा लाडक्या भक्तांना दिल्या आहेत. त्रेतायुगात श्रीरामाने भरताला, द्वापार युगात श्रीकृष्णाने उद्धवाला तर कलियुगात विठ्ठलाने पांडुरंग महाराजांना हा प्रसाद दिला आणि पिढ्यानपिढ्या हा उत्सव साजरा करण्याचा आशीर्वाद दिला. या पादुका काल्याच्या वाड्यात आहेत. महाद्वार काल्याच्या दिवशी या पादुका कान्ह्या हरिदास यांच्या वंशजाच्या मस्तकावर बांधल्या जात. या पादुका मस्तकावर बांधण्याचा मान नामदेव महाराजांच्या वंशजाकडे आहे. पादुका मस्तकावर ठेवताच हरिदासांची शुद्ध हरपते. ते समाधी अवस्थेत जातात. टाळमृदुंगाच्या नादघोषात हरिदासांना खांद्यावर घेऊन सारेजण विठ्ठल मंदिरात येतात. सभामंडपात पाच प्रदक्षिणा घालून हदहीहंडी फोडली जाते. काला घेऊन महाद्वारातून मिरवणूक निघते. पादुकारुपी विठ्ठल चंद्रभागेच्या भेटीला येतो.. चंद्रभागेचे पवित्र जल पादुकांवर उडवलं जातं. कुंभार घाट, मुक्ताबाईच्या मठा वरून मिरवणूक हरिदास वेशीतून काल्याच्या वाड्यात येते. मिरवणुकीत ठिकठिकाणी कुंकू,बुक्का लाह्या यांची उधळण केली जाते. हरिदास वेशीत दही हंडी फोडतात.वाड्यात आल्यावर महाआरती होते. सारे भाविक पादुकांचे दर्शन घेतात. सर्वांना काला वाटून आषाढी यात्रेची सांगता होते. या आनंद सोहळ्यानंतर पंढरीची वारी सुफळ संपन्न होते. एखादी सुरेल मैफल संपल्यानंतर त्या मैफिलीचे सूर आसमंतात भरून रेंगाळतात.. त्याप्रमाणे वारी संपल्यानंतर टाळमृदुंगाचे, हरीनामाचे सूर पंढरपूरच्या आसमंतात रेंगाळत राहतात.. वारी सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. विठुराया सुद्धा रात्रंदिवस भक्तांना दर्शन देऊन थकून गेलेला आहे. आता त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रक्षाळ पूजेचे आयोजन होईल. महाद्वार काल्यानंतर शुभ मुहूर्त पाहून आता प्रक्षाळपूजा संपन्न होईल.
©️ मीरा उत्पात-ताशी.
9403554167.

Comments
Post a Comment