राज्य परिवहन मंत्री सरनाईक यांची अचानक राज्य महामार्गावरील ढाब्यांना भेट .
*परिवहन मंत्रांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट*
पंढरपूर : ( प्रतिनिधी )परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला विहीत वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले.
*अनाधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी बस थांबवणाऱ्या चालक- वाहकांवर कारवाई*
दरम्यान भिगवन जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी च्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केले असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
भिगवणला लवकरच नवे बसस्थानक होणार
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर असताना महामार्गावरील भिगवण बसस्थानकाला त्यांनी भेट दिली. तेथील असुविधा बाबत स्थानिक रहिवाशांनी मंत्री सरनाईक यांच्या कडे कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवन बसस्थानकाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे भिगवण येथे नवे बस स्थानक लवकरच आकाराला येईल असा आशावाद येथील रहिवाशांच्या मध्ये निर्माण झाला आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment