भीमक तनया.


 *भीमक तनया*


 *रुक्मिणीच्या दारी*

*हळदीकुंकवाचा सडा*

*परिमळ दरवळतो*

*भिजला माझा चुडा*


रूक्मिणी मातेच्या दारी सडा टाकताना आपोआप या ओळी स्फुरल्या!! 

आईसाहेब रूक्मिणी माता आमची कुलदेवता! आमच्या उत्पात घराण्यात तिचे पूजन अर्चन करणे हा  आमचा कुळधर्म कुळाचार आहे. नित्य तिची सेवा करणे हे आमचे निधान आहे. तरीही नवरात्र महोत्सवात तिची विशेष पद्धतीने अर्चना आम्ही करतो. त्यासाठी प्रत्येकांनी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागरी पौर्णिमा असे दिवस निवडून घेतले आहेत. आमच्या कडे अश्विन शुद्ध त्रयोदशी हा दिवस आला आहे.. त्यादिवशी रूक्मिणी मातेचे सर्व उपचार आम्ही करतो. सुरूवात होते ती सडा टाकण्या पासून!! तिच्या अंगणात हळदीकुंकवाचा सडा टाकतात. चांदीच्या सुबक घंगाळात हळदीकुंकू पाण्यात कालवून चांदीच्या तांब्याने सडा टाकताना एक वेगळीच अनुभूती मिळते. नंतर तिची महापूजा. महापूजेच्यावेळी पंचामृतात तिचं खुलून दिसणारं स्वयंभू रूप पाहून मनात आनंदाच्या उर्मी दाटून येतात. तिचं लोभस रूप डोळ्यात साठवताना काय करू आणि काय नको असं होऊन जातं. मग तिची अष्टके, ध्यान, श्रीसूक्त पठण करताना अष्ट सात्विक भाव दाटून येतात. तिच्या मूर्ती वरील सनातन चिन्हे पाहताना हा क्षण असाच रहावा असं वाटतं. सुस्नात झालेली माता नितांत सुंदर दिसते. भावानं तिच्या माथ्यावर रेखलेला सुरेख हळदी कुंकवाचा टिळा, तिला अतिशय सुंदर पद्धतीनं, चापून चोपून नेसवलेली नऊवारी साडी, तिला घातलेले दागिने, मुकुट, तुळशीचा हार, गजरा आणि आरतीच्या लवलवत्या प्रकाशात दिसणारं तिचं सात्विक रूप!!

काय पहावे आणि काय साठवावे? डोळ्यांची, मनाची नुसती तारांबळ उडते. 

मग नैवेद्य आणि आरती! 

*श्रीकृष्ण कथा तुजला आवडे बालपणी*

*जडले चित्त हरिपदी करूनी गुणश्रवणी*

*जय जय भीमक तनये देवी जगन्माते*

ही उत्पातांची पारंपरिक आरती!! या आरती मध्ये रूक्मिणी मातेचा चरित्र पट रेखाटला आहे!! 

आपलं पूर्वसुकृत किती थोर असावं म्हणून या घरात आपल्याला जन्म मिळाला असं वाटतं!! आमचे पूर्वज सुदेव यांच्या मुळे तिची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं!! 

*पाठीवरती रूळे वेणी*

*आई उत्पाताची ऋणी*

या पूर्व पुण्याईनं डोळे भरून येतात. परत परत तिचं दर्शन घेऊन, सात्विक सुंदर रूप तनामनात साठवून जड अंतःकरणाने, फिरून परत माघारी येण्याचा निश्चय करून मी तिचा निरोप घेतला!! आता रोज देवापुढं हात जोडताना तिचं हे रूप आठवायचं!! खरं तर ते कायम अंतःकरणात ठसलेलं आहेच की!! 

आईसाहेब मातोश्री रूक्मिणी माता आमच्या कडून अशीच कल्पांता पर्यंत सेवा करून घेवो हीच तिच्या चरणी प्रार्थना!! 


मीरा उत्पात-ताशी, 

कोल्हापूर.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.