मकर संक्रमण.


 *संक्रमण*



थंडीने वातावरणात एक आळस भरला आहे. कामंधामं न करता नुसतं निवांत पांघरूण ओढून पडून रहावंसं वाटतंय. सूर्यही अगदी आळसावून गेला आहे. उशीरानेच उगवतोय.  आणि आपला दाह टाकून गारठून बसला आहे. त्यामुळे अंगणात आलेलं ऊन अगदी कोमट कोमट आहे. मोठे बहारदार दिवस आहेत हे.. उगवता उगवता संपून जाणारे.. 

तीळाचे लाडू करण्यासाठी तीळ भाजायला घेतलेत.. खमंग वास घरभर पसरलाय.. त्या वासाच्या घमघमाटाने सगळ्या ऐंद्रिय संवेदना जागृत झाल्या. मनाच्या तळातून साऱ्या आठवणी अलगदपणे वर आल्या.. 

अशीच थंडीच्या दिवसातली दुपार..संक्रांतीचा सण उंबरठ्यावर येऊन ठेपलेला...माई, आई, काकूची संक्रांतीच्या कामाची गडबड.. दुपारच्या चहाच्या वेळी मोठ्या पाटीतून मातीचे काळेशार खण घेऊन आलेल्या कुंभारीण मावशी सुभद्राबाई.. 'किती खण द्यायचे?' असे म्हणत त्यांनी बरोबर वाणवसा करणाऱ्या घरातील बायकांचे खण काढलेले असत. खण म्हणजे सुगडं.  मला तर मोठ्या सुगडापेक्षा त्याच्या पोटातली ती छोटी बाळं फार आवडत..आई एका मोठ्या पाटीत हळूवारपणे ते खण ठेवे. त्यावर हळदी कुंकू वाहून कापडाचा खण पांघरून देवघरात नेऊन ठेवे. तोपर्यंत सुभद्राबाई उरलेले खण नीट ठेऊन माई बरोबर गप्पागोष्टी करत. काकूने आणलेला चहाचा आस्वाद घेत त्यांच्या गप्पा रंगलेल्या असत. गोऱ्यापान, ठसठशीत कुंकू लावलेल्या, नेटकी नऊवारी साडी नेसलेल्या कुंभार मावशी गोष्टी वेल्हाळ होत्या. आमच्याकडे येण्या अगोदर दोन चार घरी खण देऊन आल्या होत्या हे त्यांच्या कपाळावरील मळवट सांगायचा..माई त्यांना शेर दोन शेर ज्वारी, गहू देत असे. सारा वस्तुविनिमयाचा व्यवहार!!  पैशाचा व्यापार नव्हता.. बलुतेदारीचे हे आपुलकीचे  प्रेमळ व्यवहार मी अनुभवले आहेत..माणसा माणसांमधील प्रेमाचे हे व्यवहार जातीच्या, गरीब श्रीमंतीच्या पलिकडील होते. इथे माणूस महत्त्वाचा होता. प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर होता. एकमेकांच्या व्यवसायाविषयी आस्था होती. सारे *एकमेकां सहाय्य करू* या सूत्रांनी जोडले गेलेले होते.

कुंभारीण मावशी येऊन गेल्या की दुसऱ्या दिवशी शेतातून महादा बोरं, ऊस, ढाळा, गाजरं, ज्वारीच्या ओंब्या असं सुगडात घालायचे जिन्नस घेऊन येई. माईने उखळात कुटून टपोरे गोल तीळाचे गूळ घालून लाडू केलेले असत..त्याचा खमंग वास सुटलेला असे. पण देवापुढे ठेवल्या शिवाय त्याची चव घ्यायला मिळत नसे. 

भोगीच्या आदल्या दिवशी आई, काकू, आम्ही बहिणी कासाराकडे बांगड्या भरायला जात असू. दुकानात बायका, मुलींची झुंबड उडालेली असे.

 घरी आल्यावर आई काकू सुगडं सुतवून, हळदी कुंकवाने रंगवून त्यात बोरं, ढाळा, ऊसाचे करवे, तीळगूळ  असे सारे जिन्नस घालून भोगीची तयारी करून मगच झोपी जात. 

भोगीच्या दिवशी भल्या पहाटे  आई काकू नवीन साड्या नेसून,  सुगडं आणि पूजेचे साहित्य विणलेल्या रुमालाने झाकून  देवळात जात. आम्ही बहिणी पण नवीन कपडे घालून त्यांच्या बरोबर जात असू.. तिथे बायकांची भरपूर गर्दी झालेली असे. एवढ्या पहाटे सुद्धा बायका नटून थटून ताटातली सुगडं सांभाळत रुक्मिणी मातेला वाणवसा करायला आलेल्या असत. इतर ठिकाणी बायका एकमेकांना हळदी कुंकू लावून संक्रांतीचा वाणवसा करतात. पण पंढरपूरला मात्र भोगीच्या दिवशी साक्षात आईसाहेब रुक्मिणी मातेला दह्यादुधाने पाद्यपूजा करून,  हळदी कुंकू लावून वाणवसा करायची पद्धत आहे..रुक्मिणी माता देवी नाही तर आपल्यातलीच एक आहे असे समजून तिला आपल्या पातळीवर आणून ओवसा करायची पद्धत देव आणि माणूस हा आपपरभाव संपवणारी आहे. पंढरपूरला मायबाप श्री विठ्ठल रुक्मिणीमाता असे मानवी पातळीवर येऊन आपल्यातलेच एक होऊन जातात. त्यांचे हे भाव देव आणि माणसांतील दरी मिटवणारे आहेत..म्हणून ते जास्त जवळचे आहेत. भोगी आणि संक्रांतीच्या दिवशी पंढरपुरातील आणि आजूबाजूच्या खेडेगावातून स्त्रिया देवळात मातेला ओवसायला येत असत. इथेच हळदी कुंकू करून, सभामंडपात खेळ खेळून वर्षभराचा आनंद घेऊन घरी जात.. 

कढी खिचडी, बाजरीची भाकरी, लोणी, लेकुरवाळी भाजी  संक्रांतीला गुळाची पोळी असा फक्कड जेवणाचा बेत असे.. स्नेहाने आणि आनंदाने भरलेले आणि भारलेले हे दिवस नात्यांचा गोडवा जपणारे आहेत. सारा रूसवा फुगवा विसरून स्नेहाचा बंध दृढ करणारी भोगी संक्रांत आणि किंक्रांत ही सणांची साखळी नाजूक किणकिणणारी आहे. 

संक्रांतीनंतर ऋतू बदलाचा पायरव हलकेच ऐकू येईल. आणि सृष्टीचे संक्रमण असेच निरंतर चालू राहील.. 


मीरा उत्पात-ताशी, 

कोल्हापूर. 

9403554167.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.