जिथे आहे अमृताची गोडी, ती आमची नरसोबाची वाडी.


 ओढ......


जिथे आहे अमृताची गोडी

ती आमुची नरसोबाची वाडी 


           नृसिंहवाडी नाव असल तरी वाडी, नरसोबाची वाडी ह्या नावानेच ओळखले जाणारे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री नृसिंह सरस्वती यांचे मंदिर  असणारे छोटेसे गाव .नरसोबाची वाडी कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीचा संगम झाला आहे.माझे आजोळ असल्यामुळे, जन्म स्थान असणारे वाडी. त्यामुळे ह्या जगात आल्यानंतर पहिल्यांदा ज्या देवाचे दर्शन घेतले ते देव म्हणजे श्री.दत्त महाराज ,पहिले देवस्थान म्हणजे वाडी. त्यामुळेच वाडी बद्दल ची ओढ मनातून काही कमी होत नाही. लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी चालू झालं की एक दोन दिवस झाले की तयारी सुरू असायची वाडीला जायची.वाडीला जायचा आनंद काही निराळाच असायचा. पंढरपूर येथून मिरज पर्यंत रेल्वे असायची ती रेल्वे पाणी देणारी रेल्वे म्हणून ओळखली जायची. म्हणजे ती रेल्वे सोलापूरहून येत येत आसपासच्या छोटया छोटया खेडेगावात पाणी देण्यासाठी थांबायची. दिवसभर रेल्वे प्रवास सुरू असायचा त्यामुळे ह्या उन्हाळ्यात दोनच तासात मिरज आल्यामुळे तो आनंद काही लुटता आला नाही तो आनंद म्हणजे तर काय बाहेर रेल्वेतून पाहणे व आई रेल्वे प्रवास म्हणल की ठरलेला मेनू खायला घ्यायची पोळ्या वाटली डाळ किंवा मटकीचा डाळ कांदा आणि काकडी. रेल्वे स्टेशन विकायला आलेली काकडी त्या वेळेला खुप आवडायची पण आई बाहेरच काही खायचं नाही म्हणून घरूनच काकडी घ्यायची व साल काढून मीठ लावून द्यायची .मिरज पर्यंत आल्यानंतर वाडीला जाण्यासाठी मिरज येथून सिटी बस असायच्या उन्हाळा सुट्टी मध्यें तुडुंब भरलेल्या सिटी बस मधून जागा धरून वाडी कडे रवाना होण्याचा आनंद काही वेगळाच असायचा आनंद काय ओढच.

आज्जी त्या वेळेला गेंडे वाडा येथे भाड्याने राहायची छोटया छोटया दोन खोल्या आणि त्यात आठ नऊ भावंडं ,आई ,मावशी, मामा ,आज्जी ,आजोबा इतके जण. वाड्याच्या समोर छोटया छोटया खोल्या होत्या. तिथे भाडेकरू असायचे जो मुख्य वाडा होता त्यात एक आज्जी राहायची एकटी तो वाडा म्हणजे जणू भुताटकीचा वाडा वाटायचं वाड्यात जायची इच्छा तर असायची पण भीती पण वाटायची आज्जी सगळच छान करायची पण आज्जी च्या हातचा मसालेभात आणि उपिट हा माझा आवडीचा पदार्थ . आता तिचं चव मोठ्या मावशीच्या हाताला आहे.ते वाडीतले दोन महिने कसे जायचे समजायचेच नाही. परत कालांतराने मामा नोकरी निमित्त सांगलीला राहू लागल्यामुळे आज्जी आजोबा ही सांगलीत राहायला आल्याने वाडीत जाणे येणे कमी झाले.

 परत मोठी मावशी व माझे मावस भाऊ वाडीत स्थायिक झाले त्या वेळेला मी कॉलेज मध्ये शिकायला होते त्यामुळे सुट्टीतली वाडीची वारी काही चुकली नाही .मावशी कडे सुट्टी लां राहायला जायचे. पण लग्न झाल्यानंतर वाडीला जाणे येणे कमी झाले . एक दोन दिवस जाऊन लगेच परत यायचो. त्यामुळे ती धावती भेट ते दर्शन हे दर्शन वाटायचे नाही कारण ओढ असायची ती पालखीची एक दिवस पालखी ला जाऊन समाधान वाटायचे नाही.मला लहानपणी पण समोरच्या दर्शना पेक्षा रात्री असलेल्या पालखीची आवड होती.आणि आवडची गाणे म्हणजे निघालो घेऊन दत्ताची पालखी.अजूनही तेच गाणे इतर वेळेला ही कानावर पडले तर मनात पालखीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.तो धावता दौरा काही केल्या समाधान द्यायचा नाही. पण ह्या वर्षी उन्हाळा सुट्टी हि लहानपणाची वाडीतील सुट्टीची आठवण करुन देणारी ठरली महिनाभर पूर्ण सुट्टी त आम्ही वाडीला मावशीकडे होतो.छोटेसे गाव असल्यामुळे व लहानपणापासून सवय असल्याने फिरावयास काही वाटायचे नाही. त्या छोट्या छोट्या गल्लीतून फिरताना लहानपण आठवले नाही असे होईल का. वाडीतली बासुंदी, पेढे, कवठाची बर्फी, कुंदा हे प्रसिद्ध आहे.पण मला ह्या गोष्टीचं अप्रूप कधीच वाटल नाही. मला वाडीतील चेंडके मिठाई वाले ह्यांच्यात मिळणारा बटाट्याचा चिवडा लहानपणा पासूनच आवडायचा आणि आजही . आजही माझे भाऊ मी गेले की तो चिवडा आवर्जून आणणारच विशेषतः गोविंद दादा न विसरता आणणारच. मोठ्या मावशी ने माहेरपण आधिक आजोळपण केले. कधीही वाडीला गेलं की मावशी कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. ह्या सुट्टीत तर जणू काही माहेरी पहिल्यांदा गेलेल्या नवरीला सासरी पाठवताना जस भरभरून देऊन पाठवतात तसे ती सालंकृत साडी चोळी बांगड्या आणि पायातले चांदीचे पैंजण देऊन मावशीने माझी पाठवणी केली. पाठवणी करतांना ही तिच्या शेतातील ज्वारी तसेच तिने बनवलेले लोणचे, पापड ,कुरडया इतके सामान दिले की ते घेवून कसे जायचे हा भला मोठा प्रश्न पडतो ना पडतो तोच तिने विनायक ड्राइव्हवर ला फोन केला की रविवारी सकाळी ये पंढरपूरला जायचे आहे. 

पंढरपूर पर्यंत मावशी, प्रकाश दादा दोघे आले व पांडुरंगाचे दर्शन घेऊन दुपारी पुन्हा ते वाडीला रवाना झाले. अशी ही वाडीची वारी अविस्मरणीय ठरली.

मराठीत एक म्हण आहे माय मरो पण मावशी उरो 

पण माझ्या बाबतीत हि म्हण थोडी वेगळीच लागू होते 

आज्जी मरो पण मावशी ऊरो 

कारण आज मोठ्या मावशीच्या प्रेम, आपुलकीमुळेच आजोळ पण अनुभवायला मिळाले.


सौ मोहिनी उत्पात. 🥰

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.