उत्पातांचा लावणी महोत्सव.
*उत्पातांचा लावणी महोत्सव*
चोहीकडे निसर्ग फुलला आहे. ऋतुचक्र आता वसंताच्या उंबरठ्यावर उभे आहे. वसंताचे उष्ण तरीही सुगंधी वात अंगावर येत आहेत. शिशिर आणि वसंताचा हा संधिकाल मनावर विलक्षण मोहिनी घालतो. अशा मोहक वातावरणात होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असा पाच दिवसांचा पंढरपूरच्या उत्पातांचा लावणी महोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो.
महाराष्ट्रात अलीकडील काळात आपली लोककला *लावणी* जपण्याचे काम अनेक कलावंतांनी मोठ्या निष्ठेने केले आहे. पण लावणी म्हटले की माझे काका लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांचे नाव अग्रक्रमाने डोळ्यासमोर येते. त्यांनी पन्नास वर्षे अविरतपणे लावणीची साधना केली.
रूक्मिणी मातेचे परंपरागत पुजारी असलेली उत्पात मंडळी लावणी कडे कसे वळले याचा मोठा रंजक इतिहास आहे. साधारणपणे सव्वाशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज बाळकोबा उत्पात हे काही कामानिमित्त पुण्यात गेले असता त्यांच्या हाती काही ज्ञात तर काही अज्ञात शाहिरांनी लिहिलेल्या दीड-दोनशे लावण्यांचे हस्तलिखित बाड लागले. ते बाड ते पंढरपूरला घेऊन आले. वाचल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्याला हा फार मोठा खजिना गवसला आहे. ते गायक होते. रूक्मिणी मातेच्या देवळात ते भजन कीर्तन करत असत. त्यांनी या लावण्यांचा अभ्यास केला. यातील जवळ जवळ सगळ्या लावण्या या बैठकीच्या लावण्या होत्या. त्यांना बाळकोबांनी चाली लावल्या. त्या कशा सादर करायच्या, त्याच्या अदा, मुद्राभिनय, नजाकत हे सारे आत्मसात करून त्या काळातील लावणी नृत्यांगनांना शिकवल्या. मृतप्राय झालेली बैठकीची लावणी पुनर्जीवित केली. तोच वारसा पुढच्या पिढीने चालवला आणि लावणीचे रोपटे बहराला आणले.
सध्या सुरू असलेल्या लावणी मंडळाची स्थापना साधारणपणे सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे १९०३ साली नवग्रह उत्पात लावणी मंडळ या नावाने बाळकोबा उत्पात यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. ती माझ्या माहेरच्या घरी *डावाचा वाडा* म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाड्यात केली. त्याकाळात वसंत पंचमी ते रंगपंचमी अशी महिनाभर ही मैफिल घरगुती स्वरूपात होत असे...पुढे ही मैफिल काही वर्षे क्षीण स्वरूपात सुरू होती. त्यानंतर शंकर आप्पा मंगळवेढेकर यांच्या मार्गदर्शनाने व यशवंत उत्पात यांच्या आग्रहाखातर १९६३ साली ज्ञानोबा उत्पात यांनी या लावणीच्या कलेची साधना सुरू केली. यात यशवंत उत्पात यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पुढाकार घेऊन ही परंपरा खंडित होऊ दिली नाही.
ज्ञानोबा उत्पात यांच्याबरोबर त्यांना साथ देणारे वासुदेव भगवान उत्पात, बाबाजी ज्ञानेश्वर उत्पात, सुरेश वामन उत्पात, मच्छिंद्र उत्पात, मोरेश्वर केशव उत्पात,बाळाजी उत्पात, वादक गोविंद वनारे ही महत्त्वाची नावे आहेत. तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन भागवताचार्य वा ना उत्पात हे करत असत. या मंडळींनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली पर्यंत या बैठकीच्या लावणीचा डंका पोहचवला. पूर्वाश्रमी शृंगारिक लावण्या लिहिणारे अनेक शाहिर उत्तरार्धात भक्ती मार्गाकडे वळले. आणि त्यांनी भक्ती प्रधान लावण्यांची रचना केली. या लावण्या *लावणीतील भक्ती* या शीर्षकांतर्गत लावणीची ही दुसरी तेजस्वी बाजू ज्ञानोबा उत्पात आणि वा. ना. उत्पात यांनी रसिकांसमोर आणली.
साधारणपणे १९८१ साली हा कार्यक्रम पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी घेण्यात आला. अशोक रानडे यांनी राज्य शासनाच्यावतीने द ह कवठेकर प्रशाला याठिकाणी *लावणीतील भक्ती* या विषयावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. याला फार मोठा श्रोतृवर्ग लाभला. याला भरपूर लोकप्रियता मिळाली. पुढे हा कार्यक्रम आकाशवाणीवर, दूरदर्शन वर सुरू झाला व त्यालाही लोकमान्यता मिळाली. त्यामुळे इतरही ठिकाणी म्हणजे भोपाळ, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरातही लावणीचे कार्यक्रम भरपूर प्रमाणात होऊ लागले. कोल्हापुरात पद्माराजे गर्ल्स हायस्कूल च्या सभागृहात अलोट गर्दीत हा कार्यक्रम सादर झाला.
साहित्य, कला, गायनक्षेत्रातील मान्यवरांची कौतुकाची थाप या कार्यक्रमाला मिळाली. थोर विदुषी दुर्गा भागवत, किर्ती शिलेदार अशा अनेकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन स्तुती केली.
पुण्याच्या कार्यक्रमाला छोटा गंधर्व, कुमार गंधर्व ह्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. लावणीला तसेच गायनाला दाद देऊन स्तुती केली. छोटा गंधर्व म्हणाले की 'ही लावणी नाही भुलावणी आहे.' भारतरत्न स्वर्गीय भीमसेन जोशी यांनी त्यांच्या घराच्या वास्तुशांती निमित्त घरगुती लावणीचा विशेष कार्यक्रम ठेवून तोंड भरून कौतुक केले. नाशिकच्या कार्यक्रमात कविवर्य कुसुमाग्रज यांनी उपस्थित राहून लावणी मंडळाला दाद दिली. इतरही भरपूर ठिकाणी शासनामार्फत तसेच वैयक्तिक रित्या ह्या लावणी मंडळाचे भरपूर कार्यक्रम झाले व ते आजही चालू आहेत. पु ल देशपांडे वसंतराव देशपांडे, इचलकरंजीकर शामराव भिडे हे खास लावणीचा कार्यक्रम ऐकायला पंढरपूरला मैफिलीला येऊन गेले. लावणीला व मंडळाला भरपूर नावाजत पाठीवर कौतुकाची थाप टाकून गेले. ठाण्यात झालेल्या दया पवार प्रतिष्ठान च्या लावणी महोत्सवात उस्ताद झाकीर हुसेन, तौफिक कुरेशी, पंडित शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांनी ज्ञानोबा काकांच्या गायनाला मुक्तकंठाने दाद दिली.
भागवताचार्य वा. ना. काकांचे रसाळ निवेदन आणि ज्ञानोबा काका आणि सहकाऱ्यांचे बहारदार गायन यांनी हा काळ अक्षरशः गाजवून सोडला.
ज्ञानोबा उत्पात यांनी जुन्या लावण्यांचे जतन तर केलेच आणि अनेक लोकप्रिय लावण्या लिहून त्यात भरही टाकली.
साधारणपणे दीडशे दोनशे वर्षा पूर्वीच्या बऱ्याच लावण्यांना एकत्र करून त्याला चाली लावण्याचे काम अपार मेहनतीने ज्ञानोबा उत्पात यांनी केले. तसेच स्वतःही काही लावण्या लिहून त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील 'चला जेजुरीला जाऊ' ही लोकप्रिय लावणी ज्ञानोबा काकांची आहे. त्याबरोबर मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटातही त्यांनी एक लावणी लिहिली आहे. हे भरीव योगदान लक्षात घेऊन उशीरा का होईना पण महाराष्ट्र राज्य शासनाने लावणीचा *पठ्ठे बापूराव* हा पुरस्कार ज्ञानोबा काकांना दिला. त्याचा कार्यक्रम पुण्यात मोठ्या प्रमाणात झाला आणि पूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा झाली आणि मोठी दादही मिळाली. ज्ञानोबा काकांना माऊली या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कडे अनेक लावणी नृत्यांगना बैठकीची लावणी शिकण्यासाठी आल्या आणि त्यांनी शिकवलेल्या अदाकारीने लोकप्रिय झाल्या.
या कलावंतिणींना माउलींनी साभिनय लावणीचे प्रशिक्षण दिले. या कलावंतिणी पंढरपूरला काही दिवस राहून माऊलींकडून लावणीचे धडे गिरवत असत. छाया-माया खुटेगावकर, राजश्री- आरती नगरकर, उमा-नंदा इस्लामपूरकर, रेश्मा-जयश्री जामखेडकर यासारख्या अनेक कलावंतांनी काकांकडून बैठकीची लावणी अदेसह शिकून नावारूपाला आणली. ज्ञानोबा काकांच्या लावणीने केवळ महाराष्ट्रातीलच शिष्य घडवले नाहीत तर *ख्रिस्तीन* या अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकणाऱ्या महिलेलाही त्यांनी मार्गदर्शन केले. तिने *मराठी लावणी चे संगीत पैलू* या विषयावर पीएचडी केली. त्यात *ज्ञानोबा उत्पात यांची जुनी बैठकीची लावणी* यावर एक प्रकरण आहे.
उत्पातांनी एकीकडे रुक्मिणीमातेची उपासना, सेवा आणि एकीकडे लावणी या लोककलेची उपासना, सेवा या दोन्ही गोष्टी मर्यादेने जपल्या, वाढवल्या, जोपासल्या. महाराष्ट्रीयन लोककलेतील महत्त्वाचा दागिना म्हणजे लावणी. या लावणीतील झगमगणारा, आपल्या तेजाने झळाणारा हिरा म्हणजे बैठकीची लावणी. त्या हिऱ्याला सर्वांच्या समोर सादर केले ते उत्पातांनी!!या लोककलेचा समृद्ध वारसा गेली सव्वाशे वर्षांहून अधिक काळ आमची उत्पात मंडळी अविरतपणे चालवत आहेत. आताच्या पिढीत ही मैफिल श्री. मनोहर उत्पात, श्री. अनिल उत्पात, शाम उत्पात, श्री. हेमंत यशवंत उत्पात, श्री. हेमंत वैरागकर उत्पात, प्रसाद ज्ञानेश्वर उत्पात, प्रसाद पंढरीनाथ उत्पात ही मंडळी उत्कृष्ट पद्धतीने सादर करत आहेत.
होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या दिवशी हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत एकनाथ भवन येथे होणार आहे तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम विनामूल्य असतो.
मीरा उत्पात-ताशी,
कोल्हापूर.

Comments
Post a Comment