चैत्र मधुमास.
*चैत्र मधुमास*
होळीच्या सुमारास समोरचा बहावा टपोऱ्या कळ्यांनी बहरून आला. आणि चैत्राची चाहूल लागली. पाहता पाहता चैत्र अंगणात आला. मादक गंधाने शुभ्र टपोरा मोगरा दरवळू लागला. समोरच्या माळावर लाल फुलांनी बहरलेली पळस, पांगरा, गुलमोहराची झाडं आणि आपल्या सोनेरी फुलांच्या घोसांनी सर्वांगाने लगडलेला बहावा असा साऱ्या सृष्टीवर चैत्राच्या रंगगंधाचा मोठा ठसा उमटला. आणि मला असा आजूबाजूला फुललेला चैत्र मोहवायला लागला.
चैत्रातल्या हवेलाही एक गंध असतो. हवेची झुळूक आली की छानसा गंध येतो. त्यात मोगऱ्याच्या फुलांचा, पाणी पडलेल्या मातीचा, खिडकीवर सोडलेल्या वाळ्याच्या पडद्याचा, मोहरून फळं लगडलेल्या आंब्याचा, दारात तटतटून फुललेल्या चाफ्याचा असा साऱ्यांचा मिळून आलेला एक विशिष्ट गंध असतो. तो कितीही श्वासात भरून ठेवला तरी अजून अजून असा मनाचा पुकारा चाललेला असतो.
इकडे बाहेर अशी सृष्टी सजलेली आणि घरात चैत्रगौर सजलेली!! मनाला माहेरचा आठव येतो. ते अलवारपणाने पंढरपूरला माहेरी जाऊन पोहोचतं.. डोळ्यासमोर चैत्रांगण, चैत्रगौर, चैत्रीवारी, आणि चैत्राचं हळदीकुंकू असं सारं एकामागून एक यायला लागतं. अन् माझं भावविश्व चैत्रमयच होऊन जातं...
चैत्र महिना सुरू झाला की महिनाभर माई चैत्रांगण रेखाटत असे. हिरव्यागार शेणाने सारवलेल्या अंगणात रांगोळीने चंद्र, सूर्य, स्वस्तिक, त्रिशूल, शंख, चक्र, कमळ, पाळणा, हळदी कुंकवाचा करंडा, नाग, तोरण, मंगळसूत्र, कासव, मासा अशी मंगलचिन्हं महिनाभर रेखाटली जात. अंगणातली ही रांगोळी मनास मोहून टाकत असे. गुढीपाडवा झाला की तिसऱ्या दिवशी, तीजेला चैत्रागौरीचे आगमन होई. तिला तेल लावून, गरम पाण्याने न्हाऊमाखू घालून, तिची रंगवलेल्या कोनाड्यात चंदनी पाटा वर स्थापना होई. तिच्यासाठी खास खीर कानवल्याचा नैवेद्य असे. तिला मोगऱ्याच्या गजरा , कैरीची डाळ, पन्हे, ओल्या हरभऱ्याची ओटी असा सारा तीन तीजेला तिचा सोहळा असे. ती महिनाभर आमच्या घरी राहून आम्हाला आशीर्वाद देत असे.
एखादा चांगला दिवस पाहून माई हळदी कुंकवाचा बेत ठरवे. हळदी कुंकवाची माईला फार हौस होती. आमच्या ओसरीवर एक खण भरून गौरीची आरास असायची. हत्तीवर विराजमान झालेली गौर मोठी मोहक दिसायची. तिला कधी पाना फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर तर कधी पायऱ्यांच्या सिंहासनावर बसवून मोठी आरास केली जाई. त्यादिवशी तिच्या समोर लाडू, करंजी, शेव, चकली अशी फराळाची ताटे मांडलेली असत. कलिंगडाची कमळं, कैऱ्यांचे पोपट करायला घरातली तरूण, कलाकार मंडळी सरसावून पुढे येत.
हळदी कुंकवासाठी गल्लीतल्या पन्नास शंभर बायकांना निमंत्रण असे. कैरीची डाळ, पन्ह, कलिंगड टरबूजाच्या फोडी, ओल्या हरभऱ्यांनी भरलेल्या ओट्या, बायकांच्या हाताला लावलेले सुरेख गोड वासाचं अत्तर, गुलाबदाणीतून शिंपडलेलं मंद वासाचं गुलाबजल, त्यांनी नेसलेल्या ठेवणीतल्या रेशमी साड्या, माळलेले मोगरा, जाई जुईच्या फुलांचे गजरे असं रंग रूप गंधाचं मोठं संमेलन भरलेलं असे.
आपल्या भोवती असा रंग रूप गंधाचा पसारा घेऊन बसलेली चैत्रगौर मला एखाद्या सम्राज्ञी सारखी दिसे.
देवळातही अक्षय तृतीयेला आईसाहेब रूक्मिणी मातेचे हळदी कुंकू असे. नटूनथटून बायका हळदीकुंकवाला येत. कैरीची डाळ पन्हं याचा प्रसाद मिळत असे.
आपल्या पूर्वजांनी सण, उत्सव असे ऋतूंशी निगडित ठेवले आहेत. चैत्रात येणारे सण उत्सव रूप रस गंधांनी युक्त असतात. रामनवमीला देवळात गेल्यावर सुंठवड्याचा, गुलालाचा, रामाला वाहिलेल्या सावळ्या दवण्याचा एक अनामिक गंध आपण घरी घेऊन येतो.
आमच्या पंढरपूरच्या रूक्मिणी पांडुरंगाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाची उटी लावतात. त्यांची चंदन विलेपित सावळी मूर्ती या दिवसात पहावी!!एक वेगळीच अनुभूती आपल्याला मिळते.
कालचक्र सतत फिरत असते. कालमानाप्रमाणे सारं बदलतं. काल होतं ते आज नसतं. तसं ते अर्धी ओसरी व्यापणारं चैत्रगौरीचं साम्राज्य आज माझ्या माहेरी राहिलं नाही. देवळातही आता असं चैत्रागौरीचं हळदी कुंकू होत नाही. तरीपण 'अजूनही येतो गंध फुलांना' याप्रमाणे थोड्या प्रमाणात का होईना आपल्या संस्कृतीचा झरा अजूनही भोवताली झुळझुळताना दिसतो आहे. एखादी सखी आवर्जून हळदी कुंकवाला बोलावते. तिनं आटोपशीर आरास केलेली असते. माहेरी सुद्धा काकू, भावजय त्यांना जमेल तितकं करतात. नोकरी सांभाळून भावजयीनं केलेलं छोटसं हळदी कुंकू आनंद देऊन जातं.
पण काहीतरी हरवल्याची सल मात्र टोचत राहते अन् खंत वाटते की माझ्या भावविश्वातला तो अपार आनंद देणारा सोहळा मात्र आता कायमचा हरवला!!!
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.


Comments
Post a Comment