पंढरपूर येथे डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.
पंढरीत डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर येथील सेवानिवृत्त न पा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल जोशी यांच्या 'इच्छामरण' या संकल्पनेचा घेतलेला आगळावेगळा वेध या विषयावरील "शेवटचा दिस गोड व्हावा" या नूतन पुस्तकाचा व शवागरातील एक वेगळ्या विश्वाचा परिचय देणाऱ्या "(अ) पार्थिव" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे हे होते तसेच पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर व ज्येष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर पुस्तकाचे लेखक डॉ. अनिल जोशी यांनी "इच्छामरण" या एका वेगळ्या संकल्पनेवरच पुस्तक लेखन का करावे वाटले तसेच मरण या शाश्वत सत्याबाबत अनेकांच्या मनात असलेली भीती, रुग्णालयात मृत्युशय्येवर शेवटच्या घटका मोजत काही कठोर निर्णय घेत असताना रुग्णासोबतच नातेवाईकांची होणारी एकूणच संभ्रमावस्था, मानसिकता यासाठी वैद्यक क्षेत्राबरोबरच तेवढीच कायद्याची पडणारी गरज यावर विस्तृत उहापोह लेखकाच्या मनोगतात व्यक्त करून पुस्तक परिचय दिला.
डॉ. प्रसन्न दाभोलकरांनी आपल्या मनोगतात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून "इच्छामरण" या विषयावर प्रकाश टाकताना आपल्या दैनंदिन आचरणातून, आहार विहारातून आपण आपली इहलोकयात्रा मरणासन्न अवस्थेपर्यंत न जाता "तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥ याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ।" या पुस्तकाच्या शिर्षकाप्रमाणे "शेवटचा दिस गोड" व सुखकर करू शकतो हे जगद्गुरू तुकोबांच्या अभंगाचा, आता दिवस चारी
खेळीसे
ना होता. अट्टाहास
शेवटाचा दिन गोड व्हावा
दाखला देऊन आपले मौलिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले आजार झाला की वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, आजाराशी भांडत बसायचे नाही. औषधावर पूर्णपणे अवलंबून रहायचे नाही. नियमित शारीरिक व्यायाम करीत मानसिक आरोग्य जपले पाहिजे. अध्यात्मिक वृत्ती बाळगली पाहिजे मित्र मंडळी, हास्य क्लब , गेट टुगेदर मध्ये सहभागी व्हावे. मी पणाचा परीघ वाढू देऊ नये. मृत्यु आनंदाने स्वीकारला पाहिजे.
ज्येष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग यांनी "आयसीयू” व "व्हेंटिलेटर" बरोबरच डायलिसिस, डिमेन्शिया, अल्झायमर या दुर्धर आजाराशी संबंधित शब्दांची एकूणच जनमानसावर बसलेली भीती यावर आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.
ते म्हणाले माणूस व्हेंटिलेटर वर आहे, म्हणजे गंभीर टप्पा हा मोठा गैरसमज आहे.त्यांनी आपल्या मनोगतात गुंतागुंतीच्या विविध गंभीर आजारांवरही योग्य वेळेत पुरेसा वेळ देऊन उपचार केले तर वार्धक्यात असणाऱ्या रुग्णाच्या प्रकृतीत बराचसा आराम मिळून तो स्वास्थ्याने उरलेला काळ घालवू शकतो. हे अनेक मान्यवरांच्या आजारांचे संदर्भ, उदाहरणे देऊन, उपस्थित श्रोत्यांना एकूणच गंभीर आजारपण याबाबत सर्वसामान्यांच्या मनात असणारी भीती कमी करण्याचा आपल्या मनोगतातुन प्रयत्न केला.
अध्यक्षीय समारोप करताना जेष्ठ लेखक व संपादक श्री. भानू काळे यांनी "(अ) पार्थिव" या शवागरातील एका वेगळ्या विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकावर आपले विचार मांडले. ते म्हणाले (अ) पार्थिव हे सत्य अनुभवांवरील आधारित असणारे मराठी साहित्यविश्वातील पहिलेच पुस्तक असावे. अशा प्रकारच्या कथा, कादंबरीप्रमाणे शब्दफुलोरा न करता वास्तव जगलेल्या सत्य घटनेवरील साहित्यकृती निर्माण झाल्या तर मराठी साहित्यशारदेला एक प्रकारचे वेगळेच वैभव प्राप्त होईल. डॉ. अनिल यांनी "इच्छामरण" व "(अ) पार्थिव" ही वेगळ्या धाटणीची साहित्यकृती लिहून अशा प्रकारचे लिखाण करू इच्छिणाऱ्या नवोदित लेखकांसाठी एक वेगळी पायवाट निर्माण केली आहे.
याप्रसंगी पुस्तकाचे मुद्रक विनायक पतकी, अक्षर रचनाकार समिहन आठवले यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पानसे यांनी केले. पत्रकार अभय जोशी यांनी आभार मानले.
नेटक्या नियोजनाच्या, वैचारिक मेजवानीच्या देखण्या दिमाखदार प्रकाशन समारंभास माजी आमदार प्रशांत परिचारक वैद्यक क्षेत्राबरोबरच, राजकीय, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment