पोलिसांच्या प्रयत्नाने यश सापडला, पो नि मुजावर यांची तत्परता, माय लेकराची भेट.
पोलिसांच्या प्रयत्नामुळे यश सापडला !
मातापित्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला ...
पंढरपूर (प्रतिनिधी)
मांडी खांद्यावर खेळणारे मुल जेव्हा आई-वडिलांपासून दूर जाते ; तेव्हा आई-वडिलांचा
श्वासच थांबतो. भरपूर प्रयत्नांनी जेव्हा हे मूल आई-वडिलांना मिळून येते , तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. पंढरपूर तालुका पोलिसांच्या प्रयत्नामुळे , अशीच एका लहान मूल आणि आई-वडिलांची भेट झाली. आई-वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
अशाच प्रकारची घटना पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे , पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
गोपाळपूर येथील निशा हेगडे आणि पांडुरंग हेगडे हे पती-पत्नी दोघेजण मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या कुटुंबावर आघात करणारी घटना ,२१ एप्रिल रोजी घडली. हे दोघे पती-पत्नी आणि त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आणि मुलगी सोनाली हे सर्वजण , गोपाळपूर येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात कामासाठी गेले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. या दाम्पत्याने आपल्या दोन्ही बछड्यांना जवळच असलेल्या वीटभट्टीवर पाणी आणण्यासाठी पाठवले. परंतु पाणी घेऊन फक्त सोनाली ही मुलगीच आली. मुलगा यश हा तेथील मुलांसोबत खेळत असेल म्हणून या दोघांनीही काम सुरूच ठेवले.
परंतु बराच वेळ होऊनही यश परत आलाच नाही. या हेगडे संपत्ती आणि वीटभट्टीवर जाऊन चौकशी केली असता, त्या ठिकाणी यशाचा पत्ता लागला नाही. शेवटी भांबावून जाऊन या दांपत्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गाठले आणि या ठिकाणी यश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
मुलगा लहान असल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली. मुलाची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली.
परंतु कोणतीही आशादायक माहिती मिळून येत नव्हती. तरीही पोलीस यंत्रणा हाताशी झाली नाही.
या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले यामध्ये मुलगा झोपडपट्टीकडे चालत जात असताना दिसला सर्व पोलीस मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टीतून फिरत होते परंतु यशाचा शोध काही लागला नाही.
रात्र झाली तरीही यश मिळून आला नाही.
दि. २२ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी यशला शोधण्यासाठी योजना आखली.
दुसऱ्या दिवशी स्वतः आणि निवडक अधिकारी आणि अंमलदार यांना कामाला लावले.
अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपत्रात नाव चालवणारे नावाडे यांच्याकडे चौकशी केली असता,
संबंधित वर्णनाचा मुलगा महाद्वारे घटासमोरील मंदिरा जवळ झोपला असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी मुलांच्या आई-वडिलांसह जाऊन मुलाचा शोध घेतला. अखेर या ठिकाणी मुलगा यश झोपेत मिळून आला.
यावेळी आई-वडील आणि पोलिसांचाही चेहरा खुलला.
पंढरपूर तालुका पोलिसांच्या प्रयत्नामुळे आई-वडिलांना बेपत्ता झालेला मुलगा मिळाला.
तर बेपत्ता झालेल्या मुलाला आई वडिलांचे छत्र पुन्हा मिळाले. पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे पंढरपूर तालुक्यातून मोठे कौतुक होऊ लागले.
चौकट
आई-वडिलांपासून लहान मुलगा दूर जाणे ही गोष्ट , आई-वडिलांसह मुलालाही तितकीच धोकादायक असते.
एखाद्या गंभीर घटनेचा तपास रखडला तर काही फरक पडत नाही, परंतु अशा घटनेत पोलिसांनी केलेली कामगिरी निश्चितच आश्वासक ठरते.
पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या प्रयत्नामुळे अखेर आई-वडील आणि लहान मुलाची भेट झाली. आई-वडिलांना त्यांचे हरवलेले पाखरू भेटले , तर लहान मुलाला आई वडिलांचे छत्र पुन्हा मिळाले.

Comments
Post a Comment