देव जेवला हो.


 *देव जेवला हो*


नुकताच पहिलीत प्रवेश घेतला होता. अवघं सहा वर्षांचं वय. चिंकहिलला प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आई वडिलांनी मला पंढरपूरला आज्जी जवळ ठेवले होते. मुक्ताबाईच्या मठातली आदर्श प्राथमिक विद्यालय ही माझी शाळा. तिथे गेल्यावर प्रथम आई तात्यांच्या आठवणींनी डोळ्यात आषाढ सरी कोसळत!! घरी आले की कोंडीबाच्या मागे मला चिंकहिलला घेऊन चल असा लकडा लावत असे. कोंडीबा 'चला ताई' असे म्हणत मला धुंडामहाराजांच्या मठापर्यंत नेऊन परत घरी घेऊन येत असे. दर शनिवारी तात्या माझ्या साठी पंढरपूरला येत असत. एकदा ते आल्यावर त्यांना शाळेत नुकतंच शिकवलेलं 

*देव जेवला हो देव जेवला*

*या या डोळ्यांनी मी पाहिला*

हे गाणं नृत्य अभिनय करून दाखवलं. ते भलतेच खुश झाले. मला जवळ घेऊन कौतुक करायला लागले. एकदा शाळेला सलग चार दिवसांची सुट्टी होती. मग ते मला चिंकहिलला घेऊन आले. त्या काळात नुकताच चपट्या गुंडाळणाऱ्या फितीचा रेकाॅर्डर निघाला होता. तो आणून खूप कौतुकानं त्यांनी माझं गाणं रेकॉर्ड केलं.  त्यांना जेव्हा माझी आठवण येत असे तेव्हा ते गाणं ते ऐकत असत. त्यांनी मला 'हे गाणं कुणाचं आहे माहित आहे का?' असं विचारून  संत नामदेवांची सगळी गोष्ट मला सांगितली. ती आजही माझ्या स्मरणात आहे. ती नामदेवांची माझी पहिली ओळख!! देव ज्याच्या हातून जेवतो तो नामदेव मला अगदी आपल्यातला वाटायला लागला. नामदेवांसारखं आपणही देवाला जेऊ घालावं असं किती तरी वेळा मनात येत असे.. नंतर भोवतालाची जाण यायला लागल्यावर देऊळ, विठोबा रूक्मिणी, नामदेव पायरी अशी स्थानं नित्य परिचयाची झाली.  महाद्वारातील देवळाची  पितळेच्या पत्र्याने मढवलेली पहिली पायरी पाहून मला अनेक प्रश्न पडत. मी एकदा त्या पायरीवर चढून वर जाऊ लागले तर माईने मला सांगितलं या पायरीवर पाय द्यायचा नाही. ही संतश्रेष्ठ नामदेवांची पायरी आहे. नंतर  मग अनेक प्रसंगातून, अभ्यासाच्या पुस्तकातून, घरी येणाऱ्या वारकऱ्यांच्या कडून नामदेवांविषयी खूप काही कळत गेले. लहानपणी देवाला जेऊ घालणारा विठ्ठलाचा लाडका भक्त. विठ्ठल रोज त्याच्याशी हितगुज  करत असे.  

 *आषाढी कार्तिकी विसरू नका मज*

*सांगतसे गूज पांडुरंग* असं मनातलं गूज सांगणारा विठ्ठल त्याचा सखा होता. याचा त्याला कोण अभिमान होता. ‌ याच अहंकाराचा मुक्ताईने गोरोबा काकांकडून निचरा केला. त्यामुळे विसोबा खेचरांसारखा गुरु मिळाला. वाळवंटात कोरडी पोळी कुत्र्याने नेल्यावर ते तुपाची वाटी घेऊन मागे पळू लागले. गुरुकृपेने त्यांना त्या कुत्र्यात ईश्वर दिसला. पंढरपूर, विठ्ठल याविषयी त्यांना अत्यंतिक ममत्व होते. जेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना तीर्थाटनास चलण्याविषयी विचारले तेव्हा नामदेवांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. परंतु विठ्ठलानेच जाण्यासाठी सांगितले तेव्हा मोठ्या कष्टाने ते तीर्थाटनास गेले. पण तिकडून आल्यावर त्यांनी आपल्या गाथेत पंढरी महात्म्य असं स्वतंत्र प्रकरण लिहिलं. ते म्हणतात भारत भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रं आहेत. पण प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी काही ना काही न्यून आहे.  सर्वार्थांने परिपूर्ण असे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे पंढरपूर. कारण इथे सगळे देव वस्तीस आले आहेत. इथल्या प्रत्येक कणात देव आहे.

 *येथील तृण आणि पाषाण अवघे देव जाणावे* असा नामदेवांना पंढरपूर आणि विठ्ठला विषयी अभिमान होता.. 

*नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी*  या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. ते पंजाब मध्ये वीस वर्षे राहिले. तिथली भाषा शिकले. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात त्यांचे अभंग समाविष्ट आहेत. ज्ञानदेवांनी समाधी घेतली त्यावेळी ते तिथं हजर होते. त्यांच्या अभंगातून आपल्याला माऊलीच्या संजीवन समाधीचे आकलन झाले. गावकुसाला लागलेल्या आगीत चोखोबांचा अंत झाला. त्यावेळी त्यांची 'विठ्ठल विठ्ठल' असा आवाज येणारी हाडे आणून महाद्वारी समाधी बांधली. जनाबाईस विठ्ठल भक्ती शिकवली. अशी अनेक कार्ये केल्यावर त्यांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली ही जाणीव झाली. त्यांना सायुज्य मुक्ती नको होती. 

*वैकुंठासी आम्हा नको धाडू।*

 *वास रे पंढरी सर्वकाळ।*

 *नामा म्हणे मज येथेचि हो ठेवी।*

 *सदा वास देई चरणा जवळी।।*  

पंढरपूरला येणाऱ्या भगवद् भक्तांची धूळ आपल्या मस्तकी कल्पान्ता पर्यंत पडावी या उदात्त हेतूने नामदेव आणि दासी जनी सह घरातील चौदा जणांनी विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरी खाली आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी घेतली..

*नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे*

 *संत पाय हिरे  देती वरी*

नामदेव असे भोवतालातून समजत गेले. त्यांचं चरित्र नक्कीच अद्भूत रम्य आणि भक्तीभावाने ओथंबलेलं आहे.  जेव्हा जेव्हा पंढरपूरला जाते त्यावेळी देवाचे दर्शन नाही मिळालं तरी नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही... तोच तर त्यांचा हेतू होता ना!!!



मीरा उत्पात-ताशी.

९४०३५५४१६७.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.