वारीची चाहूल.
वारीची चाहूल लागली की पंढरपुरात देवळाभोवतलची माणसं देवाला लोड लागला, पलंग निघाला असं आपापसात सांगू लागले की समजावं वारी आता जवळच्या टप्प्यात आली आहे..
आता देवाला लोड लागला आहे. त्याचे सारे नित्योपचार बंद झाले आहेत. आता फक्त भक्तांची गाठभेट घेणं!! बाकी देवाला दुसरं काही सुचत नाही!! नित्य स्नान आणि भोजन सोडून सारे उपचार बंद झाले आहेत. रूक्मिणी मातेच्या पाठीमागे सुद्धा तक्क्या ठेवला आहे.
जसे देवाचे नित्योपचार बंद होतात त्याप्रमाणे रूक्मिणी मातेचे पण नित्योपचार बंद होतात..मातेचं दर मंगळवारी आणि शुक्रवारी न्हाणं म्हणजे वासाचं तेल उटणं हळद, सुवासिक द्रव्यांनी अभ्यंग स्नान असतं. ते आता प्रक्षाळपूजा होईपर्यंत बंद होतं. फक्त नित्य स्नान आणि भोजन एवढं सोडून ती पण विठ्ठलाच्या बरोबरीने रात्रंदिवस उभं राहून भक्तांना दर्शन देते. शयन करत नाही. पलंग काढून शेजारच्या ओवरीत ठेवला जातो.त्याला स्थानिक भाषेत पलंग निघाला असं म्हणतात. देव आणि आईसाहेब भक्तांसाठी तिष्ठत उभे राहतात. तुम्ही नीट पाहिलं तर देवाच्या आणि आईसाहेबाच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो..अनादी काळापासून म्हणजे देव पंढरपुरात आल्यापासून ही प्रथा सुरू आहे.
असं देवानं भक्तांसाठी स्वतः त्रास करून घेणं फक्त आणि फक्त पंढरपूरलाच!!!
मीरा उत्पात-ताशी.
९४०३५५४१६७.

 
 
 
Comments
Post a Comment