लावणीचा निस्सीम उपासक, लावणीसम्राट कै. ज्ञानोबा उत्पात.
*लावणीचा निस्सीम उपासक-* *लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात.*
आज १९जुलै. ज्ञानोबाकाकांना जावून सोळा वर्षे झाली. काळ किती भराभरा पुढं सरकत राहतो. ते आपल्या मध्ये नाहीत हे आजही खरं वाटत नाही. ज्ञानोबा काका म्हणजे एक गोड व्यक्तिमत्त्व. अत्यंत निगर्वी, साधे, कुठलाही अभिनिवेश नाही. सतत हसरी, प्रसन्न मुद्रा. आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव. गोष्टीवेल्हाळ, किस्से रंगवून सांगण्याची विशिष्ट लकब. अनेक पुरस्कार मिळाले पण कुठल्याही गोष्टीचा कधीच गर्व झाला नाही. असे हे आमचे ज्ञानोबा काका म्हणजे सगळ्यांचे ‘माऊली’ आपल्या मधून जाऊन आज सोळा वर्ष झाली.
ज्ञानोबा काका जाण्यापूर्वी पंधरा दिवस आधी ते माझ्याकडे कोल्हापूरला आले होते. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाने त्यांच्या लावणी गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यापीठातल्या गेस्ट हाऊस वर त्यांची सोय केल्याचे आयोजकांनी त्यांना कळवले होते. पण आयोजकांना त्यांनी ‘अहो माझी पुतणी कोल्हापुरात असताना मी गेस्टहाऊसवर कशाला राहीन’ असे सांगून ते हक्काने आणि कौतुकाने माझ्या घरी आले. माझे घर विद्यापीठाच्या जवळ असल्याने त्यांना फार दगदगही झाली नाही. विद्यापीठातला कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. हाॅल खचाखच भरला होता. विद्यार्थी, श्रोते रंगून गेले. त्यांच्या लावणी गायनाला ‘वन्स मोअर’ मिळत राहिला. खरं तर लावणी म्हटलं की सुंदर साजशृंगार केलेली स्त्री समोर उभी राहते. पण ज्ञानोबा काकांची लावणी ऐकताना इतकं रंगून जाणं होतं की समोर साजशृंगार ल्यायलेली स्त्री नाही ही उणीव कुणालाच भासत नाही. श्रोत्यांना आपल्या लडिवाळ अदाकारीने आणि लावणी गायकीने ते भारून टाकत असत. पेशवाईतील लावणी त्या काळातल्या लकबीसह गाऊन दाखवण्याची जबरदस्त अदाकारी त्यांच्याकडे होती. श्रोते तल्लीन होऊन गेले होते. आजही त्यांच्या त्या कार्यक्रमाची आठवण नाट्यशास्त्र विभागात हमखास निघते. त्यावेळी तिथे प्रसिद्ध लावणी नृत्यांगना मधु कांबीकर या देखील आल्या होत्या. काकांना नमस्कार करून ‘मला काही अदा शिकायच्या आहेत. मी कधी येऊ?’असे त्यांनी विचारले. काका म्हणाले ‘मी काय शिकवणार? तुमच्याकडे आहेच की सगळं’.. कानाला हात लावत त्या म्हणाल्या ‘काय बोलता माऊली? तुमच्या ज्ञानाचा लाभ मला पण होऊ द्या की’. यावर काका म्हणाले ‘कधीही या. मी शिकवायला तयारच आहे’. या दोन कलावंताचा संवाद मी शेजारी उभे राहून ऐकत होते. दोघेही लावणीला वाहून घेतलेले कलावंत आपापल्या स्थानी उंचीवर होते. इथवर पोचून शिकण्याची , शिकवण्याची उमेद दोघांकडे होती.आणि कमालीचे नम्र होते. त्यांच्यामधली ही विनम्रता उंचीवर पोचूनही नम्र कसे असावे याचा वस्तुपाठच होती. कार्यक्रम संपल्यावर रसिकांनी त्यांना गराडा घातला. प्रत्येकाला त्यांनी हसत-खेळत उत्तरे दिली. घरी रात्री जेवणे झाल्यानंतर मस्त गप्पांची मैफल रंगली. त्यांच्या पोतडीतून अनेक किस्से निघत होते. ते ऐकता ऐकता मध्यरात्र कधी झाली कळलेच नाही. एक दिवस माझ्या घरी अतिशय आनंदात आणि उत्साहात राहिले. ‘आता परत तुझ्या काकूला बरोबर घेऊन येतो बर का’ असे सांगत ते पंढरपूरला गेले आणि पंधरा दिवसांतच त्यांच्या मृत्यूची अविश्वसनीय बातमी आली. कोल्हापूरचा विद्यापीठातला कार्यक्रम हा त्यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. आजही नाट्यशास्त्र विभागात त्यांच्या या कार्यक्रमाची आठवण आवर्जून निघते. हे ज्ञानोबा काकांनी आयुष्यभर केलेल्या लावणी उपासनेचे फळ आहे.
पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आदी थोर गायकांनी ज्ञानोबा काकांच्या लावणी गायनाला गौरवले. ठाण्यात झालेल्या दया पवार प्रतिष्ठानच्या लावणी महोत्सवातही उस्ताद झाकीर हुसेन, तौफिक कुरेशी, पंडित शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांनी गायनाला मुक्तकंठाने दाद दिली.
नामवंत शाहीरांनी उत्तरार्धात भक्तीरसानी परिपूर्ण लावण्या रचल्या. लावणीची ही दुसरी तेजस्वी बाजू ‘लावणीतील भक्तीदर्शन’ या कार्यक्रमाद्वारे ज्ञानोबा काकांनी आणि वा.ना. काकांनी रसिकांसमोर आणली. हा कार्यक्रम १९८८ साली कोल्हापूरात पद्माराजे हायस्कूल च्या सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमालाही मी उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. उत्तरोत्तर रंगत गेला. त्यावेळी पण ज्ञानोबा काका, वाना काका, वासूनाना यांच्या सह लावणी मंडळातील सर्व मंडळी माझ्या कडे आली होती..
मध्यंतरीच्या काळात अस्सल लावणी लोप पावत चालली असताना ज्ञानोबा काकांच्या अथक परिश्रमामुळे लावणीला नवसंजीवन मिळालं. अस्सल लावणीला आपल्या कलावंत शिष्यांकडून, कधी स्वतः महाराष्ट्रभर पोहोचवलं. त्यांच्या लावणीचा आस्वाद साहित्यिक गायक-संगीतकार अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींनी घेतला. आज महाराष्ट्रातील तमाशा थिएटर मध्ये ज्या जुन्या लावण्या म्हटल्या जातात त्या केवळ ज्ञानोबाकाकांमुळे. तमाशा कलावंत काकांना ‘माऊली’ म्हणत असत. सौंदर्यवान, रूपवान कलावंतीणीच्या सहवासात असूनसुद्धा कधीच त्यांना मोह झाला नाही. कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. ‘गुरू’ च्या भूमिकेपासून कधीच ढळले नाहीत.
छाया-माया खुटेगावकर, राजश्री- आरती नगरकर, उमा-नंदा इस्लामपूरकर, रेश्मा-जयश्री जामखेडकर यासारख्या अनेक कलावंतांनी काकांकडून बैठकीची लावणी अदेसह शिकून नावारूपाला आणली. त्यांच्या लावणीने केवळ महाराष्ट्रातीलच शिष्य घडवले नाहीत तर ‘ख्रिस्तीन’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकणाऱ्या महिलेलाही त्यांनी मार्गदर्शन केले. तिने ‘मराठी लावणी चे संगीत पैलू’ या विषयावर पीएचडी केली. त्यात ‘ज्ञानोबा उत्पात यांची जुनी बैठकीची लावणी’ यावर एक प्रकरण आहे.
मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांना लावणीचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानोबा काकांना खास निमंत्रित करण्यात आले होते.
महाराष्ट्रीयन लोककलेतील महत्त्वाचा दागिना म्हणजे लावणी या लावणीतला झगमगणारा, आपल्या तेजाने झळाळणारा हिरा म्हणजे बैठकीची लावणी. त्या हिऱ्याला, आपल्या अदाकारीने पैलू पाडणारा कलावंत म्हणजे ज्ञानोबा काका. आजही ‘बैठकीची लावणी’ म्हटलं की ‘ज्ञानोबा उत्पात’ हेच नाव समोर येतं. त्यांच्या लावणीतील योगदानामुळे रसिकांनी त्यांना ‘लावणी सम्राट’ ही उपाधी दिली. असा हा आत्ममग्न, प्रसिद्धीचा हव्यास नसणारा थोर कलावंत. महाराष्ट्रात जोपर्यंत लावणी आहे तोपर्यंत त्यांचे नाव लावणीच्या बरोबरच घेतले जाईल.
आज त्यांचा सोळावा स्मृतिदिन. ते नाहीत असं वाटतच नाही.
आजही मी त्यांच्या घरी गेल्यावर ‘या मीराबाई’ असा भरदार आवाज घुमल्याचा, खिडकी जवळच्या पलंगावर बसून गाणं म्हणण्याचा,नाना किस्से, हास्याचे फवारे उडवत मैफिल जमवल्याचा भास होतो.
महाराष्ट्राच्या लावणीच्या लावण्याची नजाकत केवळ महाराष्ट्र, दिल्ली नव्हे तर जगभर उकलून दाखवणाऱ्या ज्ञानोबा काकांना त्यांच्या स्मृती दिना बद्दल विनम्र अभिवादन!!
याच दिवशी समस्त उत्पात समाजाची अजून एक खूप मोठी हानी झाली. ज्ञानोबा काकांचे घनिष्ठ मित्र आणि लावणी गायक वासुदेव उत्पात यांचे दुःखद निधन झाले.. ज्ञानोबा काकांच्या दुःखद निधनाची बातमी वासू नाना यांना कळाल्यावर त्यांनी 'माझा मित्र गेला आता मी तरी कशाला राहू' असे म्हणत मृत्यूचा स्वीकार केला. ह्या दोन दिग्गज लावणी गायकांच्या निधनाने उत्पात समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपले सर्वस्व लावणी साठी अर्पण करणाऱ्या या दोन लावणी सम्राटांना मानाचा मुजरा!! आणि भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
©️ मीरा उत्पात- ताशी,
9403554167.

Comments
Post a Comment