संभाव्य पाणीटंचाईबाबत उपाययोजना कराव्यात.- प्रांताधिकारी गजानन गुरव.
संभाव्य पाणी टंचाईबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात
प्रांताधिकारी गजानन गुरव
पंढरपूर, -( प्रतिनिधी):- सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 13.50 टक्के इतका आहे. सद्य:स्थितीत भीमा नदी पात्रातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे. या नदीपात्रातून सांगोला , पंढरपूर नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील कासेगांव व शिरभावी पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता संबधित यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
पाणी टंचाई व पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्यधिकारी अरविंद माळी, भीमा पाटबंधारे उप कार्यकारी अधिकारी जे.व्ही. इंगोले, तसेच सांगोला नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, कमी पावसामुळे अल्प पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याचे पाणी जास्तीत जास्त उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करावे. पाणी गळती थांबविण्यासाठी आवश्यक ठिकाणी पाईप दुरुस्ती, व्हॉलव्ह दुरुस्ती करावी. पाणी बचतीबाबत घंटागाडीव्दारे जनजागृती मोहिम राबवावी. ग्रामीण भागातील पाण्याच्या स्तोत्राचे बळकटीकरण व आवश्यक त्या दुरुस्त्या करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. ग्रामीणभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी जवळपास असलेल्या जलस्त्रोतावरून पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा सूचनाही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या. पंढरपूर शहराची लोकसंख्या तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेवून संभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पंढरपूर नगरपालिकेकडून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत संबधित यंत्रणेकडे पाठपुरवा करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूर बंधाऱ्यात दहा दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.सध्या पंढरपूर शहराला एक दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी पाण्याची उपलब्धता बघता पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांनी काटकसरीने पिण्याच्या पाण्याचा वापर करावा. असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यावेळी केले.
तत्पुर्वी पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या योजनेची व भीमा नदीपात्रातील उपलब्ध पाणी याबाबतची पाहणी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment