मुरडीचा कानोला.


 *मुरडीचा कानोला*



गेले तीन चार दिवस चाललेली धांदल काल संध्याकाळी शांत झाली.. काल माहेरवाशीण गौराई आपल्या घरी गेल्या. त्यांच्या आगमनाची तयारी,  स्थापना, पूजन आणि विसर्जन या सगळ्या गोष्टींमुळे घरात नुसतं चैतन्य भरून राहिलं होतं. त्यांच्या साठी करंज्या, लाडू, पुरणपोळी, खीर, साखरभात अशी पक्वान्ने, सोळा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, वाटली डाळ, वडे भजी कढी कटाची आमटी असा परिपूर्ण स्वयंपाक करून,  नैवेद्य दाखवून, सवाष्ण, ब्राह्मण आणि घरच्या सगळ्यांना आग्रहाने पोटभर जेवायला घालून, तृप्त होऊन दमलेली घरची लक्ष्मी.. संध्याकाळी हळदी कुंकवाला आलेल्या बायका, गौरी गणपतीच्या निमित्ताने आलेले अभ्यागत,  परगावाहून आलेली घरची मंडळी असं सारं उत्साही वातावरण गेल्या चार दिवसांत भोवताली होतं.. गप्पा गोष्टी करत कामं उरकली जात होती. आणि पाहता पाहता पाहुण्या म्हणून आलेल्या माहेरवाशीणींचा जाण्याचा दिवस उगवला. सकाळपासून उगाच डोळे भरून आले. संध्याकाळी आरती करताना नैवेद्यासाठी मुरडीचा कानोला ठेवताना गळ्यात आवंढा दाटला..गौराईसाठी करंज्या करताना शेवटच्या चार करंज्या आवर्जून मुरडीच्या करायच्या आजच्या नैवेद्यासाठी अशी प्रथा आहे.. आमच्या कडे गौराईला महालक्ष्मी म्हणतात. त्या दोन असतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा!! लहानपणी महालक्ष्म्यांसाठी आई, काकू करंज्या करताना, माई शेवटच्या चार करंज्या मुरडीच्या करायला सांगायची. माझ्या आईला, मोठ्या काकूला फार सुरेख, बारीक मुरड घालता येत असे. करंजीला मुरड घालणं हे फार कौशल्याचं काम!!  आई मुरड घालताना मी माईला विचारे या करंज्या मुरड घालून का गं करायच्या? माई म्हणे, जाणारी पाहुणी मुरडून परत यावी म्हणून!! फक्त महालक्ष्मीलाच नाही तर सासरहून माहेरी येणाऱ्या माहेरवाशिणींसाठी त्या परत सासरी निघताना खीर आणि मुरडीचा कानोला करण्याची प्रथा परंपरा होती. मुरडीचा कानोला खाऊ घातला की लवकर माहेरी यायला मिळतं अशी समजूत होती. पूर्वी लवकर लवकर माहेरी यायला मिळत नसे. सासरी प्रचंड धाक असे. घरी माहेरचा मुराळी आला तरी त्याच्या बरोबर मुक्तपणाने बोलता येत नसे. अशा सासुरवासात पूर्वीच्या स्त्रियांना रहावे लागत असे.  त्यामुळे माहेरी यायला मिळणं म्हणजे अप्राप्य गोष्ट होती. सासुरवास सोसलेल्या जीवाला माहेरी, लाड कौतुक करवून घेताना अपार सुख वाटत असे. हे फुलपाखरी दिवस कसे लगेच उडून जात. परतीचा दिवस फारच लवकर आला असं वाटत असे. आज्जी, आई लेक परत सासरहून लवकर यावी म्हणून मुरडीचे कानोले करून खायला घालून तिची बोळवण करत असत. लेक माहेरी राहून तृप्त होऊन गेली की घराला बरकत असते असं माईचं म्हणणं होतं. त्यामुळे तिच्या सरबराईत कुठं कमतरता नको अशा सक्त सूचनाच असायच्या!! घरी चार दिवसांसाठी आलेल्या महालक्ष्म्या काय किंवा खऱ्या माहेरवाशीणी काय कुणाच्याही पाहुणचारात कमतरता नको!! ही मायेची ऊब देणारी परंपरा पुढच्या पिढीत संक्रमित होत आजतागायत अव्याहत सुरू राहीली आहे!! असं किती तरी सांस्कृतिक संचित आपण आपल्या बरोबर पुढं वाहून आणलेलं असतं. माणसाने मनातल्या भावावस्थांची सांगड अशी देवाशी घातली आहे..  काल मीही तिचा निरोप घेताना कातर झाले होते. माझ्या कडून असेच माहेरपण दरवर्षी करून घे म्हणत तिच्या पुढं नतमस्तक झाले होते.

 माहेरच्या आगतस्वागतांनी सुखावलेल्या, मुरडीचा कानोला खाऊन तृप्त होऊन आशीर्वाद देणाऱ्या महालक्ष्म्या आता निघाल्या पुढच्या वर्षी परत येण्यासाठी!! त्यांचा निरोप घेताना डोळ्याच्या कडा भरून आल्या!  पाण्याचे थेंब ओघळले .. सुखाचे आणि दुःखाचेही!!

मीरा उत्पात-ताशी,

९४०३५५४१६७.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.