परिचारक घराण्यातील आधारवड हरपला.


 परिचारक घराण्यातील 'आधारवड' हरपला.




मा. आमदार प्रशांत परिचारक यांचे पिताश्री, सेवाधारी समाजाचे अग्रणी, नामवंत अधिवक्ता श्री. प्रभाकर रामचंद्र परिचारक उर्फ 'बाबा' यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आमदार कै. सुधाकर परिचारकांचा मोठा भाऊ, पाठीराखा म्हणून त्यांनी आदर्श बन्धू कसा असावा याचा वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली !


श्रीक्षेत्र पंढरपूर ! महाराष्ट्राच्या लाडक्या विठुमाऊलीचे भक्तीपीठ, संतांचे माहेर आणि लाखो वारकऱ्याऱ्यांच्या देवाचा गाव. जेथे चंद्रभागेतिरी भक्त पुंडलिकाचा ठाव, या पंढरपूर नगरीमध्ये जी अनेक जुनी नामवंत घराणी आहेत, त्यामध्ये कवठेकर, जोशी, भादुले, भिंगे, अभंगराव, अधटराव, पुरंदरे, सुपेकर, बडवे, उत्पात, ताठे, थिटे, आराध्ये, मांगले यांच्याप्रमाणेच श्री विठ्ठलाच्या सात सेवाधाऱ्यांमधील 'परिचारक' घराण्याचे नाव अग्रणी आहे. पंढरपूरच्या इतिहासात परिचारक घराण्याचे योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे रावबहादुरांचे घराणे म्हणून ते ओळखले जात होते पण त्यापेक्षाही पांडुरंगाच्या सेवाधाऱ्याचे घराणे ही त्यांची खरी ओळख होय. विशेष म्हणजे या सेवाधारी घराण्यातील कर्तृत्ववान समाजसेवक पुरुषांनी आपल्या सेवेचा पैस (क्षेत्र अवकाश) एवढा विस्तीर्ण केला की विठ्ठलाचे हे सेवेकरी पंढरीनगरीचेच समाजसेवक झाले. त्यांनी नगरपालिका, अर्बन बँक अशा अनेक संस्थांच्या धुरा सांभाळत पंढरीच्या विकासात अमूल्य योगदान दिले. विशेषतः रामचंद्र बाळकृष्ण परिचारक, गोविंद बाळकृष्ण परिचारक आणि सुधाकर रामचंद्र परिचारक (आमदार) या तिघांचे सामाजिक योगदान संस्मरणीय स्वरूपाचे आहे. त्या कार्यावर वर्तमान काळात प्रशांत व उमेश परिचारक ही रामलक्ष्मण जोडी आपल्या कुशल समाजाभिमुख कार्याने कळस चढवित आहेत. अशा या ऐतिहासिक समाजसेवारत घराण्यातील अधिवक्ता प्रभाकरपंत उर्फ 'बाबा' यांनी नुकताच वयाच्या ९३व्या वर्षी अंतिम श्वास घेऊन आपला देह विठ्ठलचरणी ठेवला. तशी ही दुःखद घटना असली तरी 'प्रभाकरपंत' ज्या कृतार्थपणे अखेरपर्यंत कार्यरत जीवन जगले ते पाहता हा मृत्यू, एक संतजीवनाच्या वैकुंठ गमनाचा मंगल सोहळा आहे.

श्री विठ्ठलाच्या सेवाधाऱ्यांच्या कमेटीचे प्रमुख कै. रामचंद्र बाळकृष्ण परिचारक तथा 'रामभाऊ' यांच्या ४ सुपुत्रांपैकी 'प्रभाकर' हे दुसरे पुत्र होते. सर्वात थोरले शामराव (अण्णा), नंतर प्रभाकरपंत (बाबा), तिसरे सुधाकरपंत (आमदार) आणि चौथे पांडुरंग तथा अरुणराव हे चार पुत्र म्हणजे रामभाऊ उमाबाईंच्या संसारवेलीवर फुललेले चार वेदच होते. या चार भावंडांना तीन बहिणीही होत्या. कुसुमताई (हळदीकर), नलूताई (वाघोलीकर) आणि छबुताई (काळे) प्रभाकरपंतांच्या मातोश्री उमाबाई तथा माई या रुक्मिणीमातेच्या पुरोहित असलेल्या उत्पात घराण्यातील होत्या.

आमदारांचे पाठीराखे

सर्वात मोठे शामराव (अण्णा) आणि प्रभाकरपंत (बाबा) हे दोघेही एल. एल. बी झालेले होते. पुण्याच्या सुप्रसिद्ध 'आय एल एस लॉ कॉलेज' मध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. त्यावेळी बॅरिस्टर जयकर यांचा या दोघांवर फार मोठा प्रभाव होता. दोघेही पदवीधर होऊन पंढरपुरात आले पण शामरावांनी (अण्णा) वकिली न करता घराण्यातील शेतीचा व्याप सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि प्रभाकरपंतांनी सनद घेऊन वकिली करण्याचा निर्णय घेतला. ते वकील म्हणून अनेक वर्षे पंढरपूर अर्बन बँकेचे कायदेशीर सल्लागार होते. तेव्हा त्यांच्या समवेत पुरंदरे

वकील सुद्धा बँकेचे सल्लागार होते. प्रभाकरपंतांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी धाकटे बन्धु सुधाकरपंत (आमदार) याची अखेरपर्यंत खंबीर पाठराखण केली. संत निवृत्तीनाथांनी जशी बन्धु ज्ञानदेवांची मातृपितृभावाने पाठराखण केली तशी. थोडक्यात प्रभाकरपंत हे सुधाकरपंत (आमदार) यांचे निवृत्तीनाथच होते.

सुधाकरपंतांच्या सर्व राजकीय प्रवासात, वाटवालीत, यशापयशामध्ये 'फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर' अशी त्रिविध भूमिका प्रभाकरपंतांनी वडिलबन्धू म्हणून आदर्शवत सांभाळली. भावाभावातील सत्तास्पर्धा, भाऊबंदकी आपण राजकारणात, समाजात अनेकदा पाहतो त्यापार्श्वभूमीवर 'शामराव, प्रभाकर, सुधाकर, अरुण' या बन्धुंवा एकोपा हा 'एकत्र कुटुंबाचा' आदर्श वस्तुपाठ होता व आहे. सर्वांत मोठे शामराय कुटुंबाची शेती पहात होते, प्रभाकरपंत सेवाधारी व सामाजिक संबंध जपत वकिली करीत होते, सुधाकरपंत हे चोवीस तास लोकसेवेत समर्पित होते. खर्डी, नगरपालिका, तालुका पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, विधानसभा, साखर कारखाने अशा लोकसेवेत २४ x ७ व्यस्त होते. (सध्या मोदी जसे सदा सर्वदा सेवासमर्पित जीवन जगत आहेत, ते सुधाकरपंत फारपूर्वी पासून जगत होते) सर्वांत धाकटे अरुणराव नव्या पेठेतील भादुले हौदाजवळील कापडदुकान य शेती पहात होते. पंढरपुरातील आदर्श एकत्र कुटुंबांपैकी परिचारकांचे कुटुंब एक होते. सुधाकरपंतांना खेड्यापाड्यातील समाजकार्य संपवून बऱ्याच वेळा रात्रीचे १२ वाजत होते, तेव्हा त्यांची वाट पहात त्यांची आई (माई) डोळे लावून माजघरात बसलेल्या असत आणि वरती माडीवरती प्रभाकरपंत जागे असत. सुधाकर आले, जेवले का? चौकशी करूनच प्रभाकरपंत झोपी जात सुधाकरपंत हे ब्रह्मचारी होते. त्यांनी समाजसेवेसाठी व्यक्तिगत प्रपंच केला नव्हता, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांच्या आईचे व प्रभाकरपंतांचे विशेष लक्ष होते. सुधाकरपंत २७ वर्षे आमदार होते पण प्रभाकरपंत सदैव पार्श्वभूमीवरच राहिले. आमदारांचे मोठे भाऊ म्हणून त्यांनी कधीही स्वतःला मिरवले नाही.

सेवाधारी समाजाचे वकील

 अधिवक्ता प्रभाकरपंतांचा 'सेवाधारी कमेटी' मध्ये मोठा सहभाग होता. विठ्ठल मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाताना त्या कायद्याविरूद्ध बडवे, उत्पात आणि सेवाधारी कमेटी असे सर्वजण वेगवेगळे न्यायालयात गेले होते. तेव्हा 'सेवाधारी कमेटी'च्या वतीने अधिवक्ता प्रभाकरपंत परिचारक आणि अधिवक्ता पुजारी हे दोघे प्रमुख होते 'सेवाधारी कमेटी'ची दोन कार्यालये होती, एक विठ्ठल मंदिरातील खंडोबा मंदिरा शेजारी होते आणि दूसरे रूक्मिणी पटांगणात एका किराणा दुकानाच्या (पालिमकर) माडीवर होते तेथे न्यायमूर्ती कांटावाला (हायकोर्ट) आले होते. तेव्हा मला प्रभाकरपंतांसमवेत जाण्याचा योग लाभला होता न्या कांटावाला चंद्रभागेपलिकडील गुजर घाटावरील गादीचे दर्शन करण्यास गेले तेव्हाही पंतांसमवेत मी होतो. असे अनेक संस्मरणीय क्षण माझ्या मनीमानसी आज दाटलेले आहेत.

प्रभाकरकाकानी सुधाकरपंतांप्रमाणेच पुढील काळात आपले सुपुत्र प्रशांत आणि उमेश यांच्या नेतृत्वगुणांची पाठराखण केली प्रतिभाकाकूंच्या अकाली निधनानंतर प्रभाकरपंतांनी मुलांना आईचेही प्रेम दिले. प्रशांतच्या 'पांडुरंग परिवार', 'अर्बन बँक', 'विधानपरिषद' या कार्याचा त्यांना विशेष अभिमान होता. तसाच उमेशच्या युटोपियन शुगर उद्योगाचाही त्यांना सार्थ अभिमान होता. मुलांचे कार्यकर्तृत्व आणि नातवंडांची उच्चशिक्षित गुणवत्ता यशस्विता याची प्रभाकरपंत कृत्तार्थता अनुभवत होते. प्रकृती सांभाळून त्यांचा नित्यनेम व भङगावकर राममंदिर दर्शन अखेरपर्यंत सुरू होते.

'प्रभाकर रामचंद्र' म्हणजे त्यांची इंग्रजी आद्याक्षरे 'पी. आर' परिचारक होती. नावाप्रमाणेच त्यांचा 'पीआर' (पब्लिक रिलेशन) अफाट होता. सर्वांच्या सुखदुःखात ते परिचारक घराण्याचे प्रतिनिधी म्हणून आवर्जून हजेरी लावत. त्यांचे लाघवी बोलणे, प्रेमळपणे आत्मीयभावाने चौकशी करणे. आजही अनेकांच्या स्मृतीपटलावर पिंपळपाना सारखे संस्मरणीय असेल, त्यांचा मदतीचा हात गरजूंना कधीही विन्मुख पाठवित्त नव्हता. खरंतर 'परोपकारी वृत्ती' ही परिचारक घराण्याचीच ओळख आहे. 'परिचारक वाडा' म्हणजे अनेकांचा आधार होता. आज त्यांच्या जाण्याने परिचारक घराण्यातील जुन्या पिढीतील अखेरचा मालुसरा काळाच्या पडद्या आड गेला आहे. त्यांच्या जाण्याने प्रशांत (मा.आमदार), उमेश, महेश यांचे पितृछत्र हरवले असले तरी माझ्यासह अवघे पंढरपूरकर पोरकेपणाचे दुःख अनुभवित आहे. कालाय तस्मै नमः ।

असतो मा सद्गमय । मृत्योर्मा अमृतगमय ।

विद्याधर ताठे.

संपादक.

साईलीला, शिर्डी संस्थान,

एकता मासिक,पुणे.

पराग बिल्डींग, तळमजला, पद्मरेखा सोसायटी, सहवास बसस्टॉप जवळ, कर्वेनगर,

मोबाईल ९८८१९०९७७५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.