गोकुळाष्टमी


 आज गोकुळ अष्टमी.. तुमच्या माझ्या प्रिय कृष्णाचा जन्मदिवस. भारतीय जीवनाशी कृष्ण अनेक नात्यांनी गुंफला आहे. तो खोडकर मुलगा आहे. उत्कट प्रेमी आहे. संयमी पती आहे. द्रौपदीचा सखा आहे. कुशल संघटक आहे. यशस्वी राजकारणी आहे. आणि पंढरपूरला आल्यावर तर तो सर्वांचा विठू माऊलीही झाला आहे. लेकुरवाळा होऊन सतांना, भक्तांना अंगाखांद्यावर खळवू लागला. त्याची ही मोहक रूपे आपल्याला सतत भोवताली  दिसत राहतात. भारतीय लोकमानसाने श्रीकृष्णाला फार मधुर रंग दिले आहेत. पण या सार्‍या रंगा उठून दिसतो तो त्याचा प्रेमरंग. सामान्य माणसांबरोबर ऋषीमुनी आणि संत महंतांनीही त्याला या रूपात स्वीकारलं. उदात्त प्रेमभावनेने त्याला सजवलं.

  घनश्याम कृष्ण चित्तचोर आहे. या चित्तचोराने मीरेचे चित्त कधी चोरले ते तिचे तिला देखील कळले नाही. लहानपणी आईबरोबर खिडकीतून लग्नाची वरात पाहताना तिने आईला 'माझा नवरा कोण?' असे विचारल्यावर आईने श्रीकृष्णाच्या मूर्ती कडे बोट दाखवून गंमतीने हा तुझा नवरा असे म्हटले.. आणि ही वेडी त्या क्षणापासून त्याच्यावर जीव जडवून बसली. तिला त्याच्या शिवाय काही सुचेना. ती सतत कृष्ण भक्तीत तल्लीन राहू लागली. आई वडिलांना वाटले लहान आहे मोठी झाल्यावर कळेल. मोठी झाल्यावर तर तिने ठरवूनच टाकलं 'मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई'.. तिच्या प्रेम मार्गात अनेक काटे आले. पण ती आपल्या प्रेम निश्चयापासून तसूभरही ढळली नाही. तसं तिचं लौकिक जगात लग्न झालं.. पण तिने कुठे ते स्वीकारलं?.. तिला कळालं नसेल का की कृष्ण कधीच आपला होणार नाही.. नक्कीच कळलं असणार पण ती या साऱ्याच्या पलीकडे पोहोचली होती. लौकिकदृष्ट्या मीराचे प्रेम असफल असेलही.. पण तिच्या दृष्टीने ती व कृष्ण कधी वेगळे नव्हतेच. त्यांचं हे तादात्म्य पाहून सरतेशेवटी लौकिकातल्या नवऱ्याने देखील ते मान्य केलं. मान्य करावं लागलं...

  मीरेला कृष्ण तिचा प्रिय व्यक्ती म्हणून हवा होता. त्याच्यातल्या देवापेक्षा त्याचं माणूसपण प्रिय होतं. आपल्या अलौकिक प्रेमानं तिनं त्याला आपल्या पातळीवर आणलं. म्हणूनच तिनं विषाचा प्याला प्यायला पण मूर्तीतला कृष्ण हिरवा निळा झाला. हीच तर प्रेमाची सार्थकता, ताकद. उत्कट प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे प्रेम सफल असो वा विफल ते महत्त्वाचे नसतेच. महत्त्वाचे असते त्या व्यक्तीवर प्रेम जडणे. हीच प्रेमाचे सफलता असते. खरे प्रेम करणारी व्यक्ती स्वामित्वाची भाषा बोलतच नाही. ती दुरून उत्कट प्रेम करते. की जे मीरेने कृष्णावर केले. आणि निखळ निर्व्याज प्रेम फार ताकदवान असते. तिच्यामध्ये उत्कट विजिगीषू वृत्ती असते. आयुष्याने समोर टाकलेल्या संकटाला ही प्रेम ऊर्जा पुरून उरते. विपरीत परिस्थितीतही 

जगण्याची ताकद देते. मीरेचे प्रेम चिरंतन होते.. रूक्मिणी आणि राधेसारखा कॄष्ण तिच्या वाट्याला नाही आला.. पण तिला कुठे याचं देणं घेणं होतं?.. ती तिच्या या  प्रेमात खूप धुंद होती..मध्ययुगात जन्मूनही  त्यांच्या इतकंच किंबहूना त्यांच्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम तिने कृष्णा वर केलं..

आज कृष्णाष्टमीमुळे मीरेच्या पारलौकिक प्रेमाची आठवण झाली...



© मीरा..

(मीरा उत्पात-ताशी)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.