गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला.


 *गोपाळ काला गोड झाला* 





आज गुरूपौर्णिमा.. ज्येष्ठ वद्य अष्टमी पासून सुरू झालेला हा वारीचा सोहळा आज संपन्न होईल.

आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात पार पडल्यावर पौर्णिमेला गोपाळपूरला काल्याचा कार्यक्रम होतो. पंढरपूरच्या दक्षिणेस असलेल्या गोपाळपूर येथे पुष्पावती नदीच्या काठी एका टेकडीवर गोपाळ कृष्णाचे अतिशय सुंदर भव्य मंदिर आहे. या मंदिरातील गोपाळ कृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्तीचा चेहरा अगदी हुबेहूब विठ्ठलाच्या चेहऱ्यासारखा आहे. ही देहुडा चरणी उभं राहून वेणू वाजवणारी गोपाळ कृष्णाची मूर्ती आहे. 

*देहुडाचरणी वाजवितो वेणू।* *गोपिका रमण स्वामी माझा।* 

मूर्तीच्या मागे गाई आहेत. या मंदिराच्या आवारात श्रीकृष्णाचे सासरे भीमक राजाचे  मंदिर आहे. जनाबाईचे गुहा आहे. त्यामध्ये जनाबाईचा संसार, दळण दळायचे  जाते आहे. याच जात्यावर बसून श्री विठ्ठलाने जनाबाईंबरोबर दळण दळले होते असे म्हणतात. यशोदेच्या दधिमंथनाची जागा आहे. हे मंदिर जिथे आहे तिथे श्रीकृष्ण द्वारकेवरून गाईगुरांसह आला होता. इथेच त्याने गाई गुरे खेळविली. गोपाळांसह सहभोजन केलं. या प्रसंगाची आठवण म्हणून आषाढी पौर्णिमेला गोपाळ काल्याचा उत्सव होतो. सगळ्या संतांच्या पालख्या इथे जमा होतात. गोपाळकृष्णापुढे काल्याचं कीर्तन रंगतं. वारकरी अनेक प्रकारचे खेळ खेळतात. दुपारी बाराच्या सुमारास दहीहंडी फोडली जाते. काला सगळ्यांना वाटला जातो. वारकरी एकमेकांना 'गोपाळकाला गोड झाला. गोपाळांनी गोड केला' असे म्हणत काला खाऊ घालतात. एकमेकांची उराउरी भेट घेत एकमेकांच्या पाया पडतात. 

*पंढरीच्या लोका नाही अभिमान।* *पाया पडती जन एकमेकां।*

या आनंद सोहळ्यात सगळे भेद संपून गेलेले असतात. 

काल्याचा हात धुवायचा नाही अशी प्रथा आहे. कारण हा काला खाण्यासाठी देव जलचर होवून चंद्रभागेत येतात. त्यांच्या भाग्यात हा प्रसाद नाही.  म्हणून हात धुवायचा नाही. काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. 

काला घेवून जड मनाने कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परतीच्या वाटेवर निघतात. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या नामदेव पायरी जवळ येतात. नामदेव महाराज त्यांच्या चरणांची धुळ मस्तकावर पडावी म्हणून वाट पहात असतात. माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांची भेट विठ्ठलाला घडवतात. अतिशय हृद्य सोहळा असतो. माऊली आणि महाराज उराउरी भेटून, पुढच्या वर्षी भेटण्याचं आश्वासन देऊन जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला निघतात. दुपारी चार वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. पंढरपूरातले सगळे महाराज, मानकरी मंडळी माउलींना निरोप देण्यासाठी नाक्यापर्यंत येतात. पुढच्या वारीचा वायदा करून एकमेकांचा निरोप घेतात.  महिनाभर चाललेल्या या आनंद सोहळ्याची सांगता होते...हो..पण अजून संपूर्ण सांगता राहिली आहे...उद्या महाद्वारकाल्याच्या सोहळ्याने संपूर्ण वारीची सांगता होईल.. 


*नामा म्हणे उपमा काय द्यावी।*

*माझ्या विठ्ठलाची अलाबला घ्यावी।* 


 खरंच या पंढरीच्या सुखाला तोड नाही...



©️मीरा उत्पात-ताशी,

      9403554167.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.