आषाढस्य प्रथमदिवसे.


 *आषाढस्य प्रथमदिवसे*




पावसाचा नवथरपणा जाऊन आता प्रगल्भता आली आहे. ज्येष्ठातलं आडवंतिडवं कोसळणं संपून संथलयीचा नाद ऐकू येतो आहे. उन्हाळ्यातलं उंच गेलेले आभाळ आता मेघांनी ओथंबून अगदी खाली वाकलं आहे. इतकं खाली की हात लावला तर कवेतच येईल. अगदी माथ्याला टेकलेलं.. जलद भरलेलं आभाळ पाहून किती आनंदून जातं आपलं मन..  मग विरहावस्थेत असलेल्या कालिदासाच्या मेघदूतातील यक्षाला हे भरलं आभाळ किती आनंद देऊन गेलं असेल.. या अतीव आनंदानेच एक युगातीत महाकाव्य कालिदासाच्या संपन्न प्रतिभेतून निर्माण झालं. मेघदूत..

   मेघदूतासह सात साहित्यग्रंथ लिहिणारे महाकवी. 'कविकुलगुरू' असे ज्यांना गौरवले जाते ते संस्कृत भाषेतील श्रेष्ठतम महाकवी कालिदास..यांचा जन्म आषाढातील प्रतिपदेला झाला असे मानतात.. खरं तर  त्यांच्या जन्म काळासंबंधी विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन सहावे शतक या काळात कधीतरी कालिदास होऊन गेले.. त्याच्या जन्म स्थळाबाबतही निर्णायक मत नाही. बंगाल, काश्मीर, विदीशा, उज्जैन अशा अनेक प्रदेशांचा उल्लेख कालिदासांची जन्मभूमी म्हणून केला जातो. तरीपण उज्जैन शहराविषयी त्यांच्या साहित्यातून व्यक्त झालेला भाव, उत्कट प्रेम पाहता तिथेच त्याचा जन्म झाला असावा असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. 

'आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं' या प्रसिद्ध श्लोकामुळे  आषाढ महिन्यातील पहिला दिवस ही कालिदासाची जन्मतिथी मानली जाते. आणि हा दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो.

 कालिदासा विषयी असे म्हटले जाते की तो दिसायला सुंदर परंतु मठ्ठ आणि निरक्षर होता. एका हट्टी राजकन्येची खोड मोडण्यासाठी कालिदासाचा आणि तिचा विवाह लावून दिला. राजकन्येच्या लक्षात आल्यावर ती त्याची निर्भत्सना करते. त्यामुळे तो वनात निघून जातो. तपश्चर्या करून कालीमातेचा वरदहस्त मिळवून महापंडित होतो. घरी आल्यावर 'अस्ती कश्चित् वाग्विशेषः असे त्याची पत्नी त्याला विचारते. या तीन शब्दांवरून त्याने तीन महाकाव्ये रचली. 'अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा' या चरणाने प्रारंभ होणारे 'कुमारसंभवम्'. 'कश्चितकान्ताविरहगुरुणां स्वाधिकारात्प्रमतः' या चरणाने प्रारंभ होणारे 'मेघदूत'..'वागर्थाविव सम्पृक्तौ' या चरणाने प्रारंभ होणारे 'रघुवंश' ही तीन महाकाव्ये रचली. त्यांची साहित्य संपदा म्हणजे संस्कृत भाषेची कोरीवलेणी आहेत. शास्त्र, संगीत, चित्रकला, नृत्य, आदी ललित कलांचे उल्लेख त्याच्या साहित्यात ठिकठिकाणी आढळतात. कालिदास म्हणजे विद्वत्ता आणि रसिकता यांचा मनोज्ञ संगम. ज्याच्या विषयी सांगायचे आहे त्यातील सौंदर्य अचूक पणाने, मोजक्या शब्दात लिहिणे हे त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या उपमा अतिशय तरल व सौंदर्यपूर्ण असल्यामुळे 'उपमा कालिदासस्य' असे गौरवाने म्हटले जाते. याचा प्रत्यय आपण कालिदासाचे साहित्य वाचताना येतो..

  आषाढ महिना आला की कालिदासाचे मेघदूत आपोआप आपल्या ओठावर येते.


 'आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।

 वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।। 


आषाढाच्या पहिल्या दिवशी वप्रक्रीडा करणाऱ्या हत्तीप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या, पर्वताच्या शिखराला अलिंगन देणाऱ्या मेघाला यक्षाने पाहिले आणि आपल्या प्रिय पत्नीला निरोप देण्याचे ठरवले.. हा यक्ष शापित आहे. प्रिय पत्नीच्या विरहाचा त्याला शाप मिळाला आहे. पत्नीच्या वियोगामुळे अत्यंत कृश झाल्याने त्याच्या हातातील कनकवलय गळून पडले आहे.. कोण आहे हा यक्ष असा प्रश्न आपल्याला पडतो.  तर मेघदूत या नितांत सुंदर काव्याचा नायक शापित यक्ष आहे. 'ब्रह्मवैवर्त' पुराणात योगिनी एकादशीच्या महात्म्यात ही या यक्षाची छोटीशी कथा युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णाने सांगितली आहे. या कथेतील यक्षराजा कुबेर हा शिवाचा परमभक्त होता. त्याचा सेवक हेममाली नावाचा यक्ष रोज त्याला शिवपुजे करिता मानस सरोवरातून कमळ तोडून आणून देत असे. यक्षाची पत्नी विशालाक्षी अतिशय सुंदर होती. पत्नीच्या प्रेमामध्ये तो मग्न राहात असल्याने त्याला सकाळी लवकर कमळे तोडून आणण्यास विलंब होत असे. मग त्याने सायंकाळीच कमळे तोडून आणून ठेवण्याचा क्रम  सुरू केला. एकदा त्या कमळात एक भुंगा अडकला. सकाळी कुबेर शिवाला कमळ वाहताना भुंगा बाहेर आला आणि त्याला चावला. राजा कुबेर अतिशय संतप्त झाला. त्याला सगळा प्रकार समजला. आणि त्याने हेममाली यक्षाला शाप दिला 'तू कुष्ठरोगी होशील आणि हद्दपार होऊन तुला पत्नी वियोगात एक वर्ष घालवावे लागेल'.. कालिदासाने या शापातला कुष्ठरोगाचा अनावश्यक भाग टाकून आवश्यक तो भाग घेऊन प्रियेला मेघाकरवी संदेश पाठवण्याच्या अतिशय रम्य कल्पनेची जोड देऊन रमणीय असे 'मेघदूत' काव्य रचले.

  मेघदूताचे दोन भाग आहेत पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. पूर्व मेघात मेघाने अलका नगरी ला कोणत्या मार्गाने, कसे जायचे हे सांगितले आहे. मेघाला पर्जन्य काळातील रम्य निसर्गचित्र सांगत अमरकूट पर्वत, नर्मदा नदी, विदिशा नगरी, वेत्रवेती नदी, मालव प्रदेश, त्याची राजधानी उज्जयिनी, कुरुक्षेत्र हे सगळे पार करून आपले निवासस्थान असलेल्या अलका नगरीत जाण्यास यक्षाने सांगितले आहे.

   उत्तर मेघात यक्ष अलका नगरीचे, आपल्या घराचे, आपल्या प्रिय पत्नीच्या अपूर्व सौंदर्याचे वर्णन करतो. तिची अवस्था कल्पनेने वर्णन करून तिला पुनर्मिलनासाठी धीर धरण्याचा निरोप या मेघा बरोबर पाठवतो..

  पुराणातील एक छोटेसे कथानक.. पण कालिदासाने आपल्या प्रतिभेने केवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.. उत्कृष्ट भाषा,सूक्ष्म निरीक्षण, सृष्टीचे मनोज्ञ विभ्रम, भावभावनांचे रोपण, सहजपणे सांगितलेलं जीवनाचं सत्य हे सारं विलक्षण सौंदर्याने गुंफत एक कालातीत काव्य निर्माण झालं 'मेघदूत'..

या काव्याची श्रेष्ठता इतकी आहे की विश्र्वातील अनेक भाषांमध्ये मेघदूताचे अनुवाद झाले आहेत. याशिवाय हिंदी बंगाली मराठी गुजराती तेलुगू कन्नड आदी भारतीय भाषांमध्येही त्याचे अनुवाद झाले आहेत . मेघदूताची बरोबरी करणारे गीतिकाव्य अजून कोणत्याही भाषेत झाले नाही..

अशा या विद्वत्ता आणि रसिकता याचा मनोहारी संगम असणाऱ्या महाकवी कालिदासांना आज आषाढाच्या पहिल्या दिवशी विनम्र अभिवादन..


©️मीरा उत्पात-ताशी.

9403554167.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.