बहार, स्वरसाधनेच्या मैफिलीचा.
बहार स्वरसाधनेच्या मैफिलींचा..
साधारणपणे कार्तिक वारी झाली की
स्वर साधना मंडळाच्या शास्त्रीय गायन,वादन,कथ्थक नृत्य या मैफिलींचे वेध लागत असत.
अतिशय उच्च कोटीच्या विद्वान कलाकारांच्या गायनाच्या त्याच बरोबर वाद्य वादनाच्या आणि कथ्थक अथवा भरतनाट्यमच्या मैफिलीची सुरस मेजवानी पंढरपूरच्या रसिक गुणीजनांना मिळत असे.
पंढरपूर हे आध्यात्मिक क्षेत्रासोबत अनेक चांगल्या कलांचे माहेरघर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जगन्नाथ बुवा पंढरपूरकर हे ज्येष्ठ शास्त्रीय गायक होते त्याचबरोबर
श्री.शंकरअप्पा मंगळवेढेकर हे मृदुंग वादक होते.
श्री.तात्या मंगळवेढेकर हे उत्तम शास्त्रीय गायक होते, त्याचबरोबर माऊली उत्पात हे लावणी सम्राट होते.
शोभना उत्पात ह्या शास्त्रीय संगीताचे धडे देत असत.
अशा पंढरपूरच्या सांगीतिक व आध्यात्मिक वातावरणात स्वर साधनेचा पाया रचला गेला.
स्वर साधनेची उभारणी करताना पंढरपुरातील अनेक प्रतिष्ठित प्रतीतयश डॉक्टर,कलाकार,व्यापारी,गायनाची आवड असलेले राजकारणी यांचा सिंहाचा वाटा होता.
यामध्ये मूळ पाया रचणारे श्री.दादा खडके तसेच श्री.काका खडके यांचं मोलाचं योगदान होतं.
याच सोबत माजी.आमदार श्रीमंत
श्री.सुधाकरपंत परिचारक मालक,
श्री बापू जोशी(बापू काका),
श्री.वा.ना उत्पात(वा.ना काका)श्री मलिक बडवे,श्री सुधाकर मालक कवठेकर,
डॉ उमाकांत उत्पात, डॉ विनय भोपटकर, श्री अरुण मालक परिचारक,
श्री.वसंत खर्डीकर, श्री.नंदकुमार डिंगरे,
डॉ.श्रीपाद काणे, श्री अंधळगावकर वकील (मोठे), श्री.बंडोपंत सबनीस, श्री.प्रदीप भडगावकर, श्री.पारसवार बंधू, श्री.लक्ष्मण बनवस्कर, श्री.मनू खरे, श्री.मनू दाते हे अनेक दिग्गज ह्या स्वरसाधनेच्या कमिटीमध्ये होते.
या लोकांच्यामुळेच देशातील अतिशय विद्वान प्रसिद्ध गायकांचे गायन त्याचबरोबर विद्वान गुणीजनांचे वादन आणि अनेक विदुषींचे कथ्थक,भरतनाट्यम बघावयास मिळाले.
श्री.पंडीत जसराज,पद्मविभूषण बेगम परविन सुलताना, श्री.पंडीत राशीद खान, श्री.पंडीत जितेंद्र अभिषेकी,
श्री.शौनक अभिषेकी, श्री.पंडीत भीमसेन जोशी,शोभा गुरटू, प्रभा आत्रे (ठुमरी गायिका) गिरीजादेवी,माणिक वर्मा,
देवकी पंडित,शुभा मुदगल,
अजित कडकडे,अजय पोहनकर असे अनेक गायक येऊन आपली कला व सेवा सादर करून गेले.
वादकांच्या मध्ये श्री.पंडीत बिस्मिल्ला खान यांनी पांडुरंगाच्या समोर शहनाई वादन करून धर्म,जात,पंथ यांच्या भिंती पाडून कलेतून पांडुरंगाची सेवा केली होती.
पंडित अल्लारखा खां, श्री.पंडीत झाकीर हुसेन, श्री.पंडीत हरिप्रसाद चौरसिया, श्री.पंडीत शिवकुमार शर्मा,
श्री.पंडीत अमजद अली खान,
श्री.पंडीत राम नारायण शर्मा,
श्री.पंडीत रविशंकर (हार्मोनियम वादक) श्री.आप्पा जळगावकर अश्या अनेक दिग्गजांचे वादन ऐकले आणि पाहिले..
कथ्थक नृत्य आणि भरतनाट्यम देखील पाहू शकलो हे फक्त स्वर साधनेच्या माध्यमातून !
त्या काळात मोबाईल नव्हता चांगल्या गोष्टी गायन,वादन पाहायचे असेल तर
स्वर साधना हेच एक माध्यम होते,
स्वर साधनेच्या माध्यमातून सुगम संगीतही ऐकले, श्री.शरद सुतावने, विदुषी उषा मंगेशकर, पुष्पा पागधारे, अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी यांच्या माध्यमातून सारी भावगीते,भक्तीगीते ऐकावयास मिळाली.
तसं पंढरपूर हे कानसेनांच आणि उत्तम खवय्यांचं गाव आहे.अनेक वर्ष रेडिओ ऐकल्यामुळे जरी गाता येत नसले तरी कुठली तान कुठे आहे हे पंढरपूरच्या रसिकांना चांगलं माहीत होतं,त्यामुळे प्रत्येक समया वर रसिकांची उत्तम दाद आणि टाळी ही असायचीच,यामुळे गायकांना अतिशय आनंद वाटत असे.
साधारण रात्री नऊ वाजता कार्यक्रम आहे म्हटलं की अनेकांच्या घरातून कार्यक्रमाला जाण्यासाठी लगबग होत असे,कारण उच्च कोटीचे स्वर्गीय गायन सुख चुकू नये हीच मोठी पंढरपूरच्या रसिकांची धडपड असे.
अनेक मैफिली रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत होत असत.
पंढरपूरकरांच्यासारखा पक्का दाद देणारा रसिक मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही.
या शास्त्रीय मैफिली ऐकल्यामुळे सुगम संगीतातील गाण्याची उच्चता देखील कळून आली.
कार्यक्रमाला येणारा सर्वच प्रकारचा वर्ग होता.कानसेन,गानसेन, 'ढ'सेन..!
सगळे जातात म्हणून आपण गेलं पाहिजे, नाहीतर रसिकांच्या जाती बाहेर आपण एकटे पडू या जाती प्रकारात हे 'ढ'सेन होते.
त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा पलीकडच्या रांगेत कोण बसलंय यातच जात होता. समोर काय चाललय याचे त्यांना काही देणे घेणे नसे.
असो व्यक्ती तितक्या प्रकृती..
पण स्वर साधनेच्या उच्च कोटीच्या कार्यक्रमांचा पंढरपुरातील अनेक गायकांच्या जीवनावरती जबरदस्त परिणाम झाला,ज्या मुळे अनेकांनी शास्त्रीय संगीताची रीतसर तालीम घेऊन विशारद पर्यंत आपलं संगीतिय शिक्षण पूर्ण केलं. यात सौ.माधुरी अभय जोशी
(व्हाईस चेअरमन,पंढरपूर अर्बन बँक),
सौ.नयनाताई भोपटकर,सौ.शुभांगी ताई मनमाडकर,श्री प्रसाद कुलकर्णी,
सौ.स्वानंदी काणे, श्री.अरुण जोशी,
सौ.गौरी खासनिस-अमळनेरकर,
डॉ.प्राजक्ता बेणारे या आणि अनेकांनी संगीताची अविरत सेवा सुरू ठेवली आहे.
पण काही जणांवर या स्वरसाधनेचे एवढे गारुड होते की गाता येत नसले तरीही काहीतरी दाखवलं पाहिजे,
यासाठी काही महिलांनी फोटोग्राफरला घरी बोलावले आणि हातात तानपुरा घेऊन , एक वेणी पुढे घेऊन त्यावर गजरा माळून शास्त्रीय संगीत गाते अश्या पोज मधले फोटो काढले तो फोटो स्टुडिओ मध्ये पाहिल्यावर असं वाटलं की ह्या आता सकाळचा भैरव गाणार की दुपारचा जौनपुरी गाणार,की संध्याकाळचा मारवा गाणार !
फोटो पाहिल्यावर खूप हसू आलं आणि खूप कीवही आली, कारण नसलेल्या गोष्टी दाखवण्याचा केविलवाणा अहंकारी प्रयत्न होता तो दुसरे काय?
परंतु स्वर साधनेने अनेकांना प्रेरणा दिली, शिकवलं!
त्यामुळेच अनेकांच्या जीवनात संगीत आजपर्यंत टिकून राहिलं.
या कार्यक्रमाला अनेकांचे हातभार लागले. ह्या सगळ्या गायकांना पंढरपुरात आणून कला व सेवा देण्यासाठी ज्यांनी मोठा वाटा उचलला ते ज्येष्ठ तबलावादक पंडीत
श्री.सुरेश तळवलकर!
पंडीतजीच्या एका शब्दावर सर्व गायक पंढरपूर मध्ये येऊन आपली कला देत असत आणि पांडुरंगाच्या समोर सेवा घडवत असत.
या कार्यक्रमाला अनेकांचे हातभार देखील लागले विशेषता साऊंड सिस्टिम साठी
श्री.भगवानराव मनमाडकर यांनी नेहमीच 'ना नफा ना तोटा'या तत्त्वावर कायमच या सुगम मैफिलींना सहकार्य केले.
ह.भ.प श्री तनपुरे महाराजांचा मठ या स्वरमयी मैफिलीसाठी कायमच उपलब्ध असे.
त्यासाठी ह.भ.प श्री.तनपुरे महाराजांच्या ऋणात राहणं योग्य होईल.
आज मोबाईल, टीव्हीचा जमाना जरी असला तरी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची बरोबरी ही रियालिटी शो बरोबर होऊ शकत नाही,पण काय करणार?
पंढरपूरचे रसिक चातकासारखी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची वाट पाहत आहे.
एवढेच रसिक-प्रेक्षकांच्या हातात आहे,
आता आदरणीय
आमदार श्री.प्रशांत मालक परिचारक त्याचबरोबर श्री.नाना मालक कवठेकर आणि
डॉ.मिलिंद जोशी या मागणीला कितपत न्याय देतात आणि पुन्हा एकदा स्वर साधनेचा गतकाळ परत एकदा आणतात हे पाहुयात !
डॉ.प्राजक्ता गोपाळराव बेणारे.
जिल्हाध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा
सोलापूर.

Comments
Post a Comment