सृजनाचे रंग.
*सृजनाचे रंग*
ऋतुचक्र आता वसंताच्या उंबरठ्यावर उभे आहे. शिशिर आणि वसंताचा हा संधिकाल मनावर विलक्षण मोहिनी घालतो. नवसर्जनाचे मोहक रंग सृष्टीवर उमटतात आणि लक्षात येतं की ऋतू बदलतोय!! तनामनाला गारठवून टाकणारी थंडी संपली. परवापर्यंत एकेक पाने गाळीत खराटा झालेल्या निष्पर्ण झाडांना लालसर बाळपालवी फुटली आहे. लाल डोळ्यांचे काळे कोकिळ आम्रपालवीत, मोहरात दडून आर्त स्वरात कूजन करत आहेत. स्वर्णरंगी बहावा तटतटून फुलला आहे. इतका की झाडावर सोन्याची फुलेच फुले! एकही पान नाही!! कडुनिंबावर लाल चाॅकलेटी पानांबरोबर लोभस पांढरी फुलेही दिसू लागली आहेत. केशरी, लालभडक फुलांनी पळस पांगारे फुलले आहेत. त्यांच्या वर भुंगे, मुंग्या, पक्षी मध पिण्यासाठी गर्दी करायला लागले आहेत. मंद वासाच्या, अतिनाजूक पाकळ्यांच्या फुलांनी शिरीष फुलून आला आहे. संध्याकाळी त्याच्या खाली नाजूक फुलांचा खच पडलेला असतो. एक मंद सुवास दरवळत राहतो. कोपऱ्यात फुललेल्या मोगऱ्याच्या शुभ्र फुलांनी आणि मधुर गंधानी आठवणींची दुखरी कळ काळजात उमटवलेली असते. समोरच्या अंगणात लाल चाफा फुलांनी नुसता बहरला आहे. एकही पान नाही. नुसते गर्द लाल फुलांचे गुच्छ!! आणि संध्याकाळी आकाश निरनिराळ्या रंगांचे शेले पांघरून जणू काही रंगपंचमी खेळत राहते. सारा निसर्ग निरनिराळे मनोवेधक रंग देवून त्यात सामील होतो. ही अशी भोवताली नैसर्गिक सुंदर रंगाची उधळण पाहूनच आदिम माणसाला पहिल्यांदा रंगपंचमी खेळावी वाटली असेल...
या काळात सृजनाचे अनेक रंग भोवताली दिसतात. होळीत थंडी जळून जाते. आणि उष्णतेची चाहूल लागते. शिशिरात गोठलेले चैतन्य उष्णतेच्या चाहुलीने फुलू लागते. झाडे वेली नवपालवीने परत सृजनासठी सज्ज होतात. निरनिराळे पक्षी जोडीदार निवडून घरटी बांधतात. त्यांच्या लगबगीने सृष्टीवर नवचैतन्य पसरलेलं आहे. अशा या नवसृजनाच्या काळात माणसांच्या मनातही प्रणयाच्या उर्मी दाटून येतात. सृष्टीवर पसरलेल्या रंगाची उधळण पाहून त्याला आपणही रंगोत्सव करावा असं वाटलं असेल का? प्राचीन काळापासूनच्या साहित्यात रंगोत्सवाचे उल्लेख आहेत. मदनाचा सखा वसंत. त्याच्या स्वागतासाठी हा होळीचा रंगोत्सव!! संस्कृत साहित्यात पळस पांगाऱ्याच्या फुलांपासून रंग तयार करून बागांमध्ये रंग खेळल्याचे बहारदार वर्णने येतात.. मराठी शाहिरांनी ही होळीच्या, रंगपंचमीच्या बहारदार लावण्या रचल्या आहेत. उत्तर भारतात होळीच्या दिवशीच रंग खेळतात. तिथे राधा कृष्णाच्या प्रेमाच्या होळीचे रंग ठिकठिकाणी आहेत. पण महाराष्ट्रात होळी नंतर पाचव्या दिवशी रंगपंचमीला रंग खेळण्याची प्रथा आहे. आपल्या कडे रंगपंचमी खऱ्या अर्थाने बहरली ती पेशवाई मध्ये!! पेशवाईच्या उत्तरार्धात शाहिरी काव्याला राजाश्रय मिळाला. शाहीर आणि लावणी नर्तिकांना राजदरबारात सन्मान मिळू लागला. अनेक शाहीर आपल्या प्रतिभेने लोकप्रिय झाले. त्याकाळात खेळलेल्या रंगपंचमीचे वर्णन होनाजी बाळा, प्रभाकर यांसारख्या अनेक शाहिरांनी आपल्या लावण्यांत केले आहे. त्याकाळातील काही लावणी गीतं प्रसिद्ध आहेत. पण काही जुन्या दुर्मिळ अप्रकाशित लावण्यांचा संग्रह माझ्या माहेरी समस्त उत्पातांच्या कडे आहे. हे माहीत झाल्याने माझ्या घरी लावणीचा आनंद घ्यायला पु.ल.देशपांडे, वसंतराव देशपांडे, इचलकरंजीचे भिडे आले होते. माझे काका ज्ञानोबा उत्पात आणि वा.ना.उत्पात यांनी जुनी, दुर्मिळ लावणी महाराष्ट्रच नव्हे तर देशभर नेली. परदेशी अभ्यासक लावणीचा अभ्यास करण्यासाठी पंढरपुरी आले. आजही पंढरपुरात होळी ते रंगपंचमी असा उत्पातांचा लावणी महोत्सव साजरा केला जातो. उत्पातांच्या लावणीचा आस्वाद भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, पु.ल.देशपांडे, झाकीर हुसेन, दुर्गा भागवत, किर्ती शिलेदार आदी मान्यवरांनी घेतला आहे.
असे सृजनाचे भरभरून फुललेले निरनिराळे रंग भवताली दाटले आहेत. सृष्टी सजवणाऱ्या, साक्षात मदनाच्या सख्याचे, वसंताचे स्वागत आपणही असेच रंगात न्हाऊन करावे असे ज्या आदिम व्यक्तीला पहिल्यांदा वाटले त्याच्या रसिकतेला मनापासून दाद!!
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.
९४०३५५४१६७.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment