न मातू परदैवतम.
*न मातुः परं दैवतम्!*
*आईसारखे दैवत दुसरे या जगतावर नाही*
*म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अआई*
आज मातृदिन!! आईची उणीव क्षणोक्षणी जाणवते. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने तिची आठवण येते. पंढरपूर ला गेल्यावर कुठून तरी येईल, मायेनं विचारपूस करेल किंवा काही कारणाने रागावेल असं वाटत राहतं..पण ती नाही हे सत्य स्विकारून डोळ्यात पाणी येते. तिच्या अस्तित्वाच्या खुणा तिथं आजही विखुरलेल्या आहेत.
माझी आई मालती, माझे वडील शरद मोरेश्वर उत्पात यांची अर्धांगिनी म्हणून उत्पातांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली. तिचे वडील पुरुषोत्तम आबाजी देशपांडे वतनदार होते. जातिवंत शेतकरी होते. सोलापुरात चार चौकी दगडी कमानी चा वाडा, गाईगुरे, जमीन जुमला, नोकर चाकर, अशा संपन्न घरातून आमच्या भागवत धर्माचे संस्कार असलेल्या व माणुसकीची अमाप संपत्ती असलेल्या घरात आली. तिचे साऱ्या घराने खूप मनापासून स्वागत केले. माझे आजोबा मोरेश्वर उत्पात यांच्या दुःखद निधनाची पार्श्वभूमी त्यांच्या लग्नाच्या वेळेस होती. एकत्र कुटुंब. घरात सख्या सासू सोबत चुलत, मावस आणि आते सासुबाई अशा चार सासुबाई, एक थोरली जाऊ अशा पाचजणींच्या देखरेखीखाली तिच्या संसाराला सुरुवात झाली. बरोबरीची नणंद. धाकटे तीन दीर, मोठे चुलत दीर, त्यांची मुले असं मोठं एकत्र कुटुंब होतं. शिवाय येणारे-जाणारे, पै-पाहुणे, वारकरी असं आमचं घर सदैव माणसांनी भरलेलं असायचं. ती एकत्र कुटुंबातून आली असली तरी माहेरी वेगळं वातावरण होतं. आमच्या घरातल्या वातावरणाशी तिला जुळवून घेताना खूप प्रयास पडले. लग्नाच्या वेळी ती केवळ अठरा वर्षांची होती. आपल्या कामसू व आज्ञाधारक वृत्तीने तिने साऱ्यांना जिंकून घेतलं. दीर नणदांची ची लग्नं, त्यांचे सणवार, सारं काही तिने आणि तात्यांनी म्हणजे माझ्या वडिलांनी खूप हौसेने आणि जबाबदारीने केले. याच दरम्यान एकेक जबाबदारी पार पाडत असताना तात्या मोटर न्यूरॉन डिसीज ने आजारी पडले. आम्ही तिघी बहिणी खूप लहान होतो. देवाने केवढा मोठा दुर्धर प्रसंग तिच्यासमोर टाकला होता. पण माई आणि दिरांच्या साथीने या कठीण प्रसंगाला तिने मोठ्या धीराने तोंड दिले वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जीवनसाथी सोडून गेला पदरात तीन मुली. पण जिद्दीने आणि खंबीर पणे या आघाताला ती सामोरी गेली. अपार कष्ट केले. तिघींचे संगोपन, शिक्षण, लग्न सारे काही पार पाडले फक्त आपल्या मुलींचेच नाही तर पुतण्यांचे ही तिने आईच्या मायेने सारे काही केले. माझ्या चुलत भावंडांना तिने आईच्या मायेने वाढवले. प्रसंगी धाकही लावला. माझी ती भावंडेही 'मालती काकू मुळे आम्हाला खूप शिकायला मिळाले. संसाराची गणितं कळाली' असे कृतकृत्य होऊन म्हणतात. या साऱ्या गोष्टी ती निर्लेप मनाने स्वीकारून त्यांना अजून चार चांगल्या गोष्टी सांगे. माईने म्हणजे माझी आजीने तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम केले. आजी आणि तात्यांना माणसांचे फार वेड होते. अनेक माणसे त्यांनी जोडली होती. तीच प्रथा तिने पुढे चालवली. माहेरी सख्ख्या, चुलत बहीण भावंडांवर तिनं प्रेम केलं. कमान दरवाज्यातून आत शिरल्यावर सगळं जग विसरून जाई.. माझा काका म्हणे ' वहिनी कमान दरवाज्यात जाई पर्यंत आमची ओळख ठेवतात..आत शिरल्यावर ओळख विसरून जातात.' देशपांडेंची लेक असल्याचा फार अभिमान होता..खूप माणसे जोडली. माईच्या माघारी आत्याचं माहेरपण केलं. जावांशी बहिणीप्रमाणे वागली. माझी धाकटी काकू म्हणजे माझी सख्खी मावशी आहे. तिच्या एवढंच प्रेम तिने इतर दोघींवर केलं. एवढा मोठा संसाराचा गाडा हाकता हाकता ती थकली. अलीकडे काम करताना तिला खूप थकवा जाणवे. वयोमानाप्रमाणे होत असावे असे तिलाही आणि आम्हालाही वाटले. पण नियतीने वेगळेच वाढून ठेवले होते.
दुर्धर आजाराने तिला ग्रासले. आणि पाहता-पाहता वर्ष भरातच ती आम्हाला सोडून गेली.
*प्रेम लाभे प्रेमळाला*
*त्याग ही त्याची कसोटी* याप्रमाणे आयुष्यभर त्याग करत दुसऱ्यांवर प्रेम करत राहिली. स्वतःसाठी कधी जगलीच नाही. आम्ही म्हणायचो 'आई तुझ्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तू आता फक्त स्वतःसाठी जग'. पण तिचा स्वभावच नव्हता फक्त आपल्या पुरतं पाहण्याचा.
स्वच्छता, टापटीप, साधं पण व्यवस्थित राहणीमान, गोरापान रंग, नितळ त्वचा, लांब सडक सोनेरी केस, देखणेपण, आणि जन्मजात असलेला रुबाबदारपणा यामुळे समोरच्या व्यक्तीवर तिची सहज छाप पडे. आम्हीपण नीटनेटकेपणाने रहावे असा तिचा कटाक्ष असायचा. त्यामुळे तिच्यासोबत वावरताना आम्ही सतत जागरूक असायचो. शेवटपर्यंत तिच्या प्रेमळ धाकामध्ये होतो. ती आमची 'आई' होतीच पण तेवढीच ती आमची 'वडील'ही होती. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना ती समर्थपणे वावरली. कुठेही कमी पडली नाही.
' *न फिटे ऋण जन्मदेचे*'
तिचे ऋण कधीही न फिटणारे आहे.तिचा धाक, करारीपणा पाहताना ती अशी होती म्हणूनच आपण इथपर्यंत येऊन पोचलो असे वाटते.
'जातस्य हि ध्रुवो मृत्यु' जन्माला येणारा प्रत्येक माणूस मृत्यू पावणारच हे सत्य आहे. तरीही आई गेली हे सत्य पचवणं खूप अवघड जाते आहे. मुलाबाळांनी भरलेल्या संसारात सर्व कर्तव्य पार पाडून अगदी तृप्त मनाने, सहज या पाशातून ती मोकळी झाली. कृतकृत्य समाधानात अतिशय शांतपणाने समई तल्या ज्योतीप्रमाणे ती शांत शांत होत निजधामाला गेली. माझं भाग्य थोर की तिचा प्रेमळ सहवास मला मिळाला . पुन्हा जन्म असेल तर आज मातृदिनाच्या निमित्ताने श्रीरुक्मिणी मातेला एकच प्रार्थना!!
*घे जन्म तू फिरूनी*
*येईन मीहि पोटी!!*
@ मीरा उत्पात.

Comments
Post a Comment