स्पंदन दगडी घरांचे.
*स्पंदन दगडी घराचे*
सध्या पंढरपुरात देवळाजवळच्या प्रत्येक गल्लीबोळात काॅरिडाॅरची अखंड चर्चा सुरू आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये कित्येक लोकांची पिढ्यानपिढ्याची घरे उध्वस्त होणार आहेत. असा प्रसंग देवळाजवळच्या रहिवाश्यांनी एकोणीसशे ऐंशी साली, मास्टर प्लॅन झाला होता त्यावेळी देखील अनुभवला होता. आता परत दुसऱ्यांदा काही घरांवरून वरवंटा फिरणार आहे. माणसे हताश झाली आहेत. राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुणाला? अशी अवस्था झाली आहे. पंढरपुरात भरणाऱ्या चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी या चार मोठ्या वाऱ्यांपैकी आषाढी, कार्तिकी या जास्त मोठ्या वाऱ्या आहेत. या दोन वाऱ्यांच्या गर्दीच्या चार पाच दिवसांसाठी पिढ्यानपिढ्याची नांदती घरे उधवस्त करायची का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. वर्षानुवर्षे पंढरपुराने वारीला आपल्यात सामावून घेतले आहेच की..कधीच कुठली कुरकुर न करता...तरीही अजून ही शिक्षा का???
या प्रकल्पाअंतर्गत आता आमचंही घर बाधित होणार असा काल भावाचा फोन आला आणि मन व्यथित झालं..
प्रत्येक माहेरवाशीण सासरी जरी नांदत असली तरी सदैव तिचा जीव माहेरात गुंतलेला असतो.. अगदी तसेच माझे आहे. मी कोल्हापुरात असले तरी सदैव माझं मन पंढरपुरातच गुंतलेलं असतं. पंढरपूर, देऊळ, आमचं घर, घरातील आठवणी, आमची गल्ली,बोळ यात रममाण झालेलं असतं.
अडीचशे तीनशे वर्षांपूर्वीची ही आमची वास्तू!! काळाच्या ओघात तिने अनेक बदल पाहिले, पचवले. तिने अनेक पिढ्या पाहिल्या. मृत्यूनी घर रिकामं झालं.. नवप्रसवानं परत भरलं. तिने घरातल्या माणसांची बालपणं पाहिली. त्यांना वयात येताना पाहिलं. पिकताना पाहिलं. कालमानानुसार माणसांच्या कपड्यात बदल होताना पाहिले. आहार विहार बदलले. तिच्या मध्येही काही बदल केले. तरीही ती वास्तू ठाम होती. आपलं अस्तित्व टिकवून होती..
मला माझंच बालपण आठवायला लागलं. खूप प्रतीक्षेनी झालेला माझा जन्म. घरातल्या माणसांबरोबर ही वास्तूही सुखावली होती. माझ्या बाल लीलांनी आनंदीत झाली होती. माझ्या वयाची स्थित्यंतरं तिने पाहिली. काळाने माझ्यावर केलेले आघात पाहिले. तारुण्याच्या उंबरठ्यावर माझ्याच वास्तूत मी पाहुणी झाले. तरीही आजपर्यंत मी मात्र तिला कधी परकं केलं नाही. ही वास्तू, हे घर, त्यातल्या भिंती, धूळ सारं माझ्या रक्ताभिसरणात मिसळून गेलं आहे. मग ते परकं कसं होईल?
काळ अभेद्य आहे. निरंतर आहे. त्याचा प्रवाह सतत वाहता आहे. त्याच्या प्रवाहात या वास्तूतील किती तरी माणसे, आठवणी काठावर ठेऊन गेली आहेत. फक्त घरातीलच नव्हे तर घराभोवतीची, आलेली गेलेली, नात्यागोत्याची, वारीसाठी येणारी अशी कित्येक माणसे इथे नांदली आहेत. वावरली, स्थिरावली आणि आपली वेळ झाल्यावर निघूनही गेली आहेत. आमचं घर म्हणजे सदैव नांदतं गोकुळच!! ते कधीच निर्जीव दगड मातीचं नव्हतं.. ते सजीव होतं.. आमची काळजी घेणारं.. आम्ही खेळताना पडलो तर काही इजा न करणारं.. माळवदाच्या कुंभीवरून जांभळं काढताना आम्हाला सावरणारं..
शिसवी, सागवानी खांबांनी, दगडी पायऱ्यांनी, जोत्यानी तोलून धरलेलं.. अंगण, तळघर, ओसरी, माजघर, स्वयंपाक घर,ऐसपैस देवघर,आतली माडी, बाहेरची माडी, नवी, जुनी पत्र्याची माडी, माळवद, फरसबंद गच्ची अंगाखांद्यावर घेणारं आमचं घर कधी निर्जीव वाटलंच नाही. आमच्या आनंदा बरोबर ते आनंदलं. दुःखाने हिरमुसलं. सणावारी चैतन्याने मुसमुसलं. भल्या पहाटे जात्यावरच्या ओवीचे, पूजेतल्या सूक्तांचे, किणकिणणाऱ्या घंटीचे, तार स्वरात म्हटलेल्या आरतीचे, नवजात बालकांच्या रडण्याचे, हसण्याचे सूर त्याने ऐकले. स्वयंपाक घरातली लगबग, शाळेच्या मुलांची, नोकरीच्या माणसांची घाई, पाहुण्या माहेरवाशीणीची तृप्तता पाहिली.
चंद्रभागेत स्नान करून आलेल्या आणि आता देवळात निघालेल्या वारकऱ्यांच्या मुखातल्या हरिपाठाचे, अभंगाचे भाबडे भक्तीस्वर ऐकले. स्वयंपाक घरातल्या रोजच्या स्वयंपाकाच्या, नैवेद्याच्या मधुर वासाने गंधाळले. असं सदैव स्वर, ताल, लय, गंधांनी दरवळणारं आमचं घर आता आपलं अस्तित्व टाकून नवं रूप घेणार हा बदल मन स्विकारत नाहीये!! इतर मुळे कमकुवत असतात. पण सोटमूळ मात्र घट्टपणे रूजलेलं असतं. जमिनीत अगदी खोलवर!! तसंच माझं झालंय. माझ्या जीवलग घरावरची माझी माया सोटमुळासारखी आहे. घराच्या पायाच्या आत, पृथ्वीच्या पोटात घट्ट रुजलेली!! म्हणून हे सारं जड जातंय! तहान भुकेची जाणीव होत नाहीये.. झोपने असहकार पुकारला आहे.
खरं तर काळाच्या ओघात कितीतरी स्थित्यंतरं झाली. आमचा मानबिंदू, आमचं चैतन्य, आमचा प्राण, आमचं जगणं म्हणजे देऊळ!! ते आमच्या कडून हिरावून घेतलं. ती भळभळती जखम अश्वत्थाम्या सारखी चिरंजीवच राहणार आहे!!! त्यातून सावरत आता कुठे तरी स्थिरावत असताना परत हा जीवघेणा घाला!! करायचे तरी काय? पैसे मिळतीलच की तुम्हाला अशी मलमपट्टी आहे. पण त्या मलमपट्टीने निर्वासित होण्याची जखम नाही भरून येणार!! नव्या वळणाचा हा लाभ आम्हाला नाही सुखकर होणार. आमचं आपल्या घरातलं पिढ्यानपिढ्याचं रूजणं कुठल्या पैशाने नाही उपटून टाकता येणार!!
आमच्या घराच्या माळवदावरून आता देवळाचा कळस नाही दिसणार! देवळात न जाता केवळ कळसाच्या दर्शनाने विठ्ठलरूक्मिणीला भेटण्याचे समाधान नाही मिळणार.. केवळ घरे उद्ध्वस्त नाही होणार. जपलेली, जोपासलेली भावस्पंदने, आता देऊळ आपलं नाही पण आपण विठ्ठल रखुमाईच्या कुशीत तरी आहोत हे आंतरिक समाधान उध्वस्त होणार. आधीच आमच्या दैवताला सुरक्षेच्या अभेद्य कडेकोटात बंदिस्त केले. तिच्या आपल्या गोतावळ्यापासून तोडून टाकले. आता तिच्या जवळपास राहण्याचे सुखही दुरावणार!!
सरकारी मताप्रमाणे माझे आणि माझ्या गोतावळ्यांची घरे जमिनीत एकरूप झाली तरी ती आमच्या साठी अविनाशी आहेत!! सदैव त्याच्या काळ्याशार दगडातील हृदयस्पंदनाने आमची स्पंदने धडधडत ठेवणारी!!
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.
९४०३५५४१६७.


Comments
Post a Comment