अत्तराचा फाया.
*अत्तराचा फाया*
आज प्रतिभावंत कवी, गीतकार कवी संजीव यांचा जन्म दिवस. कवी संजीव आणि माझे आजोबा नानासाहेब देशपांडे हे त्यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यांचा घनिष्ठ स्नेहबंध होता. त्याकाळी सोलापुरात विनामूल्य करमणुकीचे साधन म्हणजे संगीत मेळे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजात मनोरंजनातून देशभक्ती निर्माण करण्याचे काम सोलापुरात कवी संजीव यांनी संगीत मेळ्यातून केले. कवी संजीव, माझे आजोबा नानासाहेब देशपांडे यांचा एक प्रसिद्ध संगीत मेळा होता. हिंदी, मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शशिकला ही लहान असताना कवी संजीवांच्या मेळ्यात काम करत असे. त्या काळी गणपती उत्सवात हे मेळे गल्ली गल्लीतून होत असतं. बघण्यासाठी खूप गर्दी होत असे. शशिकला खूप चुणचुणीत आणि नृत्यामध्ये निपुण होती. तिचे कौतुक सारेजण करीत. तिची आठवण म्हणून माझ्या आजोबांनी आपल्या धाकट्या मुलीचे नाव शशिकला ठेवले. कवी संजीव यांच्या लग्न सोहळ्यात त्यांची घोड्यावरून मिरवणूक निघाली त्यावेळी त्यांच्या समोर शशिकला बसली होती. अशा प्रकारे शशिकला बद्दल सगळ्यांना आपुलकी होती. घरच्या व्यक्तीप्रमाणे ती सहभागी होत असे. पुढे प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा तिने या लहानपणी च्या साऱ्या आठवणी जपून ठेवल्या होत्या.
फक्त सोलापूरच्याच साहित्यिक क्षेत्रातच नव्हे तर महाराष्ट्रभर कवी संजीवांचा खूप दबदबा होता. 'अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया' अशा सारख्या शृंगारिक लावण्या, भक्ती गीते, भावगीते, चित्रपट गीते, गझल शायरी असे काव्याचे अनेक प्रकार हाताळले. सोलापुरातील जुन्या पिढीतील शाहीर रामजोशी यांच्या नंतर लावणीकार म्हणून कवी संजीव प्रसिध्द होते.
साहित्यक्षेत्रात भरभरून कामगिरी करत असताना त्यांनी कलाक्षेत्रातही नाव कमावले. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकार या क्षेत्रात ही यशस्वी मुसाफिरी केली. बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी जी डी आर्ट ही पदवी घेतली होती. कला शिक्षक म्हणून काही काळ म्युनिसिपालिटीच्या मुलींच्या शाळेत नोकरी केली म्हणून त्यांना दीक्षित मास्तर असेही म्हणत असत. त्यांनी तयार केलेली तैलचित्रे, व्यक्तीचित्रे, पुतळे सोलापूर शहरात व जिल्ह्यात आहेत. नव्या पेठेतील त्यांचा 'दीक्षित फोटो स्टुडिओ' खूप प्रसिद्ध होता. आमच्या देशपांडे कुटुंबातील लग्नाच्या वयाच्या प्रत्येक व्यक्तीचे फोटो, इतर समारंभाचे फोटो दीक्षित मास्तरांनी म्हणजेच कवी संजीव यांनी काढलेले आहेत.
त्यांचाशी माझ्या आजोबांचा अकृत्रिम स्नेहबंध होता. आमच्या शेळगी, सावळेश्वरच्या शेतात हुरडा पार्टी च्या निमित्ताने ते, गणेश बाळी, बाबुराव चाकोते, जक्कल अशी प्रतिष्ठीत मंडळी जमून कला, साहित्य, समाजकारण अशा अनेक विषयांवर बहारदार मैफिल होत असे. त्या क्षणांची छायाचित्रे स्वतः दीक्षित मास्तरांनी काढलेली आहेत.
मराठी साहित्य क्षेत्रात शाहीर राम जोशी, कुंजविहारी, कवी संजीव, रा. ना . पवार अशा अनेक सोलापूरच्या तेजस्वी ताऱ्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. कवी संजीव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! अत्तराच्या फाया प्रमाणे त्यांची साहित्य, कला क्षेत्रातील मुशाफिरी कायम सुगंधित राहील!
मीरा उत्पात-ताशी
9403554167.

Comments
Post a Comment