वसंत पंचमी .
*वसंत पंचमी*
आज माघ शुद्ध पंचमी. म्हणजे वसंत पंचमी. परमात्मा श्रीकृष्ण आणि जगन्माता रूक्मिणी यांच्या विवाहाचा दिवस! रूचिरानन रुक्मिणीला श्रीकृष्णाने राक्षस विधीने वरले. त्याची कथा अतिशय श्रुतिमधुर आहे. ती वाचताना, ऐकताना अलौकिक आनंद मिळतो. कितीही वेळा ऐकली तरी प्रत्येक वेळी ती नित्यनूतन वाटते.
विदर्भ देशाचा राजा भीष्मक अतिशय सात्विक होता. त्याची राणी शुद्धमती. ती नावाप्रमाणेच शुद्ध बुद्धीची होती. उभयतांना ओळीने पाच पुत्र झाले. त्यानंतर साक्षात लक्ष्मी, श्रीकृष्णाची चिद्शक्ती रूक्मिणी त्यांच्या पोटी कन्या होऊन जन्माला आली.
रूक्मिणी विवाहयोग्य झाल्या वर राजा भीष्मक आणि शुद्धमतीने कीर्तीनामा ब्राह्मणाच्या मुखातून श्रीकृष्णाचे रूप गुण वर्णन ऐकले आणि आपली ही लाडकी, सर्वगुणसंपन्न कन्या कृष्णाला अर्पण करायचे ठरवले. रूक्मिणीनेही कृष्ण वर्णन ऐकले आणि मनोमन कृष्णाला वरले. भीष्मक, शुद्धमती, रूक्मिणी, तिचे चार भाऊ या सगळ्यांनी एकविचार करून श्रीकृष्ण हाच रूक्मिणी साठी योग्य वर आहे असे ठरवले. त्यावेळी रूक्मिणीचा थोरला भाऊ रूक्मी तिथे आला आणि आपल्याला हा विवाह मान्य नसल्याचे सांगत त्याने कृष्णनिंदा करून रूक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे निश्चित केले. त्याच्या निर्णया समोर सारेच हतबल झाले.. रूक्मीने सारा कारभार हाती घेऊन शिशुपाल आणि रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी सुरू केली. शिशुपालाशी आपला विवाह होणार म्हणून रुक्मिणी फार व्याकुळ झाली. तिला काय करावे सुचेना. स्वतःचा सख्खा भाऊच वैरी झाला होता. त्यावेळी तिची प्रिय सखी तिला म्हणाली की या संकटातून, तुला तारणारा एक हितकर्ता आहे. तो म्हणजे सुदेव. सुदेव ब्राह्मण विदर्भ राजा भीष्मकाचा वंशपरंपरागत पुरोहित होता. अतिशय बुद्धिमान, सर्वशास्त्र पारंगत सुदेव श्रीकृष्णाशी आपली भेट घडवेल असे रूक्मिणीला मनोमन वाटले. तिने सुदेवाला पाचारण केले. आणि श्रीकृष्णाला विदर्भ देशी घेऊन येण्याची विनंती केली. त्यावेळी सुदेवाने हे मान्य केले मात्र रूक्मिणीला कृष्णासाठी पत्र लिहिण्यास सांगितले. रुक्मिणी प्रथम संकोचली. ती म्हणाली 'मी अजाण आहे. काय लिहिणार ? तुम्हीच लिहा. मी माझी मुद्रा उमटवते'. त्यावेळेस सुदेव म्हणाले की 'तुझ्या शब्दांमध्ये ज्या भावना, प्रेम, श्रद्धा आहे त्या मला शब्दबद्ध नाही करता येणार. त्यामुळे पत्र तूच लिही. यावर रुक्मिणीने रत्नशलाका घेऊन रेशमी वस्त्रावर केशराच्या रंगाने श्रीकृष्णाला पत्र लिहिले. हे जगाच्या इतिहासातील पहिले प्रेमपत्र! ते अद्वितीय होतं. प्रेम आणि भक्ति याचा अपूर्व संगम म्हणजे रूक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले हे पत्र आहे.
रूक्मिणीने मनोवेगाने जाणारा घोडा आणला त्यावर सुदेवाला बसवून निरोप दिला. सुदेव द्वारकेला पोहचल्यावर तिचे सौंदर्य पाहून दिङमूढ झाला. त्याने कृष्णाच्या राजप्रासादात प्रवेश केला. आकाशातल्या तारांगणात चंद्र शोभावा तसा श्रीकृष्ण तिथे शोभत होता. त्याला पाहून सुदेव नतमस्तक झाला. सुदेवाने भगवंताला नमस्कार करायचा आत भगवंताने सुदेवाला नमस्कार केला. 'विद्वान सर्वत्र पूज्यते' असे म्हणत श्रीकृष्णाने एकांतात नेऊन त्याला इथे येण्याचे प्रयोजन विचारले. त्यावेळी सुदेवाने सांगितले की विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणीने तुझ्या रूप गुणांचे वर्णन ऐकून तुला वरले आहे. तिच्या आई-वडिलांना देखील तिला तुला अर्पण करायचे आहे. पण तिचा थोरला भाऊ रुक्मी याला हा विवाह मान्य नाही. त्यामुळे त्याने आपला मित्र शिशुपाल याच्याशी तिचा विवाह ठरवला आहे. म्हणून अगतिक रुक्मिणीने तुला एक पत्र दिले आहे. ते घेऊन मी आलो आहे. कृष्णाने सुदेवाकडून ती रुक्मिणीची प्रेम पत्रिका वाचून घेतली. रुक्मिणी जशी कृष्णमय झाली होती तसाच कृष्णही रुक्मिणीमय झाला होता. त्याने चैद्यादिक राजांना रणात जिंकून रूक्मिणी वरण्याचा निश्चय केला. सारे सैन्य सिद्ध करे पर्यंत खूप वेळ जाईल म्हणून एकटाच सुदेवासह विदर्भ देशी निघाला.
राजधानी कौंडीण्यपुरात विवाहाची तयारी सुरू होती. रुक्मिणी मात्र सुदेव अजून का येत नाहीत याची चिंता करत बसली होती. इतक्यात कृष्णाचा निरोप घेऊन सुदेव परत आले आहेत असा तिला निरोप मिळाला. रुक्मिणीने सुदेवाला पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून आपले काम झाले आहे असे तिला मनोमन पटले. 'रुक्मिणी भिऊ नकोस मी तुझ्या जिवीचा जिवलग श्रीकृष्ण परमात्मा घेऊन आलो आहे असे सुदैवाने म्हणताच रुक्मिणीने त्यांच्या चरणावर माथा टेकूून अश्रूंचा अभिषेक केला. तेव्हा सुदेव म्हणाले 'तू आता भगवान श्रीकृष्णाची पत्नी होणार आहेस. आदिमाया आदिशक्ती आहेस. मीच तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. तू मला कृष्णाकडे धाडलेस हे खरे तर माझ्यावर उपकारच आहेत. त्यामुळे मला त्या परमात्म्याचे दर्शन झाले. मी त्यांना घेऊन आलो त्यात माझे काही कर्तृत्व नाही. श्रीकृष्ण तुझ्या पुण्याईने इथे आला आहे. त्यावेळी रुक्मिणी सुदेवाकडे पाहून म्हणाली "विप्रवर, तुम्ही केलेल्या कामगिरीमुळे मी आज संतुष्ट आहे. तुम्ही वर मागा. जगातील कोणतीही गोष्ट मी आज तुम्हाला देते."
त्यावेळी सुदेव म्हणाले "माते वर देणारच असशील तर एकच वर दे. तुझ्या भक्तीत कधीही अंतर पडू नये आणि तुझी पूजा माझ्या वंशामध्ये अशीच अखंड चालू राहू दे. रुक्मिणीमाता 'तथास्तु'! म्हणाली. तेव्हापासून सुदेवाच्या वंशात रुक्मिणीमातेची पूजा चालत आली आहे. आम्ही रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात हे सुदेवाचे वंशज आहोत. त्यामुळे ही रुक्मिणीची पूजा, भक्ती आम्हाला प्राप्त झालेली आहे.
रुक्मिणीचे विवाहाचे विधी सुरू झाले होते. त्यामध्ये अंबिकापूजन हा विधी होता. सर्व सिद्धता करून चतुरंग सैन्याने वेढलेली रूक्मिणी अंबिकेच्या देवालयात निघाली. तिने अंबिकेला श्रीकृष्ण हाच माझा पति होऊ देत अशी प्रार्थना केली. तिच्या माथ्यावर अंबिकेच्या गळ्यातील माला पडली. आता हीच माला मी यदुपतीच्या गळ्यात घालून त्यांना वरेन असे मनात म्हणून ती गाभाऱ्याच्या बाहेर आली. श्रीकृष्णाने आपला रथ हळूच मंदिराच्या महाद्वाराजवळ आणला. समोर जरासंधाचे अफाट सैन्य पसरले होते. रुक्मिणी हळूहळू पाय टाकत येत होती. श्रीकृष्णाकडे पाहण्यासाठी तिने नजर वर केली. राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा तिला दिसला. तिने हातातील माला श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली. श्रीकृष्णाने आपला हात तिच्या कमरेभोवती लपेटून तिला रथावर घेतले. तिथे सारे जण पाहत असताना श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण केले.
माघ शुद्ध पंचमीला उत्तम मुहूर्तावर श्रीकृष्णाने रूक्मिणी बरोबर विधीवत विवाह केला.
श्रीकृष्णाने वरली रूक्मिणी।
कृपा केली जगतावरी।
विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप आहे म्हणून आज पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा अतिशय थाटात केला जातो. मिरवणूक काढली जाते. आजपासून रंगपंचमी पर्यंत विठ्ठल रूक्मिणीला केशराचे पाणी शिंपडलेला पांढरा पोशाख नेसवला जातो.
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर..
९४०३५५४१६७.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment