शेततळ्यात बुडून आई, वडील आणि लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू.


 शेततळ्यात बुडून पती, पत्नी व मुलाचा मृत्यू

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील लाड यांच्या शेतातील घटना, शेततळे फोडून मृतदेह काढले बाहेर : कोर्टी गावावर पसरली शोककळा

पंढरपूर

प्रतिनिधी

       कोर्टी (ता.पंढरपूर) गावात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या पती, पत्नी व लहान मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ८ रोजी दुपारी घडली आहे. विजय राजकुमार लोंढ(वय ३०), प्रियांका विजय लोंढे (वय २८) आणि प्रज्वल विजय लोंढे (वय ५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

एकाच वेळी तिघांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे दुर्घटना घडली की आत्महत्या केली, असा संशयही व्यक्त केला जात आहे.

       याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोर्टी गावात सुरेश शिवदास लाड यांचे शेत आहे. या शेतात पाटकूल (ता.मोहोळ) येथील विजय लोंढे हे कुटुंबियांसमवेत द्राक्षे बागेत शेतमजूर म्हणून काम करत होते आणि शेतात वास्तव्यास होते. त्यांच्या घराच्या जवळच एक मोठे शेततळ आहे. सोमवारी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास विजय लोंढे यांचा पाच वर्षीय मुलगा प्रज्वल शेतात खेळत होता. पण, बराच वेळा झाला तो दिसला नाही. म्हणून प्रज्वलला शोधण्यासाठी आई प्रियंका लोंढे गेली असता त्यांना प्रज्वल शेततळ्यात पडल्याचे दिसले. त्याला वाचवण्यासाठी त्या शेततळ्यात उतरल्या, मात्र त्यांचाही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे.

       दरम्यान, मुलगा प्रज्वल आणि पत्नी प्रियंका बराच वेळ झाले आले नाहीत, म्हणून पती विजय लोंढे यांनी शेतात व इतरत्र तसेच शेततळ्याकडे जावून पाहिले असता त्यांना मुलगा प्रज्वल व पत्नी प्रियंका शेततळ्यात बुडत असल्याचे दिसले. त्यांना वाचविण्यासाठी विजय लोंढे यांनी शेततळ्यात उडी मारली. परंतू, शेततळ्यातील पाणी आणि वाढलेले शेवाळ यामुळे त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात विजय लोंढे देखील बुडाले. त्यामुळे एकाचवेळी पती, पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झाल्याने कोर्टी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

        दरम्यान, विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि मुलजा प्रज्वल बराच वेळ झाले घरी आले नाहीत. म्हणून घरातील इतर सदस्यांनी शेततळ्याजवळ जाऊन पाहिले. तेव्हा तिघांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. शेजारी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. शेततळे मोठे असल्याने पाणी भरपूर होते. त्यामुळे शेततळे फोडून पाणी बाहेर सोडण्यात आले. आणि विजय लोंढे, प्रियांका लोंढे आणि ५ वर्षांच्या प्रज्वलचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


चौकट

पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू ?

शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने पती-पत्नी आणि लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.