गोपाळपूर काल्याने कार्तिकी वारीची सांगता.


 गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता


पंढरपूर(प्रतिनिधी)_कार्तिकी वारीची सांगता आज बुधवार,दि.५ नोव्हेंबर - गोपाळकाला होऊन झाली.

गोड झाला, गोपाळांनी गोड केला च्या जयघोषात अवघी श्री कृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी हजारो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमन गेली. कार्तिकी यात्रेचा सोहळ्यांची परंपरे प्रमाणे काल्याच्या उत्सवाने बुधवारी (ता.५) सांगता करण्यात आली. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना जास्तीत जास्त सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती. दरम्यान या काल्याच्या उत्सवा बरोबरच खऱ्या अर्थाने चार्तुमासाची देखील समाप्ती होत असल्याने गेल्या चार महिन्यापासून खास चार्तुमासासाठी येथे मुक्कामास असलेल्या वारकऱ्यांना देखील आपआपल्या गावाकडे परत जाण्याचे आता वेध लागले आहेत.

कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते पौर्णिमेच्या दिवशी पंरपरे नुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे होणाऱ्या गोपाळकाल्याचे. त्यानुसार बुधवारी (ता.५) पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पासूनच विविध संतांच्या दिंड्या चंद्रभागा नदीचे स्नान करुन गोपाळपूरकडे काल्यासाठी रवाना होत होत्या. गोपाळपूर येथील भगवान श्री कृष्ण मंदिरात काल्याचे कीर्तन झाले. गोपाळपूर येथील वातावरण आज दिवसभर भक्तीमय होते.


दरम्यान पहाटे पासूनच एकामागुन एक अशा विविध संतांच्या छोट्यामोठ्या दिंड्या,पालख्या विठ्ठल नामाचा गरज करित गोपाळपूरात दाखल होत होत्या. गोपाळकाल्याच्या सोहळ्यासाठी आलेले भाविक मोठ्या श्रध्देने श्रीगोपाळकृष्णाचे दर्शन घेवून मंदिराला प्रदक्षिणा घालीत होते. मंदिर परिसरा मध्ये मिळेल् त्या जागी दाटीवाटीत उभे राहून काल्याचे कीर्तन करुन वारकरी एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवुन गळाभेट घेत होते. कृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांचे वाटप केले जात होते.


यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीने खास पाण्याच्या टँकरची सोय देखील केलेली होती. गोपाळकाल्याचा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खास पोलिस बंदोबस्त ठेवलेला होता.

--------------------------------------

चौकट ( चार्तुमासाची समाप्ती )

कार्तिकी यात्रेतील गोपाळपूर काल्यानंतर चार्तुमासाची समाप्ती होत असल्याने आषाढी यात्रे पासुन म्हणजेच तब्बल चार महिने चार्तुमासासाठी शहरातील विविध मठ, धर्मशाळांमधून वास्तव्यास असलेल्या वारकऱ्यांना देखील आता आपआपल्या गावाकडे परत जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे काल्याच्या उत्सवा नंतर विविध मठ, धर्मशाळांमधून वारकऱ्यांची गावाकडे परत जाण्यासाठी सामानाची आवाराअवरी करण्याची लगबग दिसत होती.

------------------------------------------

फोटोओळी : पंढरपूर : गोपाळपूर येथे गोपाळकाल्याच्या उत्सवासाठी बुधवारी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली होती.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.