अनुपम्य नगर पंढरपूर.


 *अनुपम्य नगर पंढरपूर*


सकलांचे माहेर पंढरपूर!! आणि त्यांची माऊली विठाबाई!! ती इतकी प्रेमाने ओतःप्रोत भरलेली आहे की भेटायला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची ती जातीने काळजी घेते. 

ज्येष्ठ वद्य अष्टमी पासून सुरू  झालेला हा वारीचा सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आषाढी एकादशी हा वारीचा मुख्य दिवस!! या दिवशी विठ्ठलाला भेटायला भक्तांची अभूतपूर्व मांदियाळी जमते. प्रचंड गर्दीमुळे प्रत्येकाला दर्शन घडत नाही. त्यामुळे त्या ज्या भाविकांना एकादशीला मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य झाले नाही त्यांची काळजी विठू माऊलीला असते. त्यांना भेटण्यासाठी स्वतः विठ्ठल राही रखुमाईसह नगर प्रदक्षिणेला निघतो. देवाचा रथ खाजगीवाले यांच्या वाड्यात ठेवलेला असतो. आता तो वाडा माहेश्वरी धर्मशाळा म्हणून ओळखला जातो. तिथे नगर प्रदक्षिणा निघण्याआधी चक्री कीर्तन होते. दुपारी एक वाजता रथ प्रदिक्षणेस निघतो. रथामध्ये श्रीविठ्ठल, राही, रूक्मिणी विराजमान होतात. रथावर बडवे, नातू, देवधर यांचे वंशज बसलेले असतात. रथ हाताने ओढला जातो. रथ ओढायचा मान वडारी समाजाचा आहे. त्यांनी हात लावल्याशिवाय रथ ओढला जात नाही. ज्या भाविकांना मंदिरात जाऊन विठ्ठल दर्शन घडले नाही ते भाविक रथारूढ विठ्ठलाचे दर्शन घेतात. रथासमोर शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचा हत्ती झुलत असतो. रथ वडारींसह भक्तभाविक ओढत असतात. रथावर वारकरी खारका, लाह्या, बुक्का,पैसे उधळत असतात. ठिकठिकाणी रथ थांबवून मानकरी लोक देवाची पूजा करतात. रथ नगर प्रदक्षिणा करून परतल्यावर मानकऱ्यांना मानाचा आहेर देतात. रात्री देवाला झालेल्या श्रम परिहारार्थ मूर्तींना अभिषेक करतात. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा एक लक्ष जप ब्राह्मणांकडून करून घेतला जातो. यावेळी कान्ह्या हरिदासाचे वंशज 'अनुपम्य नगर पंढरपूर' या अभंगासह अन्य पदे गाऊन देवाची आळवणी करतात. 

असा हा सर्वसमावेशक, दीनांचा दयाळू, भक्तकल्पकामद्रुम विठ्ठल!! 

आणि त्याची ही पवित्र पंढरी नगरी!! आणि अनुपम्य वारीचा सोहळा!! 

त्यासाठी संतांना मुक्ती नको आहे. 

नित्य पंढरीचा सहवास हवा आहे. 


*।पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।*आणिक दर्शन विठोबाचे।*

*हेचि मज घडो जन्मांतरी। मागणे श्रीहरी नाही दुजे।*

*मुखी नाम सदा संतांचे दर्शन। जनी जनहित ऐसा भाव।*

*नामा म्हणे नित्य तुझे महाद्वारी।कीर्तन गजरी सप्रेमाचे।*



मीरा उत्पात-ताशी.

9403554167.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.