कृतार्थ जीवन.
*कृतार्थ जीवन*
नुकतेच परिचारक घराण्यातील ज्येष्ठ सदस्य आदरणीय प्रभाकरपंत परिचारक यांचे दुःखद निधन झाले. जरा मरण यातून कुठला मनुष्य सुटला आहे? हे शाश्वत सत्य असले तरी आपलं माणूस गेल्याचं अतीव दुःख होतेच!!
अवघ्या जनांचं माहेरघर असणाऱ्या पंढरी नगरीत, परमात्मा पांडुरंगाच्या सात सेवाधारी असणाऱ्या परिचारक घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मातुल घराणे म्हणजे आईसाहेब रूक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी, सेवक असणाऱ्या उत्पातांचे!! त्यांची पूर्व पुण्याई मोठी म्हणून अशा नामवंत, जगाच्या मातापित्यांच्या घराण्याशी ऋणानुबंध साक्षात विठू माऊलीनेच जोडले.
आमच्या सगळ्यात थोरल्या आत्यांच्या चार चिरंजीवांपैकी हे द्वितीय चिरंजीव!! मितभाषी, बुद्धिमान, जबाबदार व्यक्तिमत्त्व!!एकत्र कुटुंबाला घट्ट जोडून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कडे होते. आई, प्रिय पत्नी, नंतर थोरल्या आणि धाकट्या भावांच्या निधनानंतर घराण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आमदार सुधाकर पंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या यशापयशात निश्चलपणाने साथ दिली.
नंतर घरात नवेनेतृत्व प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या राजकीय, सामाजिक उभरत्या वाटचालीची दृढतेने पाठराखण केली. आता तरूण तरतरीत नेतृत्व नातवंडांच्या रूपाने पुढे येत आहेत.
त्यांचेही ते मार्गदर्शक होते. स्वतःच्या मुलांइतकेच प्रेम भावांच्या मुलांवर केले.
माझ्या आत्यांनी सगळ्या भावंडांना एका विशिष्ट विलक्षण प्रेम सूत्रात एकत्र बांधले होते. ते प्रेमसूत्र अखेरपर्यंत मजबूत आणि टिकाऊ राहिले. ते आत्यांच्या मुलांपैकी अखेरचे वारस होते. त्यांचे राहणीमान, मोजका व्यायाम, खाण्यापिण्याची अतिशय सुसूत्रता यामुळे खरं तर ते नक्की शतायुषी होणार असे वाटत असतानाच ही क्लेशकारक बातमी ऐकायला मिळाली!! ईश्वरेच्छा बलीयसी हेच खरे!!
मुले सूना नातवंडे अशा भरलेल्या संसारातून त्यांनी कृतार्थतेने निरोप घेतला. पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते अमरच आहेत!! त्यांच्या लहान बहिणी कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
फूल गळे फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरू जुलै
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी?
मीरा उत्पात-ताशी
कोल्हापूर.

Comments
Post a Comment