भारत विकास परिषदेच्या वतीने माढा व मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत.


 भारत विकास परिषदेच्या वतीने माढा आणि मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वस्त्रे यांची मदत,

चारशे वाड्या वस्तीवर पोहोचली मदत.

पंढरपूर (प्रतिनिधी) सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान असलेल्या भारत विकास परिषद पंढरपूर या संस्थेच्या वतीने मोहोळ आणि माढा तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, वस्त्रे, तसेच ईतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या.


*"हरवली वाट दिशा अंधारल्या दाही.…. ववाळुनी उधळतो जीव मायबापा…...... वनवा ह्यो उरी पेटला.... खेळ मांडला..."* --- या "गुरू ठाकुरांच्या" ओळी परवा अनुभवायला मिळाल्या.  प्रसंग आपतग्रस्तानपर्यंत मदत पोहोचविण्याचा होता. मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा वस्तीवर ज्याच्यापुढं सीना-भोगावतीच्या प्रचंड पुरामुळे वस्त्या वाहून गेल्या होत्या... पुढच्या गावाला जायचा रस्ताही पाण्याखाली गेला तिथला..! संध्याकाळची वेळ होती... तिथली शेवटची मदत दिली की.. भारत विकास परिषदेचे स्वयंसेवक पंढरपूरचा रस्ता धरणार होतो. अंधार पडायच्या आत...

"तुम्ही पाच-दहा लोकांना प्रत्यक्ष मदत देऊन बाकीची मदतींची पोती या वस्तीवर ठेवा ... जमलेल्याना वाटेस्तोर रात्र होईल...

पुराचं पाणी बघून तुम्ही निघा... 

अंधार होईल.… वाट सापडायची न्हाई..." -- असं काळजीपोटी सर्कल भाऊसाहेब म्हणाले म्हणून आम्ही टॅम्पोतील  पोती काढायला घेतली... मदत घेण्यासाठी गर्दी वाढायला लागली.

वस्तीवरचा एक म्होरक्या म्हणाला... 

"साहेब या पोराला फकस्त आधी द्या... मग आम्हाला वाटायला सुरवात करा ... 

सरपंच आम्हाला देतील लायनीनं..." 

आम्हीही त्या १०-१२ वर्षाच्या पोराला मदतींचं पोतं हातात दिलं... त्याच्यानंतर चार-दोन जणांना दिल आणि आता पाणी बघून निघायच्या विचारात असतानाच ... पाण्याच्या कडेला काहीतरी जळतंय ... धूर कशाचा येतोय म्हणून वस्तीवरच्या पोराला विचारलं तर तो म्हणाला..  

"त्ये पोरगं होतं ना.. पहिल्यांदा पोतं दिलेलं... त्याच्या वडलाला आताच दहन देऊन त्याला इकडं आणला होता... या ७-८ दिवसात दोनदा घरात पाणी गेलं... सगळं वाहून गेलं.. त्या हबक्यानं गेला बिचारा... बायको, दोन पोरं आहेत त्याला, त्याचच त्ये थोरलं पोरगं होतं.." हे ऐकलं आणि आम्ही सगळेच सुन्न झालो... मनात वाटलं... 

"इथं आभाळच फाटलंय आणि आम्ही मात्र ठिगळ घेऊन आलोय."


त्या आधीच्या दोन गावात परिस्थिती काही वेगळी नव्हती. अवकाळी पावसानं नदीचं पात्रच बदलून पाणी वहात होतं. गावातला सगळ्यात वयस्कर माणूसही म्हणत होता.. माझ्या मागच्या पिढ्यानीही अशी परिस्थिती कधी अनुभवली नव्हती. सखल भागातले आपतग्रस्त उंचावरील वाड्या-वस्त्यांवर, मंदिराच्या आश्रयाला जाऊन राहिले. काही ठिकाणी कमरेइतक्या पुरुसभर उंचीच्या दोन दिवसाखाली पाणी येऊन गेल्याच्या ओलीच्या खुणा दिसत होत्याच. पाण्याच्या प्रचंड वेगानं विजेचे खांब, डीपीसकट वाहून गेले... त्यामुळं गावच्या गाव अंधारात, पाणीच पाणी चहूकडे असून पिण्याला पाणी नाही... जनावरांना चारा नाही... पिकात पाणी, साठवलेल्या धान्यात पाणी ... त्यामुळं खायला अन्न नाही. येताना अंधार झाला होता... काही गावाबाहेर उंचवट्यावर उघड्यावर नेऊन बांधलेल्या जनावरांच्या धारा किर्रर अंधारात काढून... खाच खळग्यातून.. चिखला पाण्यातून त्याच्या वाटपाच काम चालूच होतं. ही परिस्थिती आपण मीडियाच्या माध्यमातून पहात होतोच... ते चक्षुरसत्य पाहिलं.

सध्या एकूणच महाराष्ट्रात अवकाळी अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीने अनेक भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून... शेतजमिनी, गुरे-ढोरे, पिके, खते, धन-धान्यासाहित... अगदी विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तक दप्तरांपर्यन्त वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत. या सर्व हाहाकाराच्या परिस्थितीत एक सामाजिक कर्तव्य म्हणून अनेक सामाजिक, राजकीय संस्था, संघटना यांच्याकडून या आपतग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अनेक गोष्टींची मदत करण्याचे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. या आवाहानाला प्रतिसाद म्हणून भारत विकास परिषद पंढरपूर, बिल्डर्सची क्रेडाई संघटना, तिरुपती कन्स्ट्रक्शन पंढरपूर, पालवी सामाजिक संस्था पंढरपुरच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या मागणीनुसार, प्रांताधिकारी श्री. सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक वाड्या वस्त्यांवर सुमारे ४०० कुटुंबाना जीवनावश्यक धान्य, तेल, मीठ, कासवछाप, मेणबत्त्या, औषधे, पाण्याच्या बाटल्या,  ब्लँकेट, चादर व ताडपत्री या वस्तूंचे वाटप करण्यात आले. रोडवरील गावांशिवाय जिथे अजून मदत पोहोचली नाही अशा भागात जाण्यासाठी श्री. इथापे साहेबांनी सर्कल भाऊसाहेब श्री. शिवशरण, त्यांचे सहकारी उमेश माळी, दळवे भाऊसाहेब यांना आमच्याबरोबर दिल्याने या आड रस्त्यावरील गावांपर्यंत पोहोचता आले. भारत विकास परिषद पंढरपूर, क्रेडाई, पालवी संस्था, तिरुपती कन्स्ट्रक्शन यांच्या सर्व सदस्यांनी केलेल्या आर्थिक मदतीबरोबरच डॉ. काणेज गायत्री सुपरस्पेशालिटीच्या व तिरुपती कन्स्ट्रक्शनच्या सर्व कर्मचारी वर्गाने, सोबत नेलेल्या गाडीच्या वाहकांनी भरघोस सहकार्य केले. या सर्व संस्थांची ध्येयधोरणं वेगळी असतील पण आपत्कालीन परिस्थितीत एकत्र येऊन मानवता धर्म पाळण्यासाठी अशा अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कटिबद्ध आहेत हे दिसून आलं. शासनालाही एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही पण ते अशा अनेक संस्थाना योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात हे मा. प्रांतसाहेबांच्या योग्य सल्ल्याने शक्य झालं. 

यावेळी भाविपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे, अध्यक्षा, सौ. रोहिणी कोर्टिकर, सचिव मंदार केसकर, क्रेडाई, पालवीचे आशिष शहा, सौ. व श्री.अमित शिरगावकर, तिरुपती कन्स्ट्रक्शनचे शार्दूल नलबिलवार, सौ. व श्री. मिलिंद वाघ, श्री. सतीश कोर्टिकर, सौ. व श्री. आर. डी. देशपांडे, विवेक परदेशी, सौ. व श्री. शशिकांत सुतार, सचिन पंढरपुरकर, सौ. व श्री. महेश आराध्ये,  सचिन कचरे, अंकित फत्तेपुरकर हे सर्व सदस्य मोहोळ तालुक्यातील मौजे घाटणे, मलिकपेठ, नरखेड जवळील खंदारे वस्ती, लोणारे वस्ती येथील मदतकार्यात सहभागी होते. या सर्व गावांमधील सरपंच, ग्रामस्थांना कोणत्या सुविधा हव्या आहेत याबाबत अधिक माहिती घेऊन, त्यांच्या व्यथा, पुराची दाहकता समजून घेऊन अनेक मित्र संस्थाना मदतीसाठी आवाहन केले... या मदतकार्याची भविष्यात जरूर पडू नये यासाठी सर्व ग्रामस्थांकडून श्रीपांडुरंचरणी प्रार्थना केली. बहुतेक आपतग्रस्त व आसपासच्या गावातील तरुणवर्गानी एकमेकांना सावरण्यासाठी सज्ज आहेत हे दिसून आलं.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.