माझा पुरूषोत्तम काका.
*माझा पुरूषोत्तम काका*
*अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।*
*देहान्ते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर॥*
देवा मला सहजपणे मृत्यू येऊ दे. माझं जीवन दैन्यरहित असू दे. आणि मृत्यू नंतर मला तुझेच सानिध्य मिळू दे. असा या श्लोकाचा अर्थ आहे.
माणूस जन्माला आल्या वर त्याच्या मृत्यू निश्चित असतो. पण वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अगदी सहज मृत्यू येण्यासाठी खरोखरच उदंड सुकृत लागतं!! जन्मोजन्मीचं पुुण्य लागतं. ते माझ्या पुरूषोत्तम काकाचं होतं. ..
माझ्या पितृतुल्य पुरूषोत्तम काकाला अगदी असाच मृत्यू आला. अगदी श्लोकात सांगितल्याप्रमाणे!! त्याचं पूर्व सुकृत आणि या जन्मी कमावलेल्या पुण्याची जमा पुंजी इतकी काठोकाठ होती की मृत्यू देखील त्याला शरणागत होऊन आला. आदले दिवशी रात्रीसाडेनऊ वाजेपर्यंत सहजपणे गप्पा मारणारा माझा काका सकाळी साडेपाच वाजता या जगात नसतो हे सत्य पचवणं मला आजही अवघड जातं आहे. डोळ्यांनी सत्य दिसतंय पण मन मात्र ते मानत नाही अशी अवस्था आहे.
माझा अतिशय निर्मळ मनाचा, पापभिरू, गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतल्याने रामाची निरतिशय भक्ती करणारा, सज्जन, दुसऱ्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारा, नम्र, चंदना प्रमाणे शीतल असणारा माझा काका सहजपणाने, विनासायास देवाच्या सान्निध्यात गेला. त्याला निश्चितपणे सायुज्यता मिळाली असणारच!!
तो गेल्यापासून आजच्या क्षणापर्यंत त्याच्या साऱ्या आठवणी मनाच्या पटलावर एकामागोमाग एक येत आहेत!
त्याचा जन्म अधिक महिन्यात म्हणजे पुरूषोत्तम मासात झाला म्हणून त्याचे नाव पुरूषोत्तम असे ठेवले होते. त्याचे नाव पुरूषोत्तम असले तरी आमच्या सगळ्यांचा तो पुर्ष्या काका होता!!
काका, आत्याच्या पिढी नंतर आमच्या घरात पुढच्या पिढीत जन्मलेली मी पहिली मुलगी! आई तात्यांच्या लग्नानंतर साडेतीन वर्षांंनी अतिशय नवसासायासांनी माझा जन्म झाला. त्यामुळे घरातील सगळ्यांचा केंद्रबिंदू मी होते. सगळ्यांनी माझ्यावर अतोनात प्रेम केलं. पुर्ष्या काकाही त्याला अपवाद नव्हता. त्याने माझ्या वर अगणित प्रेम केलं. आजही त्या क्षणांच्या आठवणी मनात ठाण मांडून बसलेल्या आहेत. आणि अगदी स्पष्ट आहेत.
पुर्ष्याकाका सगळ्यात सामावणारा, अगदी पाण्यासारखा होता. अतिशय शांत, निर्मळ,फार क्वचित रागावणारा, त्याची भीती कधीच वाटली नाही..माझ्या वर त्याचं नितांत प्रेम होतं लहानपणी माझे खूप लाड केले..तो तेव्हा पुण्याला नोकरीला होता.. माझ्या साठी छान खेळणी आणत असे.. माझ्या पहिल्या वाढदिवसाला त्यानं घंटा वाजवत येणारी,शिडी असणारी अग्निशमन गाडी आणली होती..ती खूप वर्ष माझ्या खेळण्याच्या संग्रहात होती..तो पहाटे पुण्याहून यायचा. आम्ही सकाळी उठल्यावर ओसरीवर झोपलेला दिसायचा. त्याच्या उठण्याची वाट बघत अक्षरशः उशापायथ्याशी बसत असू..उशाजवळच्या पिशवीत काय आणलं असेल याची उत्सुकता असे. मी धीर न निघाल्यामुळे त्याला उठवत असे.. त्यानं आणलेल्या वस्तू पाहून आनंदाने उड्या मारत आमची ती सकाळ आनंदी होई. पुढं कोल्हापूर ला त्याची बदली झाली.. तेव्हाही मी तिथं सुट्टीत जाई.. कोल्हापूर पहिल्यांदा पाहिलं ते त्याच्यामुळं.. त्यानं मला प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर सायकल शिकवली. पंचगंगेत पोहायला शिकवलं. केवळ मलाच नाही तर जी जी किशोरवयीन मुलं त्याच्या सहवासात आली त्यांना सायकल शिकवली पोहायला शिकवलं. माझ्या वडिलांवर ही त्याचे मनस्वी प्रेम होते. ते आजारी पडल्यावर त्यांची खूप सेवा केली. त्यांचीच नव्हे तर .सेवाकर्मी पुण्य असते हे जाणून निरपेक्ष वृत्तीने सगळ्यांची सेवा केली. मदत करायला तर सदा तत्परतेने पुढे येई. कोणी दवाखान्यात असलं तर रात्री झोपायला जाऊन परत ड्युटीवर जात असे. लग्न जमवणे हा त्याचा आवडता छंद होता. आम्हा बहिणींच्या लग्नासाठी त्याने अतोनात कष्ट घेतले. कधीही कुठल्याही गोष्टीचा आळस केला नाही. नियमित व्यायाम करत असे. मृत्यू च्या आदल्या दिवशी सुद्धा सकाळी संध्याकाळी फिरून आला होता. लहानपणी अतिशय व्रात्य, खोडकर होता. चंद्रभागेच्या पुराच्या पाण्यात पोहायला जाई. अनेक खोड्या करून माईची बोलणी खात असे. असा हा व्रात्य असणारा मुलगा मोठेपणी खूप शांत झाला. आणि आश्चर्यकारकपणे अध्यात्माकडे वळला. श्री गोंदवलेकर महाराजांचा गुरुमंत्र घेतला.. त्यांच्या सेवेत रुजू झाला. श्री राम जय राम जय जय राम हा महाराजांचा तेरा अक्षरी मंत्राचा अखंड जप सुरू असायचा. तो शेजारुन जरी गेला तरी 'श्री राम जय राम' हा जप आपोआप ऐकू यायचा इतका त्याच्याशी तादात्म्य पावला होता.. मृत्यू समीप आला तरी त्याने रामनाम सोडले नाही. शेवटच्या क्षणीही रामाचे नावच तोंडात होते. किती हे पुण्य!! भल्या भल्या साधकांना जे जमले नाही ते त्याने संसारात राहून करून दाखवले.
अलीकडे त्याने अखंड नामस्मरण करण्यासाठी मौनव्रत सुद्धा घेतले होते.
त्याची तब्येत चांगली असल्याने मी त्याला नेहमी म्हणत असे की तू नक्की शतायुषी होणार. कशाला इतकं आयुष्य? देवाने चालताबोलता उठाउठी न्यावे. असे उत्तर देई. त्याची इच्छा प्रभुरामचंद्राने पूर्ण केली.
पुर्ष्या काकाच्या किती आठवणी सांगाव्यात? आमचे जीवन व्यापून टाकले आहे त्याने. तो नाही असे म्हणायला जीभ रेटत नाही. पण ईश्वरेच्छा बलिर्यसि!! तो निश्चितच सायुज्यतेस पात्र झाला असणार!!
ही आमची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
असे म्हणावेसे वाटत नाही पण..
त्याला भावपूर्ण श्रद्धांजली!!
मीरा उत्पात ताशी.
.jpg)
Comments
Post a Comment