चोखा चोखट निर्मळ.
चोखा चोखट निर्मळ
पंढरीच्या भक्तीवाटेवर चालताना *सर्वांना आहे येथ अधिकार* अशी ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला जाणीव करून दिली. त्यामुळे शुद्रादि सामान्य माणसे, स्त्रिया पुढे येवून धाडसाने विठ्ठलभक्तीतून आपले विचार व्यक्त करू लागले. त्यामधील एक ठळक नाव म्हणजे चोखामेळा!!
चोखामेळा शुद्र जातीत जन्माला आले. धर्मग्रंथ न वाचताही त्यांनी उत्कट भक्तीने परमेश्वराला प्राप्त केले. चोखामेळ्याची बायको सोयराबाई,बहीण निर्मळा, मेहुणा बंका, पुत्र कर्ममेळा हेही विठ्ठल भक्तीमुळे संतपदाला पोहोचले. चोखामेळ्याचे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. चोखोबा अशिक्षित होते. त्यावेळी जातीपातीची बंधने कडक होती. तरीही त्यांचे उत्कट भक्तीने ओतप्रोत असलेले अभंग अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने लिहून ठेवले आहेत. याचा उल्लेख जनाबाईंनी आपल्या अभंगात केला आहे.यावरून आठशे वर्षांपूर्वीच्या कर्मठ काळात वारकरी संप्रदायाचे कार्य किती सर्वसमावेशक होते याची कल्पना येते.
पत्नी सोयराबाईंची उपलब्ध अभंग रचना फार थोडी आहे. पण जी आहे ती अत्यंत उत्कट आहे.
*अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग* हा एकच अभंग सोयराबाईंचं अध्यात्मिक कार्य सिद्ध करतो.
त्यांच्या भक्तिभावाला भुलून विठ्ठलाने त्यांना अडचणीच्या काळात मदत केली आहे. असे म्हणतात की सोयराबाईचे बाळंतपण श्रीविठ्ठलाने, बहीण निर्मळाच्या रूपात येऊन केले. त्यामुळे सोयराबाई आपल्या या मुलाच्या बारशाला साक्षात विठ्ठल रखुमाईला आमंत्रण देते. आणि तेही मोठ्या प्रेमाने बारशाला येतात.
संपूर्ण कुटुंबाची विठ्ठलाप्रती असणारी भक्ती अतिशय निर्मळ होती. म्हणून
त्यांच्या घरी भोजनासाठी विठ्ठल रुक्मिणीसह साऱ्या देव-देवता आल्या होत्या. नेहमी त्यांची हेटाळणी करणाऱ्या लोकांना हे दृश्य पाहून उपरती झाली. त्यांनी चोखोबा सोयराबाई, निर्मळा, बंका,कर्ममेळा यांचा अधिकार मान्य केला.
पंढरपूरला महाद्वारात विठ्ठलाकडे तोंड करून संत चोखामेळा याची समाधी आहे. पूर्वी विठ्ठल मूर्ती नामदेव पायरीच्या वर दगडी मंडपात होती. इथेच उभे राहून चोखामेळा विठ्ठलाचे दर्शन घेत असत. तिथेच त्यांची समाधी आहे. चोखामेळ्याला दासगणू महाराजांनी 'भक्तिवेशीचा वेसकर' म्हटले आहे. मंगळवेढ्याला गावकुसाला लागलेल्या आगीत चोखामेळ्यासह अनेकजण जळाले. तेव्हा नामदेवांसह सर्वांना फार दुःख झाले. तेव्हा त्याच्या अस्थी पंढरपूरात आणून इथे समाधी बांध असे विठ्ठलाने नामदेवास सांगितले. त्यावेळी नामदेव महाराज म्हणाले "देवा, चोखामेळ्यासह इतर काही जण जळाल्याने त्याच्या खाणाखुणा लोपल्या आहेत. त्यामुळे मी चोखामेळ्याच्या अस्थी कशा ओळखणार?"
विठ्ठलाने सांगितले की "सगळ्यांच्या अस्थी गोळा कर. ज्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या अस्थी चोखामेळ्याच्या!!" त्यानुसार नामदेवांनी 'विठ्ठल विठ्ठल' असा ध्वनी निघणाऱ्या अस्थी शोधून आणल्या आणि महाद्वारात चोखामेळ्याची समाधी बांधली. काही कालावधी नंतर नामदेवांनी आपल्या कुटुंबातील चौदाजणांसह तिथे जवळच विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीशी समाधी घेतली.
वारकऱ्यांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी संत चोखामेळा आणि नामदेवांचे दर्शन होते. मग विठ्ठलाचे..
आजही वैशाख वद्य पंचमीला चोखोबाच्या निर्वाण दिनी पंढरपुरात त्यांच्या समाधी समोर मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे नियोजन नामदेव महाराजांचे वंशज करतात. वैशाख वद्य त्रयोदशीला नामदेवांनी त्यांची महाद्वारात समाधी बांधली. वैशाख वद्य पंचमी ते वैशाख वद्य त्रयोदशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. पंचमी ते त्रयोदशी अखंड वीणा, नामस्मरण, किर्तन असते. महाप्रसादाने उत्सवाची सांंगता होते.
असा हा *चोखा चोखट निर्मळ*!!
आपल्या उत्कट भक्तीने त्याने पंढरी रायाला भुलविले.
मीरा उत्पात- ताशी.
कोल्हापूर.
9403554167.

Comments
Post a Comment