विसरू नका मज.
*विसरू नका मज*
अध्यात्मिक क्षेत्रातील एक नवल म्हणजे परमात्मा श्रीविठ्ठल!!
जगाचा नियंता असणाऱ्या भगवंताचे स्वरूप कोणाला ठाऊक आहे? अगदी देवांनाही नाही!!
*न मे विदुः सुरगणः प्रभावं न महर्षयः।*
*अहमादिर्ही देवानां महर्षीणांच सर्वशः।।*
भगवंत म्हणतात माझी उत्पत्ती देवगणांनाही ठाऊक नाही आणि मोठमोठ्या ऋषींनाही ठाऊक नाही. असा हा योगियांदुर्लभ परमेश्वर! त्याला भक्तासाठी विठ्ठल व्हावं लागलं..तो श्रद्धेचा, करुणेचा, मानवतेचा, दया, क्षमा, शांतीचा, आत्मिक प्रेमाचा सर्वोच्च विकास आहे! निर्गुण निराकार परमेश्वर भक्तासाठी सगुण साकार झाला आणि त्याचे वेड साऱ्यांना लागले. जो तेथे गेला तो त्याच्या प्रेम पाशात अडकला. त्याच्या मुखाकडे एकदा पाहिलं की माणूस स्वतःचा राहत नाही. तो आपल्या हृदयाची कधी चोरी करतो याचा पत्ताच लागत नाही इतकी विलक्षण ताकद या विठ्ठल मूर्तीत आहे. तो आपल्या हृदयाची चोरी करतो म्हणूनच तो अगदी आपलाच वाटतो. आपण आणि उच्च पातळीवर असणारा देव ही द्वैतभावनात संपून जाते. भक्त या पंढरीच्या चोराला पकडायचे ऐवजी त्याचेच होऊन जातात. देव आपल्यातलाच एक आहे हे मान्य केल्याने त्याच्याविषयी धाक वाटत नाही. फक्त आणि फक्त लडिवाळ प्रेमाची भावनाच निर्माण होते. भक्तांच्या पातळीवर येऊन तो त्यांना मदत करतो. एवढेच नाही तर तो भक्तांचे हट्ट देखील पुरवतो!! देवाकडे हट्ट करणारा श्रेष्ठ भक्त म्हणजे नामदेव!! त्याच्या निरागस हट्टापायी देवाला त्याच्या हातून नैवेद्य ग्रहण करावासा वाटला. मला लहानपणी नामदेवांसारखं आपणही देवाला जेऊ घालावं असं किती तरी वेळा मनात येत असे.. नंतर भोवतालाची जाण यायला लागल्यावर महाद्वारातील देवळाची पितळेच्या पत्र्याने मढवलेली पहिली पायरी पाहून मला अनेक प्रश्न पडत. मी एकदा त्या पायरीवर चढून वर जाऊ लागले तर माईने मला सांगितलं या पायरीवर पाय द्यायचा नाही. ही संतश्रेष्ठ नामदेवांची पायरी आहे. नंतर मग अनेक प्रसंगातून, अभ्यासाच्या पुस्तकातून, घरी येणाऱ्या वारकऱ्यांच्या कडून नामदेवांविषयी खूप काही कळत गेले. लहानपणी देवाला जेऊ घालणारा, विठ्ठलाच्या शिवाय दुसरे काहीच न सुचणारा, त्याच्याशी गुजगोष्टी करणारा विठ्ठलाचा लाडका भक्त म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव.. विठ्ठल एकदा त्याच्याशी हितगुज करताना म्हणाला
*आषाढी कार्तिकी विसरू नका मज*
*सांगतसे गूज पांडुरंग*
असं मनातलं गूज सांगणारा विठ्ठल त्याचा सखा होता. याचा त्याला कोण अभिमान होता. याच अहंकाराचा मुक्ताईने गोरोबा काकांकडून निचरा केला. त्यामुळे विसोबा खेचरांसारखा गुरु मिळाला. वाळवंटात कोरडी पोळी कुत्र्याने नेल्यावर ते तुपाची वाटी घेऊन मागे पळू लागले. गुरुकृपेने त्यांना त्या कुत्र्यात ईश्वर दिसला. पंढरपूर, विठ्ठल याविषयी त्यांना अत्यंतिक ममत्व होते. जेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना तीर्थाटनास चलण्याविषयी विचारले तेव्हा नामदेवांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. परंतु विठ्ठलानेच जाण्यासाठी सांगितले तेव्हा मोठ्या कष्टाने ते तीर्थाटनास गेले. पण तिकडून आल्यावर त्यांनी आपल्या गाथेत पंढरी महात्म्य असं स्वतंत्र प्रकरण लिहिलं. ते म्हणतात भारत भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रं आहेत. पण प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी काही ना काही न्यून आहे. सर्वार्थांने परिपूर्ण असे एकच क्षेत्र आहे ते म्हणजे पंढरपूर. कारण इथे सगळे देव वस्तीस आले आहेत. इथल्या प्रत्येक कणात देव आहे.
*येथील तृण आणि पाषाण अवघे देव जाणावे* असा नामदेवांना पंढरपूर आणि विठ्ठला विषयी अभिमान होता..
*नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी* या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. ते पंजाब मध्ये वीस वर्षे राहिले. तिथली भाषा शिकले. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात त्यांचे अभंग समाविष्ट आहेत. ज्ञानदेवांनी समाधी घेतली त्यावेळी ते तिथं हजर होते. त्यांच्या अभंगातून आपल्याला माऊलीच्या संजीवन समाधीचे आकलन झाले. गावकुसाला लागलेल्या आगीत चोखोबांचा अंत झाला. त्यावेळी त्यांची 'विठ्ठल विठ्ठल' असा आवाज येणारी हाडे आणून महाद्वारी समाधी बांधली. जनाबाईस विठ्ठल भक्ती शिकवली. अशी अनेक कार्ये केल्यावर त्यांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली ही जाणीव झाली. त्यांना सायुज्य मुक्ती नको होती.
*वैकुंठासी आम्हा नको धाडू।*
*वास रे पंढरी सर्वकाळ।*
*नामा म्हणे मज येथेचि हो ठेवी।*
*सदा वास देई चरणा जवळी।।*
नामदेवांनी विठ्ठलाला हे मागणे मागितल्यावर विठ्ठल *तथास्तु!* म्हणाला आणि पायरीजवळ असलेल्या भूमी कडे पाहिले. ती भूमी दुभंगली. विठ्ठलाने सांगितलं 'नामदेवा तुला ही भूमी मी दिली आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या दर्शनास येणाऱ्या भक्तमंडळीचे पदरज अखंड तुझ्या माथ्यावर पडतील. नामदेवांनी विठ्ठलाला नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भूमीमध्ये उडी टाकली. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातील सर्व मंडळींनी दासी जनी सह त्या दुभंगलेल्या भूमी मध्ये उड्या टाकल्या. भोवतालचे सर्व लोक पाहत असताना ती भूमी एकदम पहिल्या प्रमाणे झाली. ही घटना आषाढ वद्य त्रयोदशीला झाली. त्या काळातील लोकांनी त्या जागी पूजेसाठी पायरी केली. त्या पायरीला *'नामदेवाची पायरी'* असे म्हणतात. तिला पितळी पत्र्याने मढवलेले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना हिचे दर्शन आणि पूजन अवश्य करावे असा संकेत आहे. आषाढी वारीचा सोहळा संपन्न झाल्यावर आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवांच्या पुण्यतिथी निमित्ताने नामदेव पायरीची महापूजा करतात. सुंदर आरास केली जाते आणि भजन कीर्तनादी कार्यक्रम होतात. गोपाळकाल्याने या सोहळ्याची सांगता होते.
*नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे*
*संत पाय हिरे देती वरी*
नामदेवांची भक्ती आणि त्यांचं चरित्र नक्कीच अद्भूतरम्य आणि भक्तीभावाने ओथंबलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी पंढरपूरला जाते त्यावेळी देवाचे दर्शन नाही मिळालं तरी नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही... तोच तर त्यांचा हेतू होता ना!!!
आज संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा आहे.
त्यांना विनम्र अभिवादन!!
मीरा उत्पात-ताशी.
९४०३५५४१६७.

Comments
Post a Comment