राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दोन कोटी रुपयांची मदत.


 राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती  घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीस मंदिर समितीमार्फत दोन कोटी रुपयांची मदत,

कार्तिकी यात्रेनिमित्त १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन; आषाढी यात्रेप्रमाणे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार,*

- गहिनीनाथ महाराज औसेकर

मंदिर समितीची सभा संपन्न,

पंढरपूर, (प्रतिनिधी )राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून मुख्यमंत्री सहायता निधीस रु. २ कोटींची मदत शासनाची पूर्वपरवानगी घेऊन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेण्यात आला असून, दि. १४नोव्हेंबर पासून २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेतही भाविकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सभा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून ही सभा पार पडली. सभेस सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, सौ.डॉ. प्रणिती भगीरथ भालके नगराध्यक्षा, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, भागवत भूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस मदत देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी दृष्टिकोनातून शासनाची पूर्वपरवानगी घेऊन रु. दोन कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी कार्तिकी यात्रा दि. १० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होत असून, भाविकांच्या सोयीसाठी दि. १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेतही दर्शन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य, सुरक्षा, निवास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यात्रेतील प्रथा-परंपरा, शासकीय महापूजा, मंदिर समितीमार्फत होणारी पाद्यपूजा, नित्यपूजा तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचाही आढावा घेण्यात आला.

याशिवाय, मंदिर समितीची सन २०२७ साठी दिनदर्शिका व दैनंदिनी छपाई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पंढरपूर येथील पर्यटक निवासाची जागा उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे, तसेच प्रसार भारतीच्या ‘WAVES’ या सार्वजनिक सेवा आधारित ओटीटी व्यासपीठावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील धुपारतीचे विनामूल्य थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

मंदिर समितीच्या जमिनी व मालमत्तेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी शासन सेवेतून सेवानिवृत्त व अनुभवी नायब तहसीलदार यांची मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे व मंदिर समितीचे कर्मचारी तुकाराम कुलकर्णी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून शोकप्रस्ताव पारित करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला याबाबत माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.